सामासिक पदांचं लेखन*

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
सप्टेंबर १९८२

 

[उच्चारण आणि लेखन यांतली शुद्धता ही एका काळी भाषेच्या आरोग्याचं आणि ती योजणाऱ्या माणसाच्या सुशिक्षिततेचं लक्षण मानलं जात असे. इंग्रजीसारख्या आयात झालेल्या भाषेच्या बाबतीत अजून ते तसं मानलं जातं. इंग्रजी शब्द लिहायला किंवा उच्चारायला चुकला तर अजून माणसं ओशाळतात. मराठीला हे भाग्य कॅंडीच्या कृपेने मिळालं होतं. ते आता प्रायः नामशेष झालं आहे. मराठी ही मातृभाषा. ती हवी तशी बोलावी, हवी तशी लिहावी. चुकलं म्हणण्याची सोय नाही. म्हटलं तर शास्त्राच्या दृष्टीनं गैरलागू असे अनेक मुद्दे उपस्थित होतात.  मराठी भाषेचं विशिष्ट रूप विशिष्ट क्षेत्रात प्रचारात आहे, (ज्याला 'प्रमाण भाषा' म्हणतात) त्याच्याविषयी चर्चा चालू आहे याचा कुणी विचार करीत नाही. कुणी दुसऱ्याचं लेखन, उच्चार पाहून ऐकून तसं लिहितात, बोलतात. अमुक एक शुद्ध का, अशुद्ध का हे त्यांना कुणी समजावून सांगत नाही, - म्हणजे जुन्या काळातल्या पंतोजीचं काम आज कुणी करीत नाही. ते 'ग म भ न' या निशाणाखाली करायचा विचार आहे. सामान्यतः कोणत्या तरी वृत्तपत्रात, ग्रंथात, जाहिरातीत, शासकीय व्यवहारात आढळणारे अपप्रयोग अथवा विसंगती उद्धृत करून चर्चा केली जाईल. वाचकांनी चर्चा करण्याजोगे मुद्दे/प्रयोगही सुचवावे]

 

'राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान'
'राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर...'
'राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ९९ टक्के मतदान : गुरुवारी निकाल'
'राष्ट्रपतीपदीचे उमेदवार  झैलसिंग यांनी...'

वर दिलेल्या उद्धरणांत 'राष्ट्रपती' तला 'ती' कुठं ऱ्हस्व तर कुठं दीर्घ लिहिला आहे. यांत काही तरी एक योग्य असलं पाहिजे. महामंडळाचा नियम सांगतो की पदान्ती येणारे इकार, उकार दीर्घ लिहावे. वरच्या उदाहरणातल्या 'पती'तला 'ती' पदान्ती आहे का? नाही; कारण त्यापुढं 'पद' हा शब्द आला आहे आणि त्याचा पूर्व पदाशी समास झाला आहे. '०पदी' यातला 'दी' पदान्ती आहे; तो दीर्घ होणं नियमानुसार आहे. तेव्हा वरच्या उदाहरणांत 'पती' तला 'ती' ऱ्हस्व (ति) पाहिजे.

सारांश :    

                मूळ शब्द, समासातलं रूप : पति
                प्रथमा, सामान्य रूप : पती

दृष्टी, दृष्टिकोन; गती, गतिमान; शक्ती, शक्तिमान ही अशीच उदाहरण आहेत. जो नियम समासाला, तोच तद्धित जोडताना.

पण 'राष्ट्रपतिपद' हा सगळा समास मानायला हवा का? 'पद' हा वेगळा शब्द मानला तर?

मानता येईल. त्या पक्षी 'पद' हा शब्द तेडून लिहावा लागेल. मग 'पती' पदान्ती म्हणून दीर्घान्त. 'राष्ट्रपती' आणि 'पद' यांचं सामानाधिकरण्य,- 'दशरथ राजा' 'बायको माणूस', यांत आहे तसं. मग लेखन 'राष्ट्रपती पदासाठी', 'राष्ट्रपती पदी', 'राष्ट्रपती पदाचे असं करावं लागेल. जोडून शब्द लिहिले तर समास, आणि 'ति' ऱ्हस्व. पण एकंदरीनं  'राष्ट्रपती पद' ही पळवाटच. उच्चारात 'ति' ऱ्हस्व आहे; अर्थात समास हा पक्ष अधिक श्रेयस्कर.

म्हणजे  'पुणे विद्यार्थी गृह' हे तीन शब्द, त्याचं सामानाधिकरण्य, समास नाही,- असचं म्हणायचं ना?

नाही. शब्द तोडून लिहिले की सामानाधिकरण्य, असं विधान केलेलं नाही. सामानाधिकरण्य  असेल त्या स्थळी शब्द तोडून पृथक् पदं मानता येतील, असं विधान केलं आहे. 'पुणे विद्यार्थी गृह' या शब्दांत सामानाधिकरण्य नाही. हा समासच आहे. म्हणून 'विद्यार्थि' असा ऱ्हस्वांत शब्द हवा.

'सामानाधिकरण्य' म्हणजे काय?

दोन शब्द समान म्हणजे एकाच वस्तूचा निर्देश करीत असतील तर ते समानाधिकरण. त्यांचा संबंध म्हणजे सामानाधिकरण्य. 'दशरथ राजा' यात दोन्ही शब्द समानाधिकरण आहेत. 'दशरथ' या शब्दानं ज्याचा निर्देश होतो त्याचाच 'राजा' या शब्दानं होतो. म्हणून या दोन शब्दांत सामानाधिकरण्य आहे. विशेषण आणि विशेष्य यांमध्ये नेहमी सामानाधिकरण्य असतं. जसं, 'मुख्य मंत्री', 'सामान्य रूप', 'पूर्व परीक्षा', 'उत्तर भारत.' असं सामानाधिकरण्य 'पुणे विद्यार्थी गृह' असा अभिप्राय या नावात नाही.  'विद्यार्थ्यासाठी गृह = विद्यार्थिगृह; पुण्यातील विद्यार्थिगृह = पुणेविद्यार्थिगृह' असा अभिप्राय आहे.

पण 'पुणेविद्यार्थिगृह' असं जोडून लिहिणं वाचणाऱ्याला गैर सोयीचं होत नाही का? 'महाराष्ट्रराज्यसाहित्यसंस्कृतिमंडळ' अशी नावं तर त्याहून गैर सोयीची.

संस्थांची नावं शब्द तोडून लिहायला विरोध नाही. विरोध, त्यांतले शब्द स्वतंत्र मानून लिहायला आहे. हा संभ्रम होऊ नये म्हणून कुणी अशा स्थळी जोडचिन्ह लिहितात. जसं : 'महाराष्ट्र-साहित्य-परिषद'.

'मुख्य मंत्री', 'पूर्व परीक्षा' अशी विशेषण-विशेष्यं वर अलग लिहायची झाली, तर विशेषणे-विशेष्यांचा कर्मधारय समास उरणारच नाही. व्याकरणाची तर अशा समांसाना मान्यता आहे.

होय, व्याकरणाची मान्यता आहे. पण अन्य मार्ग नसेल तर, समास हा गौण पक्ष आहे. 'मुख्यमंत्रिगृह' इथं 'मुख्यमंत्री' हा समास मानलाच पाहिजे; नाही तर 'मुख्य' हे विशेषण 'गृहा'कडं जाईल. नुसतंच 'मुख्य मंत्री' म्हणायचं असेल तर अशी अडचण येत नाही.

संस्कृतात 'मुख्यमंत्री' हा समास आहे की नाही? मग तो मराठीत आला की लगेच असमास कसा काय होतो?

त्याला कारण आहे. संस्कृतात तो समास आहे, कारण 'मुख्य' शब्दापुढचा विभक्तिप्रत्यय- विसर्ग-लुप्त झाला आहे. समास नसेल तर 'मुख्यः मंत्री' अशी पदं होतील. मराठीत प्रथमेचा असा विभक्तिप्रत्यय नाही. 'पूर्व परीक्षा', 'सामान्य रूप' या उदाहरणांत अशीच परिस्थिती आहे.