छंदःशास्त्राची चाळीस वर्षे

लेखक: 
कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर
पूर्वप्रसिद्धी: 
नवभारत
सप्टेंबर, १९६२

 

१. समीक्षणीय ग्रंथ

छंदःशास्त्रविषयक मराठी ग्रंथांच्या प्रस्तुत समीक्षेला विषयभूत अशा ग्रंथांपैकी काही ‘बालानां सुखबोधाय’ या उद्देशाने प्रवृत्त झाले असून छंदःशास्त्राचा स्थूल परिचय करून देणारे आहेत; तर काही छंदःशास्त्राच्या विविध अंगांची अंशतः अथवा सामग्र्याने चिकित्सा करणारे अथवा त्यांचे संशोधन करणारे, आणि अशा रीतीने छंदःशास्त्राचे सूक्ष्म दर्शन घडविणारे असे आहेत. यांपैकी पहिल्या वर्गात परशुराम बल्लाळ गोडबोले यांचा ‘वृत्तदर्पण’ (पहिली शिलामुद्रित आवृत्ति १८६०; २९ वी आवृत्ति १९५०); हरि माधव समर्थ यांची ‘साहित्यचंद्रिका’ (१९२४); का. र. वैशंपायन यांचा ‘छंदःशास्त्रप्रवेश’ (१९२९); पुरुषोत्तम नारायण वर्तक यांचा ‘वृत्तबोध’ (१९२५); आणि विनायक महादेव कुलकर्णी यांचे ‘वृत्ते व अलंकार’ (दुसरी आवृत्ति १९४७) या पुस्तकांचा समावेश होतो. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा ‘मराठी छंद’ (१९३६) हा ‘केवळ मराठी’ म्हणून मानिल्या गेलेल्या दहा छंदांचे ऐतिहासिक दृष्टीने परीक्षण करणारा निबंध; माधव त्रिंबक पटवर्धन यांचा ‘छंदोरचना’ (१९३७) हा या विषयावरील पहिलाच मराठी सर्वस्पर्शी ग्रंथ; ‘पद्यप्रकाश’ (१९३८) हा त्यांचाच, ‘छंदोरचने’ची संक्षेपावृत्ति या स्वरूपाचा ग्रंथ; वि. ज. उर्फ तात्याबुवा सहस्रबुद्धे यांची, छंदःशास्त्रविषयक स्फुट निबंधांचा संग्रह या स्वरूपाची, प्राय: ‘छंदोरचने’तील दोषस्थलांचा परामर्श करणारी ‘पद्यमीमांसा’(१९४१); रामचंद्र श्रीपाद जोग यांचा ‘काव्यविभ्रम’ (१९५१) हा काही भागाच्या अपवादाने ‘छंदोरचेने’ला अनुसरणारा ग्रंथ; आणि शेवटी ‘छंदोरचने’तील उक्त-अनुक्त-दुरुक्तांचा परामर्श करणारी आणि म्हणूनच तिचे वार्त्तिक म्हणून अभिप्रेत असलेली ना.ग. जोशी; यांची ‘मराठी छंदोरचना : लयदृष्ट्या पुनर्विचार’ (१९५५) – या ग्रंथांचा समावेश दुसर्‍या वर्गात होईल. या सर्व ग्रंथांपैकी ‘साहित्यचंद्रिका’, ‘वृत्ते व अलंकार’ आणि ‘काव्यविभ्रम’ हे तीन ग्रंथ छंदांव्यतिरिक्त अलंकारांचाहि परामर्श करणारे आहेत. छंदःशास्त्राच्या आणि छंदांच्या इतिहासाचे अंशतः अथवा समग्र दर्शन घडविण्याचा प्रयत्न वरीलपैकी तीनच ग्रंथांत केलेला आढळतो  : ‘मराठी छंद,’ ‘छंदोरचना’ आणि ‘मराठी छंदोरचना.’

 

२. छंदःशास्त्र की पद्यशास्त्र?

‘छंदस्’ (नपु.) हे संस्कृत नाम फार प्राचीन कालापासून ‘पद्याच्या बांधणीचा साचा’ या अर्थाने, आणि ‘पद्य’ (नपु.) हे नाम ‘गद्येतर वाङ्मय’ या अर्थाने योजिलेलें आढळते. छंदस् या नामाचा ‘सूक्त’ अथवा ‘पद्य’ या अर्थाने प्रयोग वेदसंहितात, आणि ‘वैदिक वाङ्मय’ अशा अर्थाने प्रयोग पाणिनीच्या अष्टाध्यायीत प्रामुख्याने आढळतो. हे अर्थ या विशिष्ट ग्रंथांपुरते मर्यादित म्हणून बाजूला ठेविले, तर ‘पद्याचा साचा’ या अर्थाने होणार्‍या छंदस् या नामाच्या प्रयोगाची परंपरा ब्राह्मणग्रंथ, सूत्रग्रंथ यांच्या काळापासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत दाखविता येईल. ते मराठीत स्वतंत्र पद म्हणून येते तेव्हा ‘छंद’ (पुं.) असे स्वरान्त रूप धारण करिते, एवढेच. ‘पदयुक्त अर्थात् चरणयुक्त ते पद्य’ या मूळ अर्थाने पद्य हे नाम छंदस् या नामाशी समानार्थक होत असले, आणि क्वचित् त्याचा छंदस् या अर्थाने प्रयोगही आढळत असला, तरी त्याचा प्रायिक प्रयोग ‘विशिष्ट वाङ्मयवर्ग’ अशाच अर्थाने झालेला आहे. ‘छन्दोबद्धपदं पद्यम्’,[टीप : ०१] यासारख्या पद्यलक्षणात तर छंदस् आणि पद्य यांमधला भेद आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध हे निर्विवादपणे प्रस्थापित होतात. ‘छंदोरचना’कार पटवर्धनांनी गद्यपद्यांच्या चर्चेच्या निमित्ताने जे आधार दिले आहेत,[टीप : ०२] तेही छंदस् आणि पद्य यांच्या अर्थभेदाला पोषकच आहेत.

छंदस् आण पद्य या दोन संज्ञांचा हा इतिहास ध्यानात घेतला, तर त्यांचा समानार्थक शब्द म्हणून प्रयोग करण्याचा प्रमाद कोणाकडून होणार नाही. तथापि तसा प्रमाद पटवर्धनांनी केला आहे, आणि तोहि दुसर्‍या एका प्रमादाची निष्कृति होणाच्या आशेने केला आहे. त्यांनी आपल्या ग्रंथाला नाव दिले ‘छंदोरचना.’ त्यात ‘छंदांचे तीन वर्ग कल्पिले : अक्षरमात्रानियत, केवल मात्रानियत, केवल अक्षरनियत. त्यापैकी पहिल्या दोघांना रूढ नावे दिली : वृत्त आणि जाति. तिसर्‍याला रूढ नाव नव्हते म्हणून नाव शोधावयास सुरवात केली. त्यांना आढळले की वैदिक छंदहि केवल अक्षरनियत आहेत; मग प्राकृत अक्षरनियत रचनेला छंद म्हणावयास काय हरकत आहे? याप्रमाणे तिसर्‍या वर्गाचे ‘छंद’ हे नाव ठरले. हे त्यांचे करणे साहजिकच आक्षेपार्ह ठरले;[टीप : ०३] कारण समष्टीला आणि व्यष्टीला एकच नाव दिल्याने संदिग्धता, संक्रम (overlapping) आणि शैथिल्य हे दोष अपरिहार्य होतात. या आक्षेपातून मुक्त होण्यासाठी त्यांनी छंद हे नाव व्यष्टीसाठी, म्हणजे केवल अक्षरनियत रचनांसाठी, कायम करून, वरील तिन्ही वर्गांची समावेशक अशी जी समष्टि तिच्या निर्देशासाठी ‘पद्य’ हे नाव नियुक्त केले.’[टीप : ०४] या बाबतीत त्यांना काही अनुयायीही मिळाले.[टीप : ०४]
या प्रमाणे पटवर्धनांनी तात्पुरता आक्षेप टाळला खरा; पण तसे करताना असमर्थनीय असा परंपराविरोधाचा दोष पदरी घेतला. त्यापेक्षा सहस्रावधि वर्षांच्या प्रयोगाने ज्याचा अर्थ प्रतिष्ठित झाला आहे, तो छंदस् शब्द रूढ अर्थानेच योजून अक्षरनियत रचनांसाठी वेगळे काही नाव त्यांनी सुचविले असते तर ते अधिक स्वागतार्ह झाले असते. अर्थात् नवे अर्थवाहक, सुटसुटीत नाव शोधणे हे काम वाटते तितके सोपे नाही. तथापि अक्षरनियत रचनांच्या वर्गासाठी त्या वर्गाचा तोच विशेष धर्म ध्यानी घेऊन ‘अक्षरी’ (स्त्री) हे नाव निदान तात्पुरते म्हणून कोणी सुचविले असते, तर एव्हाना ते रूढही होऊन गेले असते. या व्यवस्थेप्रमाणे ‘अक्षरमात्रानियत छंद म्हणजे वृत्ते, केवलमात्रानियत छंद म्हणजे जाति, केवलअक्षरनियत छंद म्हणजे अक्षरी, आणि यांपैकी कोणत्याही साच्यात साकार झालेली वाङ्मयी रचना म्हणजे पद्य’ असे होईल; आणि छंदःशास्त्राच्या परिभाषेत अकारण क्रांतिकारक बदल होण्याचा प्रसंग टळेल. छंदःशास्त्र म्हणजे छंदःशास्त्रच, पद्यशास्त्र नव्हे, ‘पद्यशास्त्र’ या संज्ञेचा ‘पद्या’च्या परंपरागत अर्थाला अनुसरून अर्थ केलाच तर ‘छंदोबद्ध वाङ्मयाचे विवेचन’ असा होईल; आणि त्याचे प्रकार ‘महाकाव्य, सुनीत’ इत्यादि होतील. ‘वृत्त, जाति’ इत्यादि होणार नाहीत.

या सर्व चर्चेवरून छंद अशा अर्थी पद्य या शब्दाचा प्रयोग करण्यातली अनुचितता उघड होईल. म्हणून समीक्षणीय ग्रंथात जेथे जेथे ‘पद्या’चा छंद अशा अर्थाने प्रयोग अभिप्रेत आहे, त्या स्थलांविषयी पुढील विवेचनात, प्रत्यक्ष ग्रंथगत उद्धरणांचा अपवाद केला तर, सर्वत्र छंद हाच शब्द योजिला आहे.

३. पटवर्धनांचे छंदोलक्षण

‘पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना’,[टीप : ०५] या पटवर्धनांच्या छंदोलक्षणावर जो वाद माजला, त्याचे मूळ काहीसे छंद आणि पद्य या कल्पनांमधील भेदाची लक्षणकाराने दखल न घेण्यात आणि आक्षेपकांनी लक्षणकाराचा अभिप्राय समजून न घेण्यात सापडेल. पटवर्धनांच्या हिशेबी पद्य म्हणजे छंद. आक्षेपकांना बहुधा पद्य म्हणजे ‘छंदोमयी वाङ्मयी रचना’ असे अभिप्रेत असावे. त्यामुळे त्यांना साहजिकच अशी भीती वाटली की या लक्षणाला अनुसरल्यास प्रत्येक तराण्याला अथवा अर्थशून्य ‘लला ललाला, लला ललाला’ ला  ‘पद्य’ म्हणण्याचा प्रसंग येईल, साहजिकच असा प्रसंग आणणारे पटवर्धन या आक्षेपकांच्या दृष्टीने ‘अव्यापारेषु व्यापार’ करणारे ठरले.[टीप : ०६] वास्तविक असा प्रसंग म्हणजे इष्टापत्तिच होय. कारण, प्रत्येक तराण्याला अथवा अर्थशून्य ‘लला ललाला...’चसे काय, पण अव्यक्तध्वनिमय पण लयानुसारी गुणगुणण्यालाही पटवर्धनांच्या अर्थाने, म्हणजे छंद या अर्थाने, पद्य म्हणावयास काहीच हरकत नाही. कारण, छंदाला अर्थाशी काहीच कर्तव्य नाही. पटवर्धनांनी या लक्षणात ‘अक्षररचना’च काय, पण ‘ध्वनिरचना’ असा शब्दप्रयोग केला असता, तरी तो स्वीकार्य ठरला असता. संस्कृत वाङ्मयातील ‘ठण्ठं ठठण्ठं ठठठं ठठण्ठः’ हा चतुर्थचरण असलेली पद्ये बहुधा वरील आक्षेपकांच्या वाचनात आली नसावी, किंवा ते त्यांना पद्य म्हणत नसावे.

पटवर्धनांची ‘लय’[टीप : ०७] म्हणजे इंग्रजीतील ‘र्‍हिदम’चा मराठी अवतार असेही या अक्षेपकांनी सूचित केले आहे. पटवर्धनांना लयसिद्धान्त ‘र्‍हिदम’ या कल्पनेवरून सुचलेला असेलही. पण त्याचा मराठी छंदःशास्त्राच्या संदर्भात असंदिग्धपणे प्रथम उच्चार करण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. राहता राहिला आक्षेप म्हणजे त्यांनी लय या छंदोनिर्धारक तत्त्वाचे असंदिग्ध सविस्तर विवेचन केले नाही, हा. हा आक्षेप मात्र खरा आहे. पण आता या उणिवेची भरपाई ‘मराठी छंदोरचने’ने अपेक्षित स्वरूपात नव्हे तरी काही थोडीशी, केली आहे. मात्र पटवर्धनांनी ‘अनावर्तनी म्हणून गणिलेल्या वृत्तांकडे बोट दाखवून त्यांच्या पदरी अपसिद्धन्ताचा दोष बांधण्यात पटवर्धनांच्या आक्षेपकांची[टीप : ०८] आणि त्या वृत्तांना’आवर्तनी ठरविण्याचा खटाटोप करण्यात ‘मराठी छंदोरचने’ची दिशाभूल झालेली आहे. कारण, पटवर्धनांनी ‘अनावर्तनी’ म्हणजे ‘लयहीन’ असे कोठेही प्रतिपादिलेले नाही. ‘पटवर्धनांनी छंदःशास्त्रात लय हे एक नवेच खूळ आणले आहे’ असाही सूर त्यांच्या छंदोलक्षणावरील वादात काही आक्षेपकांनी काढलेला आढळतो. या आक्षेपकांना परंपरागत छंदोलक्षणातील लगक्रमनियतता, मात्रानियतता, तसेच भरताच्या ‘पद’लक्षणातील ‘सतालपनात्मकता’ यांचे[टीप : ०९] आकलनच झालेले नाही असे म्हणणे भाग आहे; कारण लगक्रमनियतता, मात्रानियतता किंवा सतालपतनात्मकता म्हणजे लयीचाच अपरिहार्य परिणाम आणि आविष्कार होय. ‘असे जर आहे तर पटवर्धनांच्या प्रतिपादनात अपूर्वता ती काय राहिली?’ असे कोणी यावर विचारील. त्याला उत्तर हे की पटवर्धनांनी व्यापक अशा लयतत्त्वाच्या एका सूत्रात सर्व छंदःप्रकार गोविले, हे त्यांच्या प्रतिपादनाचे अपूर्वत्व होय. शिवाय, त्यामुळे नृत्य, संगीत आणि छंद ही सारी एकाच तत्त्वावर – लयतत्त्वावर – अधिष्ठित आहेत, हेही विशद झाले आहे. जे पूर्वी गर्भित रूपाने. वळणावळणाने आणि भागशः सांगितलेले असेल, ते प्रकट रूपाने, लाघवाने आणि सामग्र्याने सांगणे हीही एखाद्या शास्त्राच्या इतिहासात मोठ्या श्रेयाची गोष्ट आहे. छंदःशास्त्रात लयकल्पना मांडून पटवर्धनांनी त्या श्रेयावर आपला हक्क खचीत प्रस्थापित केला आहे.

४. अन्य छंदोलक्षणे

तथापि वर म्हटले आहे त्याप्रमाणे पटवर्धनांनी लयस्वरूप असंदिग्धपणे विशद न केल्याने लयीविषयी पुष्कळ अपसमज चालू राहिले. कोणी लय म्हणजे रूढ संगीतताल समजले; कोणी लयीला केवळ मात्रामेयआवर्तनात्मक समजले; तर कोणी तिचे नियतगतित्व हे रूप दुर्लक्षिले. यांतून अन्य छंदोलक्षणे जन्मास आली. गो.वि. खाजगीवाले आणि ना.ग. जोशी या दोघांनाही ‘गति’ हा शब्द छंदोलक्षणात आवश्यक वाटतो. पण ‘लय’ म्हणजे ‘नियत गति’ हे त्यांना उमजले असते, तर त्यांनी ही सुधारणा सुचविली नसती. ते एक असो. पण खाजगीवाल्यांनी ‘स्वराचा विशेष चढउतार न करिता म्हणताना गति उत्पन्न होऊन मधून थांबता येणे आणि फिरून उच्चारणाला अडथळा न येता पुढे गति चालू होऊन चरणाची मर्यादा ठरणे ही पद्याची अंतर्गत क्रिया’ म्हणजेच ‘नैसर्गिक उच्चारणक्षमता’ हे जे ‘छंदस्त्वा’चे. म्हणून लक्षण सुचविले आहे[टीप : १०], ते प्रायः सर्वच्या सर्व ‘गद्यत्वा’लाहि उपपन्न होण्यासारखे आहे, त्यात गर्भित असलेला स्वराचा ‘सामान्य’ चढउतार (हा गद्यातहि असतो) छंदोलक्षणात आगंतुक ठरणारा आहे, हे वेगळेच.

ना. ग. जोशी यांची अडचण अशी की पटवर्धनांचे छंदोलक्षण इंग्रजी भाषेवर, गतिशील कलांवर आगगाडीच्या ‘खडाड्-खडाड्’ ध्वनीवर, सागराच्या लहरींवर, इंद्रधनुष्याच्या प्रमाणबद्धतेवर, फार काय, बालकाच्या हातपाय हलविण्यावरही अतिव्याप्त होते; कारण या सर्व घटनांत लयबद्धता आहे. [टीप : ११] पटवर्धनांच्या छंदोलक्षणाची या सर्व घटनांवर खरोखरच अतिव्याप्ति व्हावयास जोशांना हवी असेल, तर वर उल्लेखिलेल्या सर्व घटनांच्या लयबद्धतेबरोबर त्यांचे अक्षररचनात्वहि जोशांना अभिप्रेत असावयास हवे ! इंग्रजी भाषेवर अतिव्याप्ति दाखविताना बहुधा त्या भाषेतील छंद जोशांनी अभिप्रेत केले असावे. त्यावर पटवर्धनांचे छंदोलक्षण ‘अतिव्याप्त’ झाले तरी चिंता नाही; कारण त्यांनी लक्षण ‘छंदा’चे केले आहे; ‘मराठी छंदा’चे नव्हे. आता जोशांनी स्वतःची म्हणून सुचविलेली ‘अक्षरांच्या, कालभाराच्या अनुरोधाने केलेल्या, विशिष्ट परस्परसंमुख योजनेमुळे जी एक प्रकारची “गति” उत्पन्न होते ती “गति”च पद्याचे प्राणभूत तत्त्व होय’ ही जी पद्याची – छंदाची – पुनर्घटित व्याख्या (वास्तविक ही पद्याची व्याख्या नव्हे; असलीच तर ‘पद्याच्या प्राणभूत तत्त्वाची’ असेल) तीत ‘कालभारानुरोधी, परस्परसंमुख (म्हणजे काय?) विशिष्ट अक्षरयोजनेने निर्माण होणरी गति’ या एवढ्या शब्दयोजनेने छंदामधल्या विशिष्ट लयीच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यापलीकडे त्यांनी काय साधले? काही साधलेच असेल तर गौरव तेवढे साधले. जोशांची ही ‘व्याख्या’ फार तर पटवर्धनांच्या व्याख्येतील ‘लय’पदावरील टीप ठरेल.

५. लय म्हणजे काय?

