असामान्य मराठी

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
एप्रिल, १९८३

 

मराठी व्याकरणात विभक्ति-विवेचन करताना ‘सामान्य रूपा’ची माहिती देतात. प्रथमेतर विभक्तींचे प्रत्यय/ शब्दयोगी अव्ययं जोडताना ‘देव’ शब्दाचं ‘देवा’ असं रूप होतं. जसं, देवाला, देवानं. यांत ‘देवा’ हे सामान्य रूप. अनेकवचनाचे प्रत्यय जोडताना या रूपाचा अंत्य स्वर सानुस्वार होतो. जसं, देवांना, देवांचा. काही नामांचं सामान्य रूप एकवचनात वेगळं आणि अनेकवचनात वेगळं होतं. जसं, वाटेनं, वाटांवर. काही नामांचं वेगळं सामान्य रूप होत नाही; अनेकवचनात अनुस्वार तेवढा येतो. जसं, गुरूला, गुरूंचा. काही नामांना केवळ अनेकवचनातच ही विकृती होते. जसं, बायकोला, बायकांना. सामान्य रूप त्या विकृतीचे काही अपवादही वैयाकरण देताता. देशवाचक विशेषनामं (नागपुरचा, म्हैसूरला, इंग्लंडला, हिंदुस्थानचा) हा नामवर्ग या अपवादांत गणतात. हा ‘नवीन प्रचार पडत चालला’ असल्याचं दामले नमूद करतात. व्यक्तिनामांत आकारान्त स्त्रीलिंगी विशेषनामं (रमा, नर्मदा, गंगा...), त्यांचा ‘जेव्हां प्रतिष्ठापूर्वक उपयोग होतो तेव्हां,’ त्यांनी अपवादांत गणली आहेत. यावरून दामल्यांच्या काळात अन्य विशेषनामं (राम, कुसूम...) सामान्य रूपं घेऊनच विभक्तिक्षम होत असत असं दिसतं.

आज मराठीचा लिखित, उच्चारित प्रचार पाहिला तर या बाबतीत सार्‍याच ठिकाणी गोंधळाचा दिसतो. काही उदाहरणं पाहू

१.    मध्यप्रदेशची...क्रीडावृत्ती.
२.    भारताचे बांगलादेशवर १२ गोल.
३.    आंध्रमधील मतदानास गालबोट.
४.    वामनराव कुळकर्णीच्या घरी मी आणि फडके गाणी करीत बसलो होतो.
५.    मी लगेच डॉ. साठेंच्या हॉस्पिटलमध्ये गेलो.
६.    अंतलेंविरुद्ध उपाययोजना.
७.    संजय हजारेची...गोलंदाजी.
८.    तेव्हा यशवंतराव मोहितेंनी निवडणूक लढवली होती.
९.    मानेंनी शब्द दिला होता.
१०.    पण दामलेंचे हे मत खोडताना सबनीसांनीही दामलेंपेक्षा अधिक सूक्ष्मता दाखविली.
११.    सुलश्री प्रतिष्ठानतर्फे...
१२.    कर्नाटक, आंध्र प्रदेशात ७० टक्केपर्यंत मतदान

ही उदाहरणं प्रतिष्ठित वृत्तपत्रं, पुस्तकं यांमधून घेतली आहेत. क्र. १० हे उदाहरण तर एका व्याकरणग्रंथातून घेतलं आहे. गंमत अशी की याच व्याकरणग्रंथात सामान्य रूपाविषयी जी माहिती दिली आहे तीत ‘दामलेंचे, राजवाडेंनी, तुळपुळेंनी’ अशा, त्यातच येणार्‍या प्रयोगांना आधार मिळत नाही. वरच्या उदाहरणांत पहिली तीन देशवाचक नामांची आहेत. क्र. ४-१० आडनावांची क्र.११ संस्थानामाचं, आणि क्र. १२ (टक्केपर्यंत) तर सामान्यनामाचंच आहे. हे प्रयोग करणार्‍यांच्या मनात या मुद्द्याविषयी अनिश्चित वृत्ती आहे हे त्यांनीच आसपास लिहिलेली रूपं पाहिली की ध्यानात येतं. ‘बांगलादेशावर' या रूपाशेजारी ‘भारताचे’ हे रूप नांदतं; ‘आंध्रमधील’ लिहिणारे ‘बडोद्यात’ चालवून घेतात; ‘अंतुलेