काही शब्दांचं लेखन*

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
फेब्रुवारी, १९८३

 

१ ‘सक्षम अधिकाऱ्यांच्या मर्जीने अनुभवाची मुदत शिथिलक्षम आहे’
२ ‘श्रीलंका क्रिकेपटूंचा वर्णद्वेषी दक्षिण अफ्रिकेचा दौरा ही लांच्छनास्पद घटना आहे’
३ ‘ह्या विकाराची कारणे अनेक आहेत आणि ती सर्वश्रृत आहेत.’
४ ‘चतुःश्रृंगी’ यात्रेस बसेसची सोय.’
५ ‘कृतज्ञतापूर्वक ऋणनिर्देष करीत आहे.’
६ ‘ती सर्व लिखाणाची सुव्वाच नक्कल उतरून काढी.’

मराठीत वारंवार येणारे काही संस्कृत शब्द वर उद्धृत केल्या वेच्यांत आले आहेत. त्यांपैकी पहिल्या वेच्यातले ‘सक्षम’ ’शिथिलक्षम’ हे शब्द  व्याकरणाच्या, आणि पुढल्या वेच्यांतले लांच्छनांस्पद, सर्वश्रृत, चतुःश्रृंगी,  ऋणनिर्देष, सुव्वाच हे शब्द लेखनाच्या अज्ञानातून निर्माण झाले आहेत.

‘सचेतन’(X अचेतन),‘कार्यक्षम’ हे शब्द जर निर्दोष असतील तर ‘सक्षम’ ’शिथिलक्षम’ का नाहीत?

त्याला कारण आहे. प्रथम ‘सक्षम’ पाहू.‘सह’ अशा वर्णाचा ‘स’ हा अवयव नामाआधी येतो, विशेषणाआधी येत नाही.‘क्षम’हे विशेषण आहे. ‘सावयव, सस्मित, सज्ञान, सानंद’ हे शब्द पाहा . या सर्वांत उत्तर पद नाम आहे.

पण मग ‘सखोल, सधन, सशक्त’ या आणि अशा वर्णांचं काय?

असे पुष्कळ काळ रुळलेले शब्द व्याकरणाला अपवाद म्हणून मान्य करावे लागतात. पण ही सवलत नव्यानं  घडत असलेल्या शब्दांना मिळणार नाही. ‘सखोल, सघन, सशक्त, सोपस्कार, सायास’ अशा शब्दांत पूर्व अवयव म्हणून येणारा ‘स’  हा ‘सावयव’ इत्यादी शब्दांत पूर्व अवयव म्हणून येणाऱ्या ‘स’ हून वेगळा म्हणून व्याकरणात नोंदला जाईल. पहिला व्याकरणाच्या दृष्टीनं ’स्वार्थी ‘(=लगतच्या शब्दाच्या अर्थात भर न टाकणारा) आहे: दुसरा ‘सह’ अर्थाचा आहे. संस्कृतातही असे तुरळक शब्द येतात.(जसं : ‘सतत्व’= तत्त.) व्याकरणाची फूटपट्टी लावताना शब्दप्रयोगांचं वय पाहावं लागतं.

‘सचेतन’ हाही संस्कृत शब्द या तुरळक शब्दांत जमा करायचा का ?

नाही. कारण यात उत्तर पदी ‘चेतना’ हे नाम मानणं शक्य आहे. समास बहुव्रीही; म्हणून अकारान्त. ‘चेतन’ असं विशेषणही उपलब्घ आहे . त्याला ‘स’ हा अवयव जोडला जात नाही.

आता  ’शिथिलक्षम’ पाहू. यात ’शिथिल’ हे विशेषण आहे. ‘क्षम‘ हे विशेषण समासात उत्तर पद म्हणून येतं ते नामापुढं. ‘कार्यक्षम, स्पर्शक्षम, दर्शनक्षम, संवेदनक्षम, इत्यादी शब्द पाहा. तसा शब्द हवा असेल तर, शैथिल्यक्षम’असा होऊ शकेल.

‘लांच्छनास्पद’यातला च् अज्ञानमूलक आहे. उच्चार आणि व्युत्पत्ती(«’लाञ्छ्’ धातू)- कोणत्याही दृष्टीनं तो समर्थनीय नाही. ‘शंख, संघटन, सुंठ, संथ,गुंफा’ हे शब्द या पद्धतीनं लिहायचे झाले तर ‘शंक्ख, संग्घटना, सुंट्ठ, संत्थ,गुंप्फा’ असे लिहावे लागतील! हे उघडच अर्थशून्य आहे.

‘सर्वश्रृत ’, ‘चतुःश्रृंगी’ यातल्या ‘श्रृ’ याचा उच्चार कसा करायचा? प्रयत्न करूनही तो साधणं कठीण आहे; कारण या लेखनांत्  ‘र’ पुढं ‘ऋ’असा संयोग आहे. या शब्दाचा वास्तविक जो उच्चार होतो त्याला अनुरूप लेखन ‘सर्वश्रुत, चतुःशृंगी’ असं होईल. घोटाळ्याच मुळ आहे ‘श्’या व्यंजनाच्या विविध आकृती. ‘श्’ ही आकृती आज केवळ जोडाक्षरांत (श्र,श्व,श्च,श्न,श्ल)येते.

‘(ऋण) निर्देष’ हे लेखन ‘श’ आणि ‘ष’ यांमधल्या भेदाचं भान न राहील्यामुळे झाला आहे.(‘विशेष,दृश्य’ हे शब्द कोणी ‘विषेश, दृष्य’असे लिहितात, त्याचही कारण हेच.) वस्तुतः ‘निर्देश’ असा ‘(निर्+)दिश्’या धातू वरून आलेला शब्द आहे. याच धातूवरून ‘आदेश, उपदेश, संदेश,उद्देश, प्रदेश, विदेश’ इत्यादी शब्द आले आहेत. त्या सर्वांत अंत्याक्षरातलं व्यंजन दंत्य ऊष्म वर्ण आहे; मूर्धन्य नाही.

‘सुवाच्च’ असा लिहिलेला शब्द वास्तविक पाहता ‘सुवाच्य’ हवा.

पण दोन्हींचा उच्चार एकच होतो ना !

नाही. थोडा फरक आहे.शिवाय ‘वच्’ या धातूला ‘य’ प्रत्यय लागून ‘वाच्य’ हा शब्द सिद्ध होतो. त्यात ‘च्च’ येईल कसा? ‘ग्राह्य, मान्य,वाध्य, राज्य’ या शब्दांची जी घडण तीच.’वाच्य’ या शब्दाची आहे. उच्चारात फारसा फरक नाही म्हणून ‘वाच्च’ लिहायच झालं तर ‘राज्य’सुद्धा ‘राज्ज’ लिहिता येईल. उच्चारानं निर्णय होत नसेल तिथं व्युत्पत्तीचा कौल मानणं योग्य कारण व्युत्पत्ती ही विवाद्य शब्दापलीकडं अनेक शब्दांची; समान घटना दाखवते.