छंदोलक्षणाविषयीच्या या पुष्कळशा वादाचे उगमस्थान अशी जी ही लय, ती चीज आहे तरी काय याचे स्थूल दिग्दर्शन येथे अप्रस्तुत ठरणार नाही. लय ही ज्या अर्थाने तालात, नृत्यात, संगीतात आहे, त्याच अर्थाने छंदात आहे. नृत्यात काय होते? नर्तकाचे शरीर अवकाशाच्या भिन्नभिन्न भागांशी संयोग पावते; आणि या शरीरावकाशसंयोगामधली अंतरे कालमात्रांनी नियत असतात. संगीतात काय होते? निर्विकल्प स्वर हा आरोहावरोहातील भिन्नभिन्न कक्षांशी संयोग पावतो; आणि या स्वरकक्षासंयोगामधली अंतरे कालमात्रांनी नियत होतात. अशी ही दोन वस्तूच्या संयोगाची कालमात्रामेय अशी परंपराच होय. जसे : चालणे ही गति आहे. ती घडते तेव्हा काय होते? चालणार्‍याचे शरीर भिन्नभिन्न देशांशी, म्हणजे भूभागांशी संयोग पावते, आणि या शरीरदेशसंयोगामधली अंतरे कालमेय असतात. ही कालान्तरे जेव्हा विशिष्ट प्रमाणाची म्हणजे नियत असतात, तेव्हा त्या गतीला लय ही पदवी प्राप्त होते. नियतताहीन गति ही लय नव्हे.
लयीचा अनुभव हा तिच्या घटकभूत संयोगाच्या संकलित अनुभवाच्या स्वरूपाचा असतो. एक दुवा म्हणजे साखळी नव्हे; एक फूल म्हणजे हार नव्हे; एक संयोग म्हणजे लय नव्हे. साखळी, हार, लय – या सर्व घटना घटकद्रव्यांच्या परंपरेने साकार होणार्‍या आहेत. परंपरा म्हणजे पूर्वापरभावयुक्त संबंध; समूह नव्हे. फुलांच्या राशीला कोणी हार म्हणत नाही; दुव्यांच्या ढिगाला कोणी साखळी म्हणत नाही. त्याप्रमाणे संयोगांच्या क्रमनिरपेक्ष संघाताला लय म्हणता येणार नाही. म्हणजे लयीचा अनुभव येण्यास तीत एकाहून अधिक घटक असणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्या घटकांमध्ये क्रम असणे आवश्यक आहे.
लय परंपरात्मक आहे, असे म्हणण्यास लयीचा आणखी एक धर्म सूचित करावयाचा आहे. तो म्हणजे लयीतले घटक परस्परांहून विशिष्टतेने म्हणजे पार्थक्याने जाणवण्यासारखे असतात, - मग ही त्यांची विशिष्टता, म्हणजेच अलगपणा, दोन घटकांमध्ये प्रकट होणार्‍या अवकाशामुळे प्रीतीतीला येवो, घटकांच्या विधर्मितेमुळे प्रतीतीला येवो, किंवा लयीतला साधारण घटक निरनिराळ्या अवस्थांत संक्रान्त झाल्यामुळे प्रतीतीला येवो. जसे, आरोहावरोह इत्यादि विशेषांनी रहित, अत्रुटित अशा नादाला लयबद्ध म्हणता येणारा नाही. पण हाच नाद ठरावीक कालमात्रेने येणार्‍या नादाभावरूपी अवकाशाने अथवा नादान्तराने त्रुटित होत राहिला, किंवा भिन्न-भिन्न कंपनसंख्यांनी अस्तित्वात येणार्‍या विभिन्न स्वरकक्षात विशिष्ट कालमात्रेच्या अनुरोधाने संक्रान्त होत राहिला, की त्यात लय निर्माण होते, निर्विशेष गति म्हणजे लय नव्हे. निदान कलेच्या क्षेत्रात तरी लय निर्विशेष असू शकत नाही. कोर्‍या कागदाला कोणी वादासाठी निरभ्र आकाशाचे चित्र म्हणणार असतील तर म्हणोत; पण तशा चित्राला चित्रकलेत काही मूल्य नाही. लय नित्य सविशेष असेत ही गोष्ट दुसर्‍याहि प्रकाराने सिद्ध करता येईल : लय सिद्ध होण्यासाठी तीत अनेक घटक असावे लागतात, हे मागे दाखविले आहेत. आता ज्या वेळी एखादा नाद अविच्छिन्न, अत्रुटित, निर्विशेष असा चालू राहतो, तेव्हा तो आदीपासून अंतापर्यंत एकच वस्तु अथवा घटक ठरतो. मग त्यायोगाने लय कशी सिद्ध होणार? हे सर्व विवेचन ध्यानात घेऊन लयीचे लक्षण करावयाचे झाल्यास ते ‘अनेक घटकांच्या परंपरेने साकार होणारी, अथवा सविशेष अशी, नियत गति म्हणजे लय’ असे निष्पन्न होईल.
एकाच घटकाच्या आवर्तनानी सिद्ध होणारी परंपरा हे लयीचे शुद्ध, मूलभूत आणि अव्यभिचारी स्वरूप होय. पण लय ही एवढ्यापुरतीच मर्यादित नाही; कारण लयीचा आवर्तनी घटक हा नित्य एकसंध अथवा समान उपघटकांनी बांधलेला असतो असे नाही. आवर्तनी घटकाचे हे उपघटक सर्वस्वी अथवा अंशतः सधर्मी असतील, विधर्मी असतील, अथवा एका दृष्टीने सधर्मी असून दुसर्‍या दृष्टीने विधर्मी असतील; आणि त्याप्रमाणे त्या आवर्तनी घटकाची अंतर्गत लय ही शुद्ध अथवा मिश्र स्वरूपाची ठरेल. त्यामुळे मुख्य लयीतील आवर्तनी घटकाच्या अंतर्गत बांधणीतल्या उपलयीत अनंतविध वैचित्र्य संभवते; आणि हेच कलाकाराच्या कसवाचे खरे क्षेत्र होय.

६. ‘अनावर्तनी’ वृत्ते आणि लय

याप्रमाणे लय म्हणजे काय हे एकदा ध्यानात घेतले, म्हणजे पटवर्धनांनी ‘अनावर्तनी’ म्हणून गणिलेल्या वृत्तांविषयीचे पुष्कळसे अपसमज दूर होऊ शकतील. मुळात ‘अनावर्तनी’ म्हणजे लयहीन असे विधान पटवर्धनांनी कोठे केलेले नाही; आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट ही की त्यांनी या वृत्तांना ‘अनावर्तनी’ म्हटले ते त्या वृत्तांच्या चरणांच्या अंतर्गत बांधणीला अनुलक्षून म्हटले. पण या वृत्तात काय किंवा अन्य वृत्तात काय, एका चरणाचा श्लोक कोणी रचिलेला किंवा लक्षिलेला पाहिला आहे काय? आणि जर नाही, तर ही वृत्ते समग्र अर्थाने अनावर्तनी ठरतील तरी कशी? श्लोक नेहमी अनेक (रूढीने चार) चरणांचा असतो, ही साधी गोष्ट खुद्द पटवर्धन, त्यांचे आक्षेपक, त्यांचे समर्थक यांपैकी कोणाच्याहि कशी लक्षात आली नाही याचे आश्चर्य वाटते ! तेव्हा अनावर्तनी नावाची वृत्तेच खरोखर अस्तित्वात नसल्यामुळे त्याविषयीचा वाद हा ‘अगा जे झालेचि नाही...’ या जातीचा ठरणारा आहे. तो उपपन्न झालाच तर ‘विषम’ वृत्तांनाच काय तो उपपन्न होईल. पण विषम वृत्ते ही फारच अल्प, आणि त्यांतूनहि त्यांचा प्रयोग फारच विरळा, त्यामुळे या वादाला पूर्वीइतकी धार राहणार नाही. शिवाय, चरणान्तर्गत मिश्र लयीची पूर्वोक्त शक्यता ध्यानी घेतली, तर विषम वृत्तांचीहि लयदृष्ट्या संगति लाविता येईल. पण ही शक्यता ध्यानी न घेतल्यामुळेच जोशांनी स्वतःच्या ‘श्रुतिसंवंदेनेच्या शक्ती’वर मात्र विसंबून, सुमारे चाळीस पृष्ठे खर्चून तथाकथित अनावर्तनी वृत्तांत पद्मादि आवर्तने दाखविण्याचा भला मोठा निष्फळ खटाटोप केला आहे. या आपल्या खटाटोपात त्यांनी जी ‘यतिस्थानी न थांबता म्हणणी केल्यास’ आढळणारी शार्दूलविक्रीडितातली ‘आवर्तनयुक्त मोडणी’ दिली आहे. [टीप : १२] तिच्या असमंजसतेला तर तोडच नाही. अशा या यतिनिरपेक्ष मोडणीने वृत्ताची लयबद्धता सिद्ध होण्यासारखी असेल, तर ती जुन्या त्रिकांनीच सिद्ध झालेली आहे. मग नवीन गण कल्पून ते या वृत्तात दाखविण्याचा प्रयास कशाला? जोशांच्या या पद्धतीने कोठल्याहि पद्यात, एवढेच नव्हे तर गद्यातहि, कोठल्याहि गणाचे आवर्तन दाखवून ते पद्य अथवा गद्य लयबद्ध असल्याचे सिद्ध करिता येईल.

७. यति [टीप : १३] आणि लय

ही यतीकडे दुर्लक्ष करून वृत्ताची मोडणी समडून घेण्याची कल्पना म्हणजे यतिस्वरूपाविषयीच्या गाढ अज्ञानाचीच निशाणी होय. यतीचे स्वरूप आणि कार्य न आकळल्यामुळेच छंदःशास्त्रात यतीला ‘पद्य म्हणताना श्वास घेण्याच्या सोयीसाठी नियुक्त केलेले स्थान’ मानण्याची वहिवाट पडलेलली आहे. मग तसे त्याविषयी कोणी स्पष्ट विधान केलेले असो किंवा नसो. खरोखर यतीचे प्रयोजन श्वसनसौकर्य हे असते, तर मोठमोठ्या दंडकांच्या चरणांमध्ये सर्वात अधिक यति मानिलेले आढळून येते; पण त्यात तर चरणान्तर्गत यति अजिबात नसतो. याउलट, ‘कन्ये’सारख्या छोटेखानी वृत्ताचे सगळे चरण एका दमात म्हणता येण्यासारखे असल्यामुळे त्यात चरणान्त यतिहि मानण्याची आवश्यकता राहती ना. इंद्रवज्रा आणि शालिनी ही वृत्ते समान अक्षरसंख्येची असताना पहिल्यात चरणान्तर्गत यति नाही, आणि दुसर्‍यात तो आहे, या वस्तुस्थितीची उपपत्ति श्वसनसौकर्यवादी छंदोलक्षक कशी लाविणार आहेत ते कळू दे तरी ! मंदाक्रांतेत चौथ्या आणि दहाव्या अक्षरानंतर असे दोन चरणान्तर्गत यति दिले जातात, ते काय दहा अक्षरे एका दमात म्हणता येत नाहीत म्हणून? चरणान्त यति सर्व वृत्तात निरपवादपणे मानतात; म्हणून चरणान्ती थांबलेच पाहिजे, श्वास घेतलाच पाहिजे, असे थोडेच आहे? चरणान्ती श्वास न घेता कोणी एखादा श्लोक एका दमात म्हटला तर तो अवृत्त ठरतो काय? यावरून ‘यति हा श्वसनसौकर्यासाठी’ ही कल्पना किती भ्रामक आहे ते समजून येईल.

मग यति आहे तरी कशासाठी?

वृत्तात यति आहे तो लयनिर्धारणासाठी. विशिष्ट ठिकाणी निरपवादपणे पदपूर्ति होणे हे त्याचे स्वरूप, आणि वृत्तातले प्रमुख लयघटक अलग करून त्यांचा अन्योन्य संबंध सूचित करणे हे त्याचे कार्य होय. तो चरणान्तीच्या आपल्या उपस्थितीने सामान्यतः मुख्य आवर्तनात्मक लयीचा प्रत्यय आणून देतो; आणि चरणान्तर्गत उपस्थितीने चरणामधल्या उपलयीचा प्रत्यय आणून देतो. भुजंगप्रयात, सुमंदारमाला, दंडकवृत्ते इत्यादिकांच्या चरणांच्या मध्ये तो नसतो, याचे कारण हे चरण शुद्ध आवर्तनात्मक बांधणीचे असतात; आणि त्यांतल्या आवर्तनांचे आद्यन्त इच्छेनुसार, यथासंभव भिन्नभिन्न मानता येण्यासारखे असल्यामुळे विशिष्ट ठिकाणी निरपवाद पदपूर्तीचा निर्बंध त्यांना उपपन्न होऊ शकणारा नाही. पण मिश्रलयात्मक वृत्ताच्या चरणामधले प्रमुख घटक, विशिष्ट ठिकाणी निरपवाद पदपूर्ति या निर्बंधाने अलगपणे प्रत्ययाला आले नाहीत, तर त्यातली लय अननुभूतच राहील; किंबहुना प्रकटच होणार नाही. कारण, चरणान्तर्गत यति हा सधर्मींच्या परंपरेला विधर्मींच्या परंपरेपासून अलग करून त्या दोन्ही परंपरांचा एकमेकांशी आणि असल्यास दुसर्‍या एखाद्या परंपरेशी मात्रासंख्येच्या दृष्टीने तोल साधतो. जसे : मंदाक्रांतेत चरणान्तर्गत दोन यतीमुळे जे तीन खंड होतात, त्यातला पहिला खंड गुरुघटित, दुसरा लघुप्राय, आणि तिसरा मिश्र पण गुरुप्रधान असा असून, त्यांच्या मात्रासंख्येचे गुणोत्तर (२ : २) : ३ असे येते. अशा रीतीने तथाकथित अनावर्तनी वृत्तांचे यतीच्या मागोव्याने संशोधन केल्यास या वृत्तातल्या लयीविषयीची गूढता दूर होईल. यतीकडे दुर्लक्ष करून लय कधीही हाती लागणार नाही. कारण यति हे लयनिर्धारक तत्त्व आहे, यति हा शब्द ज्या संस्कृत धातूवरून साधलेला आहे. त्या ‘यम्’ धातूचाहि अर्थ ‘बांधणे, ठरावीक मर्यादा [ मराठी छंदोरचना, पृ. ८९. २. हा शब्द मूळ संस्कृतात प्रस्तुत अर्थी स्त्रीलिंगी आहे. मराठीत तो पुलिंगी योजिण्याची रूढि आहे] घालणे’ असा असून तो यतीविषयीच्या प्रस्तुत विवेचनाला उपोद्बलक आहे.

छंदःशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची असूनहि अत्यंत उपेक्षित अशी कोणती गोष्ट असेल तर ती यति ही होय. परंपरेने आलाच आहे, म्हणून वृत्तांच्या संदर्भात तेवढा नाइलाजाने यति सांगतात; जातींच्या संदर्भात सहसा कोणी त्याचे नाव काढीत नाही. कोणी काढणारा निघालच, तर तो ‘चरणमध्यावर स्वाभाविकपणे यति येतो’[टीप : १४] अशी माहिती देऊन यतीच्या स्वरूप प्रयोजनाविषयी स्वतःची नितान्त उपेक्षा व्यक्त करितो. वास्तविक विशिष्ट ठिकाणच्या निरपवाद पदपूर्तीने लक्षित असा यति वृत्ता आहे, जातीत आहे, अक्षरीतहि आहे.[टीप : १५] सर्व छंदात तो चरणान्ती निरपवादपणे येतो; चरणामध्ये तो येतो, ते प्रायः मिश्रलयात्मक छंदात. पटवर्धनांनी परिगणित केलेल्या सर्व उपखंडघटित जाति या यतीच्या कार्यक्षेत्रात येतात; कारण या उपखंडांचे अंत निरपवाद पदपूर्तीने बांधलेले आहेत. जातींमध्ये विशिष्ट ठिकाणची निरपवाद अक्षरपूर्ती हाहि दुय्यम स्वरूपाच्या यतीचाच आविष्कार म्हणणे योग्य होय. अशा स्वरूपाचे उपयति वृत्तातहि साचेबंद लगावलींच्य अंती प्रत्ययाला येतील. यति हे याप्रमाणे छंदःशास्त्रातील सर्वव्यापी लयनिर्धारक तत्त्व आहे. त्याचे संशोधन आणि विवेचन हे या शास्त्रातील लयतत्त्वाच्या विवेचनाला अत्यंत उपकारक ठरेल.

 

८. अक्षरगण आणि मात्रागण

त्र्यक्षरी गण अर्थात् त्रिक ही व्यवस्था संस्कृत छंदःशास्त्रकारांनी वृत्तलक्षणविधानाच्या सोयीसाठी कल्पिलेली असून ती पाणिनीच्या अच्, हल् इत्यादि प्रत्याहारांच्या व्यवस्थेशी समान आहे. ‘या गणांचे ज्ञान वृत्तज्ञानासाठी अनिवार्य नाही, वृत्तज्ञान केवळ लघुगुरूंच्या चिन्हांनीहि होऊ शकते,’ हे पटवर्धनांचे म्हणणे खरे असले, तरी लाघवाने आणि उच्चार्य असे लक्षण सांगण्याच्या दृष्टीने ही परंपरागत व्यवस्था उपयुक्त आहे; आणि दंडकांची लक्षणे देताना पटवर्धनांनीहि तिलाच राबविले आहे. त्यांनी नवीन कल्पिलेल्या मत्रागणांचे ‘प. भृ.’ इत्यादि संकेतहि या जुन्या गणांच्याच संकेतांच्या वळणाचे आहेत. तथापि हे गण कृत्रिम असून ते वृत्तांच्या स्वाभाविक, अर्थात् लयानुसारी, खंडांचा बोध करून देण्यास असमर्थ आहेत, हा पटवर्धनांचा अभिप्राय न्याय्य आहे. पण जुन्या पद्धतीतले लाघव आणि नव्या पद्धतीतली लयात्मक मांडणी या दोहोंचा समुच्चय साधणारी एखादी सुबोध व्यवस्था शोधून काढणे हे अशक्य आहे का?
पारंपरिक अक्षरगणांबरोबरच पारंपरिक मात्रागणांचाही पटवर्धनांनी त्याग केला आहे; आणि वृत्तेतर छंदांच्या विवेचनात पद्मावर्तनी (प), अग्न्यावर्तनी, भृंगावर्तनी (भृ.), हरावर्तनी या अनुक्रमे आठ, सात, सहा व पाच मात्रांच्या चारच गणांचा उपयोग केला आहे. त्यक्त गणांपैकी चतुर्मात्रक गणाचाच समावेश त्यांनी स्वतःच्या अष्टमात्रक गणात केला आहे;[टीप : १६] अन्य परंपरागत गणांचा त्याग करण्याची कारणे त्यांनी दिलेली नाहीत. वास्तविक त्यांनीच एका ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे[टीप : १६] ‘विशिष्ट संख्येच्या मात्रेवरील निरपवाद अक्षरपूर्ति’ हेच मात्रागणाचे निर्धारक तत्त्व होय. हे निर्धारक तत्त्व न मानिल्यास, सोळा मात्रांचा गण कल्पून त्यात अष्टमात्रक गणाचा समावेश कोणी करू म्हणेल तर त्याला द्यावयास पटवर्धनांच्या बाजूने उत्तर राहणार नाही. आता हे तत्त्व अनुसरून मात्रागणांचा पुनर्विचार केल्यावर असे दिसते की पटवर्धन ज्यांना उपखंड म्हणतात, ते विविध जातीतील मात्राखंड हे स्वतंत्र मात्रागण असून ते परंपरागत मात्रागणांच्या अस्तित्वाला उपोद्बलक आहेत. हे मात्रागण पटवर्धनांनी स्वीकारिले असते, तर अनावर्तनी म्हणून वृत्ते मानण्याचा प्रसंग कदाचित् त्यांच्यावर आला नसता. याच संदर्भात हेहि सांगितले पाहिजे की पद्मावर्तनी म्हणून मानिल्या गेलेल्या बहुसंख्य जातीत आवर्तनी गणातील सहाव्या आणि सातव्या मात्रांचा एका गुरूच्या रूपाने संयोग झालेला कोठे आढळत नसल्यामुळे तेथे सहा आणि दोन अशा मात्रासंख्यांचे दोन गण मानावे लागतील, आणि तसे केल्यावर पद्मावर्तनी गटाची व्याप्ति पुष्कळच मर्यादित होईल.

 

९. काही विवाद्य छंद

अनुष्टुभ्, वैतालीय, आर्या आणि गीति यांचा समावेश रूढ अशा तीन छंदोवर्गांपैकी – वृत्त, जाति, ‘छंद’ (म्हणजे ‘अक्षरी’) यांपैकी – कोणत्याच वर्गात होत नाही असे म्हणून पटवर्धनांनी त्यांचे विवेचन स्वतंत्रपणे केले आहे[टीप : १७]. वास्तविक छंदांच्या वर्गीकरणाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाप्रमाणे अनुष्टुभाचा समावेश ‘वृत्त’-वर्गात आणि वैतालीयाचा व आर्यागीतींचा समावेश ‘जाति’-वर्गात करावयास हवा. अनुष्टुभांत चरणाच्या पहिल्या अर्धाचा लगक्रम अंशतः आणि दुसर्‍या अर्धाचा लगक्रम पूर्णपणे नियत असून अक्षरसंख्याहि नियत असते;[टीप : १८] आणि वैतालीयात व आर्या-गीतीत मुख्यतः मात्रासंख्या नियत असून विशिष्ट स्थानी लगक्रमाची पथ्यापथ्यता नियत असते.[टीप : १९] गीतीच्या समचरणातल्या चौथ्या चतुर्मात्रक गणाची ‘लगल’ अशी आवश्यक रचना ना. ग. जोशांनी ‘शक्यतो’ या अनावश्यक तरतुदीने मान्य केली आहे.[टीप : २०]
जातिप्रकारांपैकी वादविषय झालेले छंद म्हणजे आरती, दिंडी, भूपति आणि साकी. पटवर्धनांनी आरतीचा समावेश ‘छंदा’त केला होता; पण ती खरोखर जातीत गणावयास हवी, हे सहस्रबुद्ध्यांनी स्पष्ट केले आहे;[टीप : २१] आणि छंदोरचनेच्या परिवर्धित आवृत्तीत (१९३७) पटवर्धनांनीहि या मताला मूक मान्यता दिली आहे, - म्हणजे आरतीविषयीचे जुन्या आवृत्तीतले (१९२७) विधान मुदलीच काढून टाकिले आहे. दिंडीच्या बाबतीत पटवर्धनांनी कामचलाऊ लक्षण देऊन तिच्या पथ्यापथ्याकडे कानाडोळा केला, हा त्यांचा निःसंशय प्रमाद होय. प्रस्तुत जातींच्या लक्षणांची चिकित्सा करून त्यांची लक्षणे निर्दोष करण्याचे श्रेय वि. ज. सहस्रबुद्धे,[टीप : २२] गो. वि. खासगीवाले, श्रीधर कृष्ण गोखले इत्यादिकांना आहे. आक्षेप, चर्चा, चिकित्सा यांशिवाय शास्त्रशुद्धि कधीहि होत नाही.

 

१०. ‘छंदा’चे अक्षरमूल्य

‘छंद’ या छंदोवर्गाचे वैशिष्ट्य त्याच्या अक्षरमात्रनियतत्वात म्हणजेच ‘लगत्वभेदातीत’त्वात असल्याने सांगून, ‘छंदाच्या चरणातले प्रत्येक अक्षर द्विमात्रक असते’[टीप : २३] असे विधान करणार्‍या पटवर्धनांना त्यांच्या आक्षेपकांनी व्याघाताचा दोष दिला आहे,[टीप : २४] तो न्याय्य आहे. ‘छंदा’तले प्रत्येक अक्षर द्विमात्रक मानल्यास ‘छंद’ म्हणजे जातीचाच थोडा शिथिल प्रकार होय, असे मान्य करावे लागेल; आणि लघुगुरुंच्या सर्वसंमत लक्षणांना बाध येईल. शिवाय, असे मान्य करणे हे अनुभवाच्याहि विरुद्ध आहे. ज्या वैदिक छंदांशी साम्य कल्पून पटवर्धनांनी या छंदोवर्गाचे ‘छंद’ असे नामकरण केले आहे, त्यातहि प्रत्येक अक्षराच्या दोन मात्रा मानल्या जात नाहीत.
प्रस्तुत विषयासंबंधाने ना. ग. जोशांनी आपल्या ग्रंथांत जे काही ठिकठिकाणी म्हटले आहे,[टीप : २५] ते आपाततः तरी घोटाळ्याचे असून, ‘छंद’ हे अक्षरनियत म्हणून की मात्रानियत म्हणून त्यांना अभिप्रेत आहेत, त्यांना पटवर्धनांचे समर्थन करावयाचे आहे की खंडन, याचा उलगडा सहजासहजी होत नाही. तथापि सावधानतेने त्यांच्या निरूपणाचा अन्वयार्थ लाविल्यावर आणि ‘पटवर्धनांचे मतच ग्राह्य ठरते’ (पृ. १४६) हा त्यांचा निवाडा वाचल्यावर त्यांना पटवर्धनांचे समर्थनच करावयाचे आहे असा बोध होतो. या समर्थनात त्यांनी ‘ “छंदा”च्या दीर्घाक्षरी चरणाचे उच्चारण हे इतर चरणांच्या उच्चारणाचे प्रमाण’ असा उपन्यास करून, त्याप्रमाणे ‘छंदा’तील सर्व चरण उच्चारात समकाल होण्यासाठी ह्रक्व अक्षराच्या मात्रा कोठे दोन तर कोठे एकच मानून, तर कोठे ‘प्लुत’ मात्रांनी ‘कूस भरून’ काढून मात्रांची भरती केली आहे; आणि ‘छंदा’तील प्रत्येक अक्षर सरासरीच्या हिशेबाने द्विमात्रक ठरवून पटवर्धनांच्या बाजूने कौल दिला आहे. या सार्‍या कसरतीला आधार म्हणून त्यांनी आपल्या नित्याच्या परिपाठाप्रमाणे एका गुजराती ग्रंथाचा (गैरलागू) हवाला देऊन घड्याळाच्या टिकटिकीलाहि साक्षीस बोलाविले आहे. हा त्यांचा सर्व प्रयत्न चुकीच्या गृहीतावर आधारलेला, अनाठायी आणि विसंगतिपूर्ण आहे. ‘हे सर्व गेय छंदाविषयी’ (अगेय छंद कोणते?) असे म्हणून ‘ग्रांथिक ओवी = मुक्त शैली’ अशी त्यांनी ओवीच्या बाबतीत सोडवणूक करून घेतल्याने त्यांच्या वरील प्रतिपादनातील तर्कदुष्टता उणावत नाही.
तर्कसंगति न सोडता ‘छंदा’विषयी काही म्हणावयाचे झाल्यास एवढेच म्हणता येईल की –
१. ‘छंदा’ची स्वैर रचना पूर्वसिद्ध आहे: त्यात अभिप्रेत नसलेला साचेबंदपणा त्यावर मागाहून आरोपित करणे युक्त नव्हे. त्यांना केवळ अक्षरसंख्येचे स्थूल बंधन तेवढे मानावे; मात्रांची संगति घालण्याचा अट्टहास करू नये. स्थूल अक्षरसंख्येच्या नियमाने आणि प्रायिक यमकाने त्यात जेवढी लयबद्धता येईल, तेवढी वर समाधान मानावे. वैदिक ‘छंदा’त मात्रांची गणना करीत नाहीत.
२. म्हणीवरून अथवा चालीवरून छंदांचे लक्षण ठरवू नये. एकच पद्य वेगवेगळ्या चालीत म्हणता येते; त्यावरून ते अनेक छंदात असल्याचा हास्यास्पद निष्कर्ष निघू लागेल.
३. मात्रासंख्येने नियत असे ‘छंद’ हे ‘छंद’च नव्हत; ते जाति होत.

 

११. छंद, चाल, ताल आणि प्लुति

खरोखर छंदांच्या संगीतस्वराशी अथवा संगीततालांशी लक्षणदृष्ट्या काहीहि संबंध नाही. छंदांची लक्षणे म्हणजे पद्यांची संगीतस्वरात्मक किंवा संगीततालात्मक ‘नोटेशन्स’ नव्हेत. आणि ही गोष्ट तात्त्विक विवेचनाच्या प्रसंगी काही छंदोविमर्शक मान्यहि करितात;[टीप : २६] पण प्रत्यक्ष छंदांची लक्षणे ठरविण्याच्या वेळी मात्र न कळत सवयीची चाल गुणगुणत लक्षणे ठरवितात.[टीप : २७] ‘मराठी छंदोरचने’त तर पदोपदी ‘म्हणणी’ला कौल लावून छंदोलक्षणे घडविली आहेत. अभंगांना मात्रिक रचना म्हणण्यात भवानीशंकर पंडितांनी तोच मार्ग अनुसरिला आहे.[टीप : २८] कित्येक छंदांच्या लक्षणांमध्ये ‘ऽ’ या अवग्रहचिन्हाच्या मालिकेने प्रकट होणारी निरक्षर मात्रांची ‘प्लुति’ हीहि छंदोलक्षकाच्या मनावर असलेल्या सवयीच्या चालीच्या प्रभावाचीच निदर्शक होय.
या निरक्षर मात्रांचे वळसे ‘छंदोरचने’त पटवर्धनांनी शेकडो छंदांना दिलेले आढळतात. असे करणे हे त्यांनी मुळात स्वीकारलेल्या ‘छंदांचा चालीशी संबंध नाही’ या भूमिकेशी विसंगत तर आहेच. पण त्याहून नवल हे की इतक्या छंदांच्या घटनेत आणि एकेका चरणात सहा-सहा इतक्या मर्यादेपर्यंत निरक्षर मात्रा अंगभूत म्हणून नांदत असल्याचे प्रामाणिकपणे वाटत असताना ‘पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना’ या निष्कर्षाला पटवर्धन पोहोचले तरी कसे? याहूनहि गंमत ही की ते या मात्रा छंदांच्या लक्षणात दाखवितात, पण मोजत नाहीत.[टीप : २९] मात्रा दाखवायची, पण मोजायची नाही, ही कोठली रीत? एका सावकाराच्या मुलांमध्ये मृत्युपत्राप्रमाणे हत्तींचे वाटप करता येण्यासाठी त्यात स्वतःच्या एका हत्तीची भर घालणार्‍या आणि वाटप होताच आपला हत्ती अलगद काढून घेणार्‍या एका हुशार प्रधानाची गोष्ट सांगतात. त्या प्रधनाचीच हातचलाखी या निरक्षर मात्रारूपी हत्तींच्या दळाने पटवर्धनांनी करून दाखविली आहे ! हा आरोप टाळण्यासाटी या निरक्षर मात्रा मोजायच्या ठरविल्या, तरी विसंगति टळत नाही; कारण मग लवंगलता आणि दयिता, शुभगंगा आणि वर्षा, कर्णफुल्ल आणि राजसा, उद्धव आणि आनंदरस – यांमध्ये भेदच राहणार नाही. निरक्षर मात्रांचे अस्तित्व आणि कालिकविरामात्मक यति या दोहोंहिवर श्रद्धा असलेल्या पटवर्धनांवर, यतिस्थानी यथेष्ट निरक्षर मात्रा दाखवून आवर्तनांची पूर्ति करण्याची सोय अनायासे उपलब्ध असताना, ‘अनावर्तनी’ म्हणून वृत्ते मानण्याचा प्रसंग यावा, ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे. तात्पर्य, पटवर्धनांच्या (जोशांच्याहि) छंदोलक्षणात या निरक्षरांनी कमालीचा गोंधळ घातला आहे. शास्त्रशुद्धि हवी असेल, तर छंदःशास्त्रात या निरक्षरांच्या कोलांट्यांना - ‘प्लुतीं’ना बंदी केली पाहिजे; आणि छदांची पुन्हा एकवार मोजदाद केली पाहिजे; छंदःशास्त्र निरक्षरांचे नाही; साक्षरांचे आहे.
‘प्लुत’ उच्चार ही कल्पना व्याकरणातल्या ह्रस्व-दीर्घ कल्पनेशी समकक्ष असून छंदःशास्त्रातील लघु-गुरु कल्पनेहून सर्वस्वी भिन्न आहे. ह्रस्व-दीर्घ-प्लुत या चढत्या श्रेणीत अक्षरांच्या लांबीचा विचार आहे; लघु-गुरु या श्रेणीत अक्षरांच्या वजनाचा विचार आहे. पहिल्यात लांबीची मोजणी साक्षात् उच्चारणकालमेय आहे; दुसर्‍यात वजनाची मोजणी साक्षात् उच्चारणप्रयत्नमेय आणि परंपरेने उच्चारणाकालमेय आहे. हेमचंद्राने दीर्घाप्रमाणे प्लुतालाहि द्विमात्रक अर्थात् गुरु मानिले आहे. पटवर्धनांनी प्लुत हा विवेचनात तेवढा त्रिमात्रक सांगितला आहे;[टीप : ३०] पण प्रत्यक्ष छंदोलक्षणात सुरवातीचा ‘गुरु’ आणि पुढच्या निरक्षर मात्रा मिळून आठ-आठ मात्रांपर्यंत दाखविला आहे. त्यांचा सर्वात मोठा मात्रागण अष्टमात्रक नसता, तर त्यांच्या प्लुताची मात्रासंख्या याहि मर्यादेपलीकडे गेली असती. असा हा वेदान्तातल्या आत्म्याप्रमाणे ‘अणोरणीयान् महतो महीयान्’ असलेला प्लुत म्हणजे छंदोलक्षकाची कामधेनुच होय. त्याच्या साहाय्याने कोणत्याहि छंदाचे आपल्या इच्छेप्रमाणे लक्षण सांगून त्याचे समर्थनहि करिता येईल. मग एकाच पद्याचे अनेक वैकल्पिक छंदहि संभवतील; आणि जुन्या काळचे हरदास-कथेकरी शार्दूलविक्रीडित श्लोकात अधेमधे निरक्षर मात्रांची भर घालून त्यांचे स्रग्धरेत रूपांतर करण्याची किमया करीत, तसा प्रकार छंदःशास्त्रात राजरोस चालू होईल. असे झाले म्हणजे हे शास्त्र लिहिण्यास अत्यंत सोपे आणि कळण्यास सर्वथा अशक्य (आणि अनवश्यक) होऊन बसेल !

 

१२. छंदांच्या निर्धारणाचे प्रमाण

याप्रमाणे छंदांची लक्षणे निर्धारित करण्याच्या कामी घेण्यात येणारा ‘म्हणणी’चा आणि त्याबरोबर ‘प्लुती’चा आधार सुटल्यावर त्यांचे कैवारी साहजिकच प्रश्न विचारतील की : छंदांच्या निर्धारणात जर म्हणणी मानावयाची नाही, तर काय प्रमाण मानावयाचे? ‘पद्यातील प्रमाण (standard) उच्चार’ एवढेच याचे उत्तर आहे. जसे भाषेतील, तसे पद्यातीलहि संकेत शतकानुशतकांच्या प्रयोगाने रूढ झालेले असतात. असे भाषेतील मूलभूत रूढ संकेत झुगारले, - म्हणजे शब्दांचा प्रयोग सर्वमान्य अर्थांनी न करता स्वकल्पित अशा स्वतंत्र अर्थाने केला (जसे, ‘भिंत’ – शब्दाचा ‘पुस्तक’ अशा अर्थाने, ‘जेवणे’ याचा ‘मरणे’ अशा अर्थाने), रूढ आघात (accent) अव्हेरून भलत्याच अक्षरावर आघात देऊन शब्द उच्चारिले, इत्यादि – तर तसे करणार्‍याचे बोलणे अनाकलनीय आणि हास्यास्पद होईल; किंबहुना, त्याचे भाषात्वच लोपेल. त्याचप्रमाणे पद्यातील मूलभूत रूढ संकेत (प्रमाण उच्चार, यति इत्यादि) झुगारून पद्य रचिले, तर ते पद्य म्हणून अनाकलनीय आणि हास्यास्पद होईल; किंबहुना, त्यांचे पद्यत्वच लोपेल. पद्याची लय त्याच्या अक्षररचनेतून म्हणजे लगक्रमातून, मात्रावर्तनातून अथवा अक्षरावर्तनातून प्रतीतीला यावयास हवी; त्याच्या ‘म्हणणी’त पेरलेल्या संगितालापातून अथवा तालमात्रातून नव्हे. चालीतून प्रतीतीला येणारी लय ही पद्याची अथवा छंदाची अंगभूत लय नव्हे; ती संगीतबंधनातून अथवा तालबंधातून प्रकट होणारी त्या पद्यावर अथवा छंदावर आरोपित अशी लय होय. ‘अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये । नि होता सत्सि बर्हिषि ।।’ (सामवेदसंहिता १) या ऋचेच्या लगक्रमानुसारी पठनाने प्रतीतीला येणारी जी लय, ती त्या ऋचेची अथवा तिच्या गायत्री छंदाची अंगभूत लय होय. उलट, या ऋचेवर आधारलेले ‘ओऽग्नाइ ।। आयाहिऽ३ वोइतोयाऽ२इ’। गृणानोह । व्यदातोयाऽ२इ । तोया२ऽइ ।। नाईहोतासाऽ२३ ।। त्साऽ२ इबाऽ२३४ औहोवा ।। हीऽ२३४षी ।।’ हे जे गोतमाचे ‘पर्क’ (सामवेद-प्रकृतिगान १), त्यातून प्रतीतीला येणारी लय ही गानप्रभव लय होय; ती गायत्री छंदाची लय नव्हे. एकूण, पद्याक्षरांच्या लगमूल्यानुसारी पठनाने निर्माण होणारी लय ही पद्याच्या छंदाची स्वतःची लय होय. हे पठन दीर्घाचे सर्वत्र गुरुत्व, ह्रस्वाचे परिस्थित्यनुसा लघुगुरुत्व, इत्यादि परंपरानिर्धारित प्रमाण उच्चारांच्या नियमाने निबद्ध असल्याने पद्यातील प्रमाण उच्चार हेच छंदाच्या निर्धारणाचे प्रमाण होय; कारण, छंद म्हणजे पद्याची लगमूल्याधिष्ठित लयाकृति होय.
आता हे प्रमाण उच्चार धाब्यावर बसवून जे पद्यरचना करितात, त्यांच्या त्या रचनेला पद्य म्हणावयाचे की नाही? म्हटल्यास, त्यांचे छंद कसे निर्धारित करावयाचे? असे प्रश्न कोणी विचारील. हे प्रश्न पुढील प्रश्नांच्या धर्तीचे आहेत : अगदी लहान मुलांच्या, केवळ त्यांच्या आईवडिलांनाच कळणार्‍या, बोलण्याला भाषा म्हणावयाचे की नाही? लहान मुलांनी काढलेल्या चित्रांना चित्रे म्हणावयाचे की नाही? अर्थात्, लहान मुलांचे बोलणे हे जसे अगदी मर्यादित अर्थाने भाषाच होय, आणि त्यांची चित्रेहि मर्यादित अर्थाने चित्रेच होत. त्याप्रमाणे प्रमाण उच्चारांना न अनुसरणारी पद्यरचना ही मर्यादित अर्थाने पद्यच होय; पण ते अविकसित, शिथिल अथवा हीन पद्य म्हटले पाहिजे. त्यातील छंद शोधून काढण्याचा खटाटोप हा एक तर लहान मुलांच्या बोलण्याचे अथवा चित्रांचे कौतुक करण्यासारखा आहे, किंवा उत्खननात सापडलेल्या अश्मयुगीन मानवाच्या आयुधांचा अभ्यास करण्यासारखा आहे.

कोणी म्हणेल ‘हे लगमूल्याचे पंडिती नियम पंडितांनाच लखलाभ होवोत. आम्ही आपली आम्हाला सुचेल-रुचेल तशी पद्यरचना करू, म्हणू आणि वाखाणू’ येथे हे ध्यानात घेतले पाहिजे, की ही लगमूल्याची कल्पना कोणा पंडिताने आपल्या लहरीतून निर्माण करून पद्यावर लादलेली नाही; तर ती शतकानुशतकांच्या पद्यरचनेच्या परंपरेतूनच मूर्त होऊन मान्यता पावलेली आहे. दुसरी एखादी समबल मूल्यकल्पना पद्यक्षेत्रात येऊन रुजेपर्यंत तिची या क्षेत्रातील मान्यता अबाधितच राहणार. तिला न जुमानणारे पद्य अन्य काही मूलगामी तत्त्वावर अधिष्ठित असेल तरच छंदाच्या दृष्टीने विचारार्ह ठरेल. कारण, कसलेच नियम – स्वांतर्भूत असेहि – न पाळणारी रचना ही कलाकृतीच्या प्रतिष्ठेला पोहोचू शकणार नाही. असे लगमूल्याव्यतिरिक्त एखादे मूलगामी समर्थ तत्त्व सध्या तरी पद्यक्षेत्रात प्रभावी झालेले दिसत नाही. नाही म्हणावयास ‘राजा शिवाजी’ या काव्याचे कर्ते महादेव मोरेश्वर कुंटे यांनी ‘पद्यातील उच्चार बोलण्यातील उच्चारांसारखे असावे’ असा पुरस्कार केला आहे. पण त्यांना या बाबतील प्रायः कोणी अनुयायी मिळालेले दिसत नाहीत; फार काय, त्यांनी स्वतःच आपल्या काव्यात या तत्त्वाचे सार्वत्रिक पालन केलेले आढळत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सांप्रतहि उच्चारतः गद्य हे आघात (accent) मूल्याधिष्ठित तर पद्य हे लगमूल्याधिष्ठित राहिले आहे. प्रस्तुत ‘पद्यातील उच्चार’ या विषयासंबंधात पटवर्धनांनी काही विचार केला आहे. त्यातली ऋ या स्वराविषयीची त्यांची विधाने आणि शिफारसी, ‘अक्षरा’ची व्याख्या, ‘विवृतसंवृत’ या संज्ञांचे विवरण इत्यादि गोष्टी[टीप : ३१] चिंत्य (आणि उपेक्षणीय) आहेत.
प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने, मराठी पद्यकाराला पद्यरचनेत रूढीने जे ‘निरंकुशत्व’ दिले आहे, त्याच्या ‘मर्यादां’चे पटवर्धनकृत दिग्दर्शन[टीप : ३२] पद्यकाराचा ‘अंकुश’ म्हणूनच उल्लेखावयास हवे. मराठी पद्यातील शब्द र्‍हस्वदीर्घांच्या बाबतीत गद्यातल्याइतके रोखठोक नसतात, आणि जुन्या भाषेतील रूपे पद्यात रेंगाळत राहिल्याने पद्यातील रूपांचे वैविध्यही पुष्कळ असते, हे खरे. पण या बाबतीतले स्वातंत्र्य पद्यकाराने परंपरेच्या मर्यादा न उल्लंघिता अनुभविणे योग्य होईल. ‘अपि भाषं मषं कुर्यात्, छन्दोभङ्गं न कारयेत्’ ही ‘स्थितस्य गतिः’ आहे; सवलतीचा दाखला नव्हे. किंबहुना, ‘कारयेत् कुर्यात्’ या प्रयोगावरून पाहिले, तर ‘अस्माकूणां नैयायिकानाम अर्थरि तात्पर्यम, न तु शब्दरि’ यातल्या प्रमाणे प्रस्तुत ‘भाषोक्ती’तही अव्याकरणिक प्रयोगांचा उपहासच प्रामुख्याने अभिप्रेत असावासे वाटते.

 

१३. मुक्तपद्य, मुक्तछंद[टीप : १४] आणि मुक्तशैली

छंदोमयी रचना करिताना पुष्कळदा असे होते की कधी छंदात बसत नाही म्हणून, तर कधी यमक जुळत नाही म्हणून, कवीला सोपा शब्द टाकून कठीण शब्द किंवा रुचीचा टाकून अरुचीचा शब्द योजावा लागतो; तर कधी ठरावीक चरणसंख्या भरण्यासाठी अर्थपोष होत नसतानाहि भरीला शब्द घालावे लागतात. या आणि अशा जाचक बंधनातून सुटून भाषाभिव्यक्तीचे लयबद्ध पण सुकरसुगम असे वहन निर्माण करण्याची मराठी कवींची आकांक्षा प्रथम विठोबाअण्णांच्या[टीप : ३४]आणि इतरांच्या कटिबंधात अस्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे. यापुढचा या दिशेने झालेला प्रयत्न म्हणजे यमकबंधन, कडवकबंधन आणि चरण-वाक्यांच्या मेळाचे बंधन- या तीन बंधनातून मुक्त अशी विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘गोमांतक’ काव्यातील इंग्रजी ‘ब्लँक व्हर्स’च्या धर्तीची रचना. तथापि प्रत्येक चरण विशिष्ट मात्रावलीचा हे बंधन सावरकरांनी पाळलेले असल्यामुळे छंदःशास्त्रांच्या दृष्टीने पाहता त्यांची ही रचना ‘जाति’ वर्गातील रूढ प्रकारातच मोडणारी आहे.
या क्षेत्रातील पुढची कक्षा अशी, इंग्रजी ‘फ्री व्हर्स’च्या वळणाची, ‘मुक्तछंद’ या नावाने वावरणारी रचना मात्र ‘छंद’ वर्गातील रूढ प्रकारात मोडण्यासारखी नाही. आत्माराम रावजी देशपांडे, वामन नारायण देशपांडे, आणि त्यांच्याही पूर्वी पुरुषोत्तम शिवराम रेगे यांनी हाताळलेल्या आणि रुळविलेल्या या रचनेने - ‘छंद’ हे आपले नाव सार्थ करण्यापुरते स्थूल अक्षरसंख्येने अथवा मात्रासंख्येने नियमित अशा सर्वात लहान आवर्तनी चरणकाचे तेवढे बंधन स्वीकारले आहे; आणि मुक्तपद्यात अनुसरिलेले चरणाच्या ठराविक लांबीचेही बंधन टाकून दिले आहे. काही आधुनिक मराठी कवितात आढळणार्‍या गद्यप्राय रचनेला ना.ग.जोशी ‘मुक्त शैली’ असे नाव देतात, आणि ग्रंथगत ओवी ही मराठीतील पहिली मुक्त शैलीची रचना मानतात.[टीप : ३५] येथे हे लक्षात घेतले पाहिजे की ओवी ही अक्षरसंख्येने स्वैर असली तरी यमकबद्ध असते. त्यामुळे समग्र चरणात मिळून लयीचा प्रत्यय यावयास रेंगाळणला, तरी तो चरणान्ती खचित येतो. ‘मुक्त-शैली नामक गद्यप्राय रचनेत मात्र यमकाच्या अभावी तो दुःसाध्य आहे.’
पटवर्धनांना मुक्तच्छंदी रचना मंजूर नाही.[टीप : ३६] त्यांच्या मते प्रत्येक चरण समान आवर्तनांनी घटित असणे हे पद्यरचनेची किमान अट आहे. त्यांचे हे मत मराठी कवींना मानवलेले नाही, हे गेल्या काही वर्षांतील विपुल मुक्तच्छंदी रचनेवरून उघड होते. पटवर्धनांनी मुक्तच्छंदाला नाक मुरडले आहे ते दोन गोष्टींसाठी : त्याचे अक्षरनियतत्व आणि त्यांचे विषम चरण. पण या गोष्टी त्यांना संमत असलेल्या रूढ छंदःप्रकारात आहेतच की! सहस्रबुद्ध्यांनी छंदोमय रचनेच्या इतिहासाचा दाखला देऊन मुक्तछंद ही परागति ठरविली आहे.[टीप : ३७] त्यांच्या मते ज्ञानदेवांची ओवी हीही परागति ठरावी. या संदर्भात ज्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते ती ही की मुक्तच्छंदाचा पुरस्कार आणि स्वीकार ज्यांनी केला, त्यांनी तो रूढ छंदःप्रकारात रचना करण्याच्या अशक्तीमुळे नसून काही एका वैचारिक भूमिकेवरून जाणीवपूर्वक केला. गांधीजी जाडीभरडी वस्त्रे वापरीत, ते काय त्यांचे मागासलेपण समजावयाचे?

 

१४. छंदांचे परिगणन आणि नामकरण

वृत्त, जाति, ‘छंद’ (= अक्षरी) मिळून १३००च्यावर प्रकार ‘छंदोरचने’ने लक्षिलेले असून त्यात वृत्तेच जवळ-जवळ हजार आहेत. वृत्तांची ही संख्या दिसण्यास प्रचंड असली, तरी त्यांतली बहुसंख्य वृत्ते ही प्रस्तारांच्या गणित संयोगांनी घडलेली, खरोखर प्रयोगात्मकच आहेत; अर्थातच त्यांची उदाहरणे छंदःशास्त्रावरील ग्रंथांहून अन्यत्र आढळत नाहीत. या हजार वृत्तांपैकी प्रचारातली अशी वृत्ते चाळीसच्या सुमारास आणि त्यांतली ही बहुप्रयुक्त वृत्ते वीसच्या जवळपास असेलली आढळतील. ‘छंदोरचने’त लक्षिलेल्या जाती २६० आहेत. पण त्यातल्या मूलभूत जाति शंभराच्या आसपास असाव्या; अवशिष्ट जाति या मूलभूत जातींच्या विविध चरणांचे जोडणीने घडलेल्या आहेत. पटवर्धनांनी ‘छंद’ ५३ दिले आहेत. त्यांनी न लक्षिलेल्या आणखी ५३ छंदांचा परामर्श निशिकांत करकरे यांनी केला आहे;[टीप : ३८] त्यात त्यांनी मुक्तच्छंदाचाही अंतर्भाव केला आहे. ना. ग. जोशी यांनी आणखी २६ छंदांचे ‘नवे’ अथवा ‘अलक्षित’ म्हणून परिगणन (आणि नामकरण) केले आहे.[टीप : ३९] तथापि मागे चर्चिलेल्या कारणांमुळे[टीप : ४०] या सर्व छंदांची लक्षणे पुन्हा एकवार शुद्ध छंदःशास्त्रीय तत्त्वांच्या निकषाने तपासून त्यांची संख्या निर्धारित करणे आवश्यक आहे.
परंपरागत जुन्या छंदांची नावे त्यांच्य प्रसिद्ध उदाहरणातील एखाद्या संस्मरणीय ललित शब्दाच्या अनुरोधाने योजिलेली असावी, अशी उपपत्ति मांडून[टीप : ४१] पटवर्धनांनी त्याच पद्धतीने नवलक्षित छंदांची नावे सुचविलेली आहेत. इंद्रवज्रा, वातोर्मि इत्यादि छंदोनामांचा उगम वैदिक ऋचात संभवत असल्याचे यशवंत गणेश फफे यांनी दाखविले आहे;[टीप : ४२] तेहि पटवर्धनांच्या उपपत्तीला पोषक आहे. अर्धसम अथवा विषम घटनेच्या पुष्कळशा छंदांना त्यांच्या घटकांच्या स्वतंत्र नावावरून संक्षेपाने बनविलेली नावे देण्याचा प्रयोग कोणीतरी करून पहाण्यासारखा आहे. यामुळे त्या त्या छंदांची सापेक्ष घडण तर ध्यानात येईलच; शिवाय छंदांच्या नावांचा अकारण पसाराही वाढणार नाही. जसे, ‘आख्यानकी’ – ऐवजी ‘इंद्रोपेंद्रा’; ‘शिशिरा’ऐवजी ‘इंद्रवंशस्थ’; ‘तनुतमा’ – ऐवजी ‘द्रुतप्रमिता’; ‘सदामंडिता’- ऐवजी ‘कुलकभगिनी’; ‘मन्मथसुंदर’- ऐवजी ‘हरिहरिणी’; ‘स्वतंत्र’ – ऐवजी ‘चंद्रकांतकला’, इत्यादि.

 

१५. छंदांचा विकास आणि इतिहास

छंदांच्या विकासाचा थोडा विचार छंदोविषयक ग्रंथात आणि स्फुट लेखात आढळतो. सर्वात जुनी अक्षरनियत छंदोमयी रचना वैदिक वाङ्मयात आहे, याबद्दल दुमत नाही. या वैदिक छंदातून नियत लगक्रमाच्या संस्कृत वृत्तांचा विकास झाला, हेही बहुतेक सर्वमान्य आहे. हा वृत्तांचा विकास होत असतांनाच दुसरीकडे प्राकृतात ‘जाति’ या मात्रानियत प्रकाराचा विकास होत गेला, असे ना.ग. जोशी यांनी प्रतिपादिले आहे.[टीप : ४३] पटवर्धनांनी आवर्तनी वृत्तांचा उगम जातीत मानिला आहे.[टीप : ४४] बार अक्षरांपर्यंत चरणमर्यादा असलेली वृत्ते आणि जाति या दोहोंचाहि उगम वैदिक छंदातच असल्याचे यशवंत गणेश फफे दाखवितात.[टीप : ४५] मराठी जाति-पद्यरचनेत लोकप्रिय असलेली ‘ध्रुवपद +अंतरा’ या मोडणीची रचना वेदात पुष्कळ आढळत असल्याचे त्यांनी दाखविले आहे. नरसिंह चिंतामण केळकर. हे जातीपेक्षा दाखविले आहे. नरसिंह चिंतामण केळकर हे जातीपेक्षा वृत्त जुने समजतात.[टीप : ४६] या विषयात उपलब्ध अशा सर्व साधनांचा परामर्श करून सर्वस्पर्शी अशी एखादी उपपत्ति सविस्तर मांडण्यास अजून पुष्कळ अवसर आहे. प्रसिद्ध छंदःप्रकारांचा जुन्यात जुना प्रयोग वाङ्मयात कोठे आढळतो, याचाहि शोध घेण्यासारखा आहे. तो घेतला म्हणजे ‘मंदाक्रांता वृत्त ही कालीदासाची वाङ्मयाला बहुमोल देणगी होय’ असे जे कोणी म्हणतात,[टीप : ४७] त्यातील तथ्य अजमाविणे सुकर होईल. साकी, दिंडी, अभंग, ओवी इत्यादि ‘खास मराठी’ समजल्या जाणार्‍या छंदांच्या नावांचे आणि परंपरेचे विवेचन ‘मराठी छंदोरचने’त अन्यमतविमर्शपूर्वक केलेले आहे.[टीप : ४८] राजवाड्यांचा ‘मराठी छंद’ हा निबंध याच विषयाची चर्चा करणारा आहे. विस्तारभयास्तव त्यांचा येथे केवळ उल्लेखापलीकडे परामर्श करता येत नाही. छंदःशास्त्राचा इतिहास पटवर्धनांनी एक प्रकरणात दिला आहे. तो याहून विस्ताराने आणि साक्षेपाने लिहिला जाणे आवश्यक आहे. त्यात अन्य नवभारतीय भाषांतील छंदःशास्त्रविषयक ग्रंथांचा परामर्श झाल्यास आणखी उत्तम, अन्यभाषीय ग्रंथांपैकी एक हिंदी आणि एक गुजराती एवढ्या दोनच ग्रंथांचा परामर्श पटवर्धनांनी केला आहे. अशा पंचवीस ग्रंथांचा संक्षेपतः परामर्श केल्यावर, छंदःशास्त्राच्या सिद्धान्तांचा आणि छंदःप्रकारांच्या विकासाचा विमर्श त्यांपैकी एकातही आढळत नसल्याच्या असमाधानाने त्या प्रकरणाचा उपसंहार करून पटवर्धनांनी ‘छंदोरचने’ची रुजवात करून दिली आहे. ते असमाधान ‘छंदोरचने’च्या अवतारानंतरहि सर्वस्वी दूर झालेले नाही, हे मागे चर्चिलेल्या विषयावरून ध्यानात येईल.
मराठीतील परंपरागत लोकप्रिय अशा काही पद्यरचनांचे छंदःशास्त्रदृष्ट्या विवेचन करण्यासाठी बरेच आलोडन आणि संकल्पन करून ना.ग. जोशी यांनी आपल्या ग्रंथात तीन प्रकरणे लिहिली आहेत. त्यांपैकी एकात त्यांनी ‘धवळे, आरत्या’ इत्यादि भक्तिपर प्रकारांचा, दुसर्‍यात ‘लावण्या-पोवाडे’ या शाहिरी रचनांचा. आणि तिसर्‍यात ‘स्त्रीगीते, बालगीते, उखाणे, हादग्याची गाणी, कहाण्या’ इत्यादि लौकिक रचनांचा परामर्श केला आहे. ज्याला म्हणून छंदाचा थोडाफार गंध आहे, असा बहुधा एकही जुन्या मराठी पद्यवाङ्मयातली प्रकार या तीन प्रकरणांबाहेर राहणार नाही.

 

१६. लयबद्धता आणि भावनाविष्कार

पद्यात्मक रचनेचा सामान्यतः काव्याशी आणि विशेषतः भावनाविष्काराशी काय संबंध आहे, हा विषय वास्तविक छंदःशास्त्राचा नव्हे. तथापि एक आनुषंगिक विषय म्हणून त्याचा परामर्श काही छंदोग्रंथात केलेला आहे. यासंबंधीच्या मतांची चर्चा करून, पद्यात्मकता ही काव्याला आवश्यक नव्हे तरी पोषक आहे, कारण लयबद्धतेमुळे ती भावनाविष्काराला अनुकूल आहे, असा निष्कर्ष रामचंद्र श्रीपाद जोग यांनी काढिला आहे.[टीप : ४९]असाच अभिप्राय पटवर्धनांनीहि व्यक्त केला आहे.[टीप : ५०]
पण लयबद्धता ही भानाविष्काराला अनुकूल आहे, हे म्हणणे यथार्थ आहे का? लयबद्धतेचा आणि तिच्या द्वारा पद्यात्मकतेचा भावनांशी संबंध असता, तर भावनांची अभिव्यक्ति अधिक उत्कट होण्यासाठी (ज्यांना शक्य आहे त्यांनी) संभाषणातहि पद्याचा अवलंब केला असता: आणि गद्यातहि उत्कट भावनाविष्कार प्रतीतीला येतो तो आला नसता. विशिष्ट छंदांचा विशिष्ट भावनांशी जोडलेला संबंधही असाच भ्रममूलक आहे. तसा काही संबंध असता, तर एकाच छंदात अनेक रसांच परिषोष झालेला वाङ्मयात दृष्टीस पडतो तो पडला नसता. भावनांशी संबंध शब्दांच्या अर्थांचा आहे; त्यांच्या गद्य आणि पद्य या बाह्य पेहरावांचा नाही.
तर मग एखादा भाव गद्यस्वरूपाने मांडला असता होणार्‍या परिणामाहून, तोच पद्यस्वरूपाने मांडला असता होणारा परिणाम अधिक आढळून येतो, तो कशाने? – तो गद्यगत सौंदर्याहून पद्यगत सौंदर्य अधिक असल्याने येतो. शब्दार्थ तेच असताना केवळ शब्दातून आणि अर्थातून अभिव्यक्त होणारे सौंदर्य गद्यपद्यात परिणामतः समान असते. ते सौंदर्य लयबद्धतेमुळे स्वतंत्रपणे प्रकट होणार्‍या सौंदर्याने पद्यात प्रगुणित होते. याप्रमाणे गद्याहून पद्यामध्ये परिणामाधिक्य आढळते, ते पद्यातील सौंदर्याच्या परिणामाधिक्यामुळे होय. एखादे पद्य नुसते सरळ वाचण्याने होणारा परिणाम आणि ते सुरेलपणे गाण्याने होणारा परिणाम यामध्ये फरक का पडतो?- तर दुसर्‍या पक्षी शब्दार्थनिष्ठ सौंदर्यात स्वरनिष्ठ सौंदर्याची भर पडलेली असते म्हणून. स्वरसंगीताला वाद्यसंगीताची साथ मिळाल्यामुळे परिणामात पडणारा फरक याच स्वरूपाचा असतो. सारख्याच काळात दोन मजुरांनी केलेल्या कामाहून चार मजुरांनी केलेले काम अधिक होते, हे काळ-काम वेगाच्या गणितातले अगदी साधे उदाहरण आहे.
भिन्न क्षेत्रातील भावांचा – वस्तूंचा – परस्परांशी काल्पनिक संबंध जोडण्याची प्रथा आपल्याकडे फार प्राचीन कालापासून आहे. दिवसातील विशिष्ट प्रहरांचा विशिष्ट रसाशी, यादृच्छिक घटनांचा भविष्यातील वैयक्तिक जीवनाशी संबंध. जोडण्याची हौस मानवी- विशेषतः भारतीय – मनाला विलक्षण आहे. तिच्या परंपरेत, दिवसाच्या कोणत्या प्रहरी कोणता रंग पहावा, कोणते फूल हुंगावे; कोणत्या वनस्पतींचा अथवा पशुपक्ष्यांचा कोणत्या वनस्पतींचा अथवा संगतरागांशी संबंध आहे; कोणते मूलद्रव्य ब्राह्मण क्षत्रिय इत्यादींपैकी. कोणत्या वर्णाचे आहे: पदार्थ-विज्ञान-रसायन इत्यादींपैकी कोणत्या शास्त्राची मानवी आकृति, वेषभूषा, रंग ही कोणती, - या विषयी काही कल्पना निघून रूढ होणे असंभाव्य नाही. अशा रूढ काल्पनिक संबंधाचाच विचार करण्याचा हेतु बाळगून जर एखादे शास्त्र प्रवृत्त झाले तर गोष्ट वेगळी, एरवी त्यांचा शास्त्राने विचार करण्याची आवश्यकता नाही.

 

१७. उपसंहार

आवश्यकता आहे, ती छंदःशास्त्राला अधिक पद्धतशीरपणे प्रामाण्याच्या भक्कम पायावर उभे करण्याची आहे. अमुक एका पद्यांत मला अमुक एक घटना जाणवते, एवढे म्हटल्याने छंदःशास्त्रज्ञाची जबाबदारी संपत नाही. त्याला होणारी ती जाणीव यथार्थही असेल. पण ती तो जोवर प्रमाणांनी सिद्ध करीत नाही, तोवर त्याचे प्रतिपादन शास्त्राच्या पदवीला पोहोचू शकत नाही. ‘माझी श्रुतिसंवेदना तीक्ष्ण आहे,’ असे म्हणणे हे त्या जाणिवेच्या यथार्थतेचे प्रमाण नव्हे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मराठीत शास्त्रावर लेखन करणारे जे काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके ग्रंथकार आहेत, त्यांच्यापैकी कोणीही या अंगाकडे द्यावे तितके लक्ष दिलेले नाही. त्यामुळे गणिताचे उत्तर योगायोगाने बरोबर देऊनही त्याची रीत चुकणार्‍या विद्यार्थ्यांसारखी त्यांची अवस्था झाली आहे. ते लयसिद्धान्त बरोबर सांगतात, पण लयस्वरूप विशद करीत नाहीत; लयस्वरूप विशद केले तर लयीचे शुद्ध आवर्तनांहून अन्य स्वरूप ओळखत नाहीत; छंदाचा चालीशी संबंध नाही म्हणतात, आणि पद्यांना संगीततालात अथवा संगीतस्वरात बसवून त्यांचे छंद सांगतात; मालिनी-वृत्तातले पद्य बालगंधर्व वेगळ्या चालीत म्हणतात म्हणून त्या पद्यात मराठी छंदःशास्त्रज्ञांना नव्या छंदाचा साक्षात्कार होतो;[टीप : ५१] ते छंदाला अक्षररचना म्हणतात, आणि त्याच्या प्रकारांची लक्षणे देताना यथेच्छ निरक्षर मात्रा दाखवितात; आवर्तनपूर्तीसाठी निरक्षर मात्रा दाखवितात ते दाखवितात, पण त्या मोजीत नाहीत; नवीन गण कल्पितात, पण त्यांचे अस्तित्व सिद्ध करीत नाहीत; पद्यपठनात, श्वास घेण्याची तरतूद करण्यामध्ये यतीचे साफल्य समजतात, पण अगदी लहान वृत्तांत असलेले यति आणि सवात मोठ्या वृत्तातला चरणांतर्गत यतीचा अभाव यांची संगति लावून दाखवीत नाहीत! तात्पर्य लयतत्त्वाचे आणि यतीचे परिपूर्ण विवेचन केले, असमर्थनीय निरक्षर मात्रांचे उच्चाटन केले, आणि संगीततालस्वरांचा कळत-नकळत मनावर पडणारा प्रभाव दूर केला, तर समग्र ‘छंदोरचने’ची फेरमांडणी करावी लागल्याशिवाय राहणार नाही ! छंदोमय रचनेचा विकास आणि परंपरा याविषयी थोडेफार लिहिले गेले असले, तरी या विषयाचे सविस्तर आणि सर्वांगपूर्ण विवेचन करणारा ग्रंथ मराठीत अजून झालेला नाही. छंदःशास्त्राचा अथवा छंदःशास्त्रावरील ग्रंथांचा पटवर्धनांनी दिलेला इतिहास अगदी त्रोटक आहे. हे सर्व ध्यानात घेतल्यावर असे म्हणणे भाग पडते की छंदाची घटना, रचना आणि परंपरा यांचे पद्धतशीर रेखीव, प्रमाणाधिष्ठित असे विवेचन पुरेशा प्रमाणात मराठी भाषेत अजून झालेले नाही.

 

तळटीपा


०१. साहित्यदर्पण, ६३१४. [परत]

०२. छंदोरचना, पृ. २, तळटीप १, ४. [परत]

०३. पहा : न. चि. केळकर - ‘सह्याद्रि’, जून १९३७, पृ. ४०६; श्री. ना. बनहट्टी - ‘पद्यमीमांसे’ची पृ. ४-५. [परत]

०४. पहा : ‘पद्यप्रकाश’, ‘पद्यमीमांसा’. [परत]

०५. छंदोरचना, पृ. २ [परत]

०६. श्री. ना. बनहट्टी : ‘पद्यमीमांसे’ची प्रस्तावना, पृ. ४-५. [परत]

०७. हा शब्द संस्कृतात पुल्लिंगी आहे, तथापि तो मराठीतल्या सर्वत्र रूढीप्रमाणे स्त्रिलिंगी योजिला आहे. [परत]

०८. श्री. ना. बनहट्टी : ‘पद्यमीमांसे’ची प्रस्तावना. [परत]

०९. भरत – नाट्यशास्त्र, ३२.२९. [परत]

१०. मराठी छंदःशास्त्र, पृ. ५. [परत]

११. मराठी छंदोरचना, पृ. ४३८. [परत]

१२. मराठी छंदोरचना, पृ. ८९ [परत]

१३. हा शब्द संस्कृतात प्रस्तुत अर्थी स्त्रीलिंगी आहे. मराठीत तो पुंलिंगी योजिण्याची रूढि आहे. [परत]

१४. छंदोरचना, पृ. ३५२ [परत]

१५. छंदोरचना, पृ. ६ [परत]

१६. छंदोरचना, पृ. ९६ [परत]

१७. छंदोरचना, पृ. १०५ - १०९ [परत]

१८. कुंदर बळवंत दिवाण : 'अनुष्टुप्'; लोकशिक्षण, ऑगस्ट १९३७ [परत]

१९. य. ग. फफे : 'मोरोपंती आर्येतील यतिभंग'; म. सा. पत्रिका, वर्ष २२, अंक ४ [परत]

२०. मराठी छंदोरचना, पृ. १०९ [परत]

२१. पद्यमीमांसा, पृ. २७ - ३१ [परत]

२२. पद्यमीमांसा, पृ. ३९ -४८, ५५ - ६०, ७६ - ८२ [परत]

२३. छंदोरचना, पृ. १८, २७, १२ [परत]

२४. पद्यमीमांसा, पृ. ८३ - ८६ [परत]

२५. मराठी छंदोरचना, पृ. २५, १३८ - १४६, १८२ - १८४ [परत]

२६.  छंदोरचना, पृ. ८ - ९ [परत]

२७. छंदोरचना, पृ. ७, ५१२; पद्यमीमांसी, पृ. १३ [परत]

२८. पद्यमीमांसा, पृ. २० [परत]

२९. जसे : '२७. वर्षा [। प । प + ऽ ‍ॅ + ] २१ मात्रा' (२२ नव्हेत) ; छंदोरचना, पृ. ३६३ [परत]

३०. छंदोरचना, पृ. ६९ [परत]

३१. छंदोरचना, पृ. ६९, ७५ - ७६ [परत]

३२. छंदोरचना, पृ. ८१ - ८६ [परत]

३३. काव्यविभ्रम, पृ. ८० - ९०; छंदोरचना, पृ. ३६६ - ३८० [परत]

३४. छंदोरचना, पृ. ३८ - ३९ [परत]

३५. मराठी छंदोरचना, पृ. ३८०, १८३ [परत]

३६. छंदोरचना, पृ. ३७ - ४७; पद्यप्रकाश, पृ. १८ - १९ [परत]

३७. पद्यमीमांसा, पृ. ९० [परत]

३८. 'काही नवे पद्यप्रकार' : म. सा. पत्रिका, एप्रिल-सप्टेंबर १९५५ [परत]

३९. मराठी छंदोरचना, पृ. ४५४ - ५५ [परत]

४०. प्रस्तुत लेख, अधिकरण १० -१२ [परत]

४१. छंदोरचना, पृ. १०१ - १०५ [परत]

४२. म. सा. पत्रिका, जुलै - सप्टेंबर १९४९ [परत]

४३. मराठी छंदोरचना, पृ. २८ [परत]

४४. छंदोरचना, पृ. ९४ [परत]

४५. म. सा. पत्रिका, एप्रिल - डिसेंबर, १९४९ [परत]

४६. सह्याद्रि, जून १९३७ [परत]

४७. डॉ. सुकुमार सेन, कलकत्ता विश्वविद्यालय. आपले हे मत त्यांनी लेखरूपाने प्रकाशित केलेले नाही. [परत]

४८. मराठी छंदोरचना, पृ. १०२ -१४६ [परत]

४९. अभिनव काव्यप्रकाश, पृ. ३१९ -३२६ [परत]

५०. छंदोरचना, पृ. ५ [परत]

५१. मराठी छंदोरचना, पृ. ७८ -९ [परत]