संयुक्त व्यंजनांचं (जोडाक्षरांचं) लेखन*

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
ऑक्टोबर १९८२

 

'या मुद्यांपैकी आठव्याच्या तुलनेनं अवशिष्ट मुद्यात काही समान भूमिका आहे'

'पॅन्ट पीसवर २० ते ४० % डिस्काऊन्ट'

'आम्ही आपले ढढ्ढोपंत.'

'दख्खनचा दिवा मालवला गेला.'

वर दिलेल्या उदाहरणांत काही संयुक्त व्यंजनं (जोडाक्षरं) आली आहेत. 'मुद्यापैकी, मुद्यात' यांत मूळ शब्द कोणता? – 'मुद्दा.' यात दोन द् आहेत. सामान्य रूपांत त्यातला एक द् गडप झाला आहे. हे विसंगत आहे, 'मुद्द्यांपैकी, मुद्द्यांत' असं लेखन योग्य आहे. 'पत्ता, गुत्ता' यांची सामान्य रूपं कशी होतात?- 'पत्त्यावर, गुत्त्यात.' 'चड्डी' चं अनेकवचन 'चड्ड्या.' यात आणखी एक दोष आहे : 'मुद्यात' यात सामान्य रूपाच्या अंतावर बिंदू नाही. महामंडळाचा नियम 'अनेकवचनी सामान्य रूपांच्या अंतांवर बिंदू द्यावा' असा आहे. अवशिष्ट मुद्दे अनेक असल्यामुळं प्रस्तुत रूपात बिंदू हवा. 'घरी' यात घर एक अभिप्रेत असेल तर बिंदू नाही; घरं अनेक असणार असतील तर 'घरीं' असं लेखन वर दिलेल्या नियमानुसार व्हायला हवं.  

पण 'विद्या, गद्य' अशा शब्दांत दोन द् न लिहिताही साघात उच्चार होतो; तसा 'मुद्यात' या शब्दात का होऊ नये?  

याचं कारण असं आहे की, तुलनेसाठी दिलेले शब्द संस्कृत आहेत;आणि संस्कृतात पुढं जोडाक्षर आलेलं असता पूर्वाक्षरावर आघात निरपवाद येतो. तशी परिस्थिती मराठीत नाही. 'उद्या'  शब्दात आघात नाही; हा मराठी शब्द आहे. 'पुण्य' शब्द संस्कृत आहे. पुणं शब्द मराठी. त्यामुळं पहिल्या शब्दावरून येणाऱ्य़ा 'पुण्याला' या रूपात 'पु' वर आघात नाही.

पण काही लोकांच्या बोलण्यात मूळ शब्द 'मुद्दा' नसतो, 'मुद्या' (निराघात) असतो. त्या पक्षी दोन द् कसे येतील?  

येणार नाहीत. पण त्या पक्षी संबद्ध व्यक्तीच्या बोलण्यात मूळ शब्द 'मुद्या' असा आहे हे सिद्ध करावं लागेल. बहुतेकांच्या बोलण्यात 'मुद्दा' असाच शब्द आहे.


पॅन्ट, डिस्काऊन्ट' हे काय लेखन आहे?  दुसऱ्या शब्दातला 'ऊ' ऱ्हस्व हवा ते सोडून देऊ. पण 'न्ट' हे जोडाक्षर उच्चारतः अशक्य आहे. यातला न् दंत्य आहे; ट मूर्घन्य आहे. उच्चानुसार लेखन 'ण्ट' असं व्हायला हवं.  

पण हे शब्द इंग्रजी आहेत, आणि या शब्दांच्या इंग्रजी वर्णयोगात (स्पेलिंगमधे) 'n' हे अक्षर येतं. 'n' म्हणजे  न्. मग 'पॅन्ट' लिहिण्यात काय चूक आहे? आणि याचप्रमाणं 'कॉन्टिनेन्टल, स्टॅन्ड, बॅन्क' असं लेखन का करू नये?  

'n' म्हणजे सर्वत्र 'न्' हेच समीकरण मुळात चुकीचं आहे. ही वर्णाकृती इंग्रजीत अनेक उच्चारांचं प्रतिनिधित्व करते. 'Ink' शब्दात तिचा उच्चार वेगळा(ङ्);'Inch' शब्दात  वेगळा (ञ्) ; 'Inter' शब्दाचा मराठी उच्चार लक्षात घेतला तर त्यात वेगळा (ण्). एकच वस्त्र कटिवस्त्र म्हणून, पांघरूण  म्हणून, दोर म्हणून वापरावं तसा हा प्रकार. इंग्रजी लिपीची ही मर्यादा लक्षात घेऊन इंग्रजी शब्दांचं देवनागरीत लेखन करणं योग्य होईल. म्हणजे 'पॅन्ट, डिस्काउण्ट, कॉण्टिनेण्टल, स्टॅण्ड, बॅङ्क, इङ्क, इञ्च, इण्टर' असं लेखन करायला हवं.  

पण मग 'पॅंट, डिस्काउंट...'या पद्धतीनं बिंदूसह लेखन कुणी करतात त्याचं काय?  

ते योग्य आहे; कारण मराटीच्या लिपीत शीर्षबिंदू हा अनेक अनुनासिकांचं बिनचूक प्रतिनिधित्व करतो. 'पॅंट' शब्दात बिंदूनंतरचं व्यजंन मूर्धन्य आहे; त्यामुळं अनुस्वार. 'इंक' शब्दात बिंदूनंतरचं व्यंजन कंठ्य आहे; त्यामुळं त्यात बिंदू = कंठ्य अनुस्वार. परसवर्ण लेखन (पॅण्ट) केलंच पाहिजे असं नाही. ते ऐच्छिक आहे. पण ऐच्छिक लेखनही कुठं केलं, कुठं केलं नाही असं असू नये. लेखनात सुसंगती हवी. माधवराव पटवर्धन सर्वत्र परसवर्ण लेखन करायचे.


'ढढ्ढोपंत, दख्खन' हे लेखन सदोष आहे; कारण यात अभिप्रेत आहे तसं महाप्राण व्यंजनाचं(ढ्,ख्) द्वित्व उच्चारतः अशक्य आहे.  

यात अशक्य ते काय आहे? 'अशक्य' हा शब्द नेपोलियनच्या मताप्रमाणं शहाण्या लोकांच्या कोशात असत नाही.  

असं पहा की महाप्राण व्यंजन महाप्राण म्हणून केव्हा कळतं? -  तोंडातून हवा पूर्ण बाहेर पडल्यावर. ती अल्पप्राण व्यंजनाच्या हवेहून अधिक असते. उद्धृत लेखनात पहिला ढ्, पहिला ख् महाप्राण असणं शक्य नाही; कारण हवा पूर्ण बाहेर पडायला इथे अवसरच नाही. म्हणून 'ढड्ढोपंत, दक्खन' असं लेखन करायला हवं. 'बुद्धी हा शब्द आपण 'बुध्धी असा लिहीत नाही यातही हेच तत्त्व अनुस्यूत आहे. या तत्त्वानुसार, 'विठ्ठल, मख्ख,लफ्फा' असे लिहिले जाणारे शब्द 'विट्ठल, मक्ख, लप्फा' असे लिहायला हवे.

पण 'विट्ठल' शब्द शतकानुशतकं ' विठ्ठल' असा लोक लिहीत आले आहेत. त्यांना ' विठ्ठल' बाटला असं नाही का वाटणार?  

शास्त्राला सोवंळ ओवंळ काही नसतं, लहान-थोर-भेदही नसतो. पाणिनीनं एकाच पंक्तीत (सूत्रात) 'श्वा, युवा, मघवा' यांना बसवलं आहे. यात वावगं काहीच नाही. मंदिराच्या आवारातलं झाड आणि कचरापेटीजवळ उगवलेलं झाड यांमध्ये वनस्पतिशास्त्र भेदभाव करत नाही.