ग म भ न

सप्टेंबर १९८२ ते ऑक्टोबर १९८६ ह्या कालावधीत ललित मासिकात पंतोजी ह्या टोपणनावाने प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी मराठीचे शुद्ध लेखन  ह्या विषयावर एक लेखमाला चालवली होती. मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीच्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह ह्या लेखमालेत झाला आहे. ह्या लेखमालेतील एकूण ३१ लेख इथे लेखक आणि प्रकाशक ह्यांच्या अनुमतीने प्रकाशित करत आहोत.

ललित मासिकात प्रसिद्ध झालेल्या ह्या लेखमालेत प्रत्येक लेखाला शीर्षक होतेच असे नाही. असे शीर्षक नसलेले लेख इथे पुनर्प्रकाशित करताना त्यांना शीर्षके दिली आहेत. पण ती मूळ लेखकाने दिलेली शीर्षके नव्हेत हे स्पष्ट करण्यासाठी त्या शीर्षकानंतर * अशी चांदणीची खूण लिहिली आहे. उदा उभय-अन्वयी*

ह्या लेखमालेच्या पहिल्या लेखातील प्रास्ताविकपर मजकुरात लेखकाने ह्या लेखनाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे :

उच्चारण आणि लेखन यांतली शुद्धता ही एका काळी भाषेच्या आरोग्याचं आणि ती योजणाऱ्या माणसाच्या सुशिक्षिततेचं लक्षण मानलं जात असे. इंग्रजीसारख्या आयात झालेल्या भाषेच्या बाबतीत अजून ते तसं मानलं जातं. इंग्रजी शब्द लिहायला किंवा उच्चारायला चुकला तर अजून माणसं ओशाळतात. मराठीला हे भाग्य कॅंडीच्या कृपेने मिळालं होतं. ते आता प्रायः नामशेष झालं आहे. मराठी ही मातृभाषा. ती हवी तशी बोलावी, हवी तशी लिहावी. चुकलं म्हणण्याची सोय नाही. म्हटलं तर शास्त्राच्या दृष्टीनं गैरलागू असे अनेक मुद्दे उपस्थित होतात.  मराठी भाषेचं विशिष्ट रूप विशिष्ट क्षेत्रात प्रचारात आहे, (ज्याला ' प्रमाण भाषा' म्हणतात) त्याच्याविषयी चर्चा चालू आहे याचा कुणी विचार करीत नाही. कुणी दुसऱ्याचं लेखन, उच्चार पाहून ऐकून तसं लिहितात, बोलतात. अमुक एक शुद्ध का, अशुद्ध का हे त्यांना कुणी समजावून सांगत नाही, - म्हणजे जुन्या काळातल्या पंतोजीचं काम आज कुणी करीत नाही. ते 'ग म भ न' या निशाणाखाली करायचा विचार आहे.

- पंतोजी

गमभन (सप्टेंबर, १९८२)