उभय-अन्वयी*

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
मार्च, १९८३

 

‘बालगीत की गोष्टींच्या कॅसेटस्’
‘महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृतीच्या थोर परंपरेची जोपासना करून...’
‘आंध्र, कर्नाटकच्या सर्व मंत्र्यांना तिकिटे’
‘जपान, मलेशियाचे आव्हान संपले.’
‘चीन आणि जपानचे मोठे विजय’
‘आता दिल्ली केंद्रावरून देण्यात येणाऱ्या बातम्या ऐका. प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीतून.’
‘वादळ व पावसामुळे केळी, कापसाचे जबर नुकसान’
‘अंतुले व त्यांच्या पाठिराख्यांना इशारा’
‘अणुइंधन करार व शस्त्रास्त्र खरेदीत परस्पर संबंध नाही.’

वर उद्धृत केलेल्या सर्व उदाहरणांमध्ये दोष एकच आहे. मग इतकी उदाहरणं कशासाठी? – अशासाठी की प्रस्तुत दोष, सांसर्गिक रोगाप्रमाणं, मराठीत किती झपाट्यानं पसरत चालला आहे याची कल्पना यावी. ‘वादळ व पावसामुळे’ -- लिहिणाऱ्याला म्हणायचं आहे, ‘वादळामुळे आणि पावसामुळे.’ यात ‘मुळे’ हा अवयव दोनदा येतो. तो एकदाच वापरून काम भागवण्याचे न्याय्य मार्ग दोनः १. ‘वादळ व पाऊस यांमुळे,’ २. ‘वादळ-पावसांमुळे.’ यांपैकी पहिल्या रचनेत पृथक् पदं योजली आहेत; दुसरीत समास आहे. समास द्वंद्व असल्यामुळे अनेकवचनी आहे. ‘वादळा-पावसांमुळं’ हा समासाचाच दुसरा पर्याय आहे. पहिल्या रचनेत ‘वादळ’ ‘पाऊस’ हे शब्द उद्देश्यार्थी प्रथमा विभक्तीत असून ‘हा’ या दर्शक सर्वनामाने त्यांचा एकत्रित परामर्श होतो. हे सर्वनाम या ठिकाणी ‘सामान्य रूपा’त आलं आहे.(या = ह्या) आलं आहे. ‘केळी, कापसाचे जबर नुकसान’— म्हणजे ‘केळींचे आणि कापसाचे---’ किंवा ‘केळी आणि कापूस यांचे’ किंवा ‘केळी-कापसांचे...’ या उदाहरणात उभयान्वयी अव्यय नाही; पण ते संदर्भावरून ध्यानात येतं, आणि अशा ठिकाणी ते इच्छा असली तर गाळता येतं.

पण तुम्ही सांगता त्या रचनेवरून कळणारा अर्थ चर्चित उदाहरणावरून कळतोच की! मग वेगळ्या रचनेचा आग्रह का ?

आग्रह अशासाठी की उभयान्वयी अव्ययानं जोडायची पदं समान रूप असावी लागतात. तशी ती नसतील तर उभयान्वयी अव्ययामागं आलेलं प्रथमान्त रूप, पुढे येणारं जे कोणतं प्रथमान्त रूप असेल त्याच्याशी सोयरीक करू पाहतं. ‘अंतुले व त्यांच्या पाठिराख्यांना इशारा’ या रचनेत बेरीज ‘अंतुले’ आणि ‘इशारा’ यांची होते, ‘अंतुले’ आणि ‘त्यांचे पाठिराखे’ यांची होत नाही. ‘मिरच्या आणि कोथिंबिरीची जुडी घेऊन या’ यात ‘जुडी’ नुसती ‘कोथिंबिरीची’च, ‘मिरच्यां’ची नाही, हे कळतं ते उभयान्वयी अव्ययाच्या ह्या वैशिष्ट्यामुळंच.

हे अव्यय गाळून रचना केली तर? जसं ‘जपान, मलेशियाचं आव्हान संपले.’

उभयान्वयी अव्यय गाळलं तरी परिस्थिती बदलत नाही, कारण ते संदर्भावरून वाचणाऱ्याच्या/ ऐकणाऱ्याच्या मनात उपस्थित होतं. अशा शब्दाला व्याकरणात 'अध्याहृत शब्द' म्हणतात.

जपान-मलेशिया असा समास नाही का होणार?

होईल. पण त्या पक्षी स्वल्पविराम चालणार नाही; निर्दिष्ट शब्द जोडावे लागतील. हा इतरेतर-द्वंद्व समास होईल; ‘जपान-मलेशियांचे’ असं म्हणावं लागेल. ‘वादळ-पावसांमुळे,’ ‘केळी-कापसांचे’ याप्रमाणं.

‘बातम्या...प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीतून’ यात काय चूक आहे? ‘हिंदी/ हिंदीतून बातम्या,’ ‘इंग्रजी/ इंग्रजीतून बातम्या’ असं दोन्ही प्रकारांनी म्हणण्याचा प्रघात आहे.

खरं आहे. पण अशा वेळी निवड करायची ती एकाच प्रकारच्या रूपांची केली तर ती साजून दिसते. तशी केली नाही तर विजोड रचना होते. व्याकरणाचा अशा रचनेला काही आक्षेप असणार नाही. पण अशा परिस्थितीत काव्यशास्त्राच्या परिभाषेप्रमाणं ‘प्रक्रमभंग’ हा दोष निर्माण होतो.

‘आला आला प्राणि जन्मास आला|
गेला गेला बापुडा व्यर्थ गेला ||’ याऐवजी
‘आला आला...|
जातो जातो बापुडा व्यर्थ जातो ||’

असं म्हटलं तर का खटकतं? याच्या उत्तरात वरच्या प्रश्नाचं उत्तर आलं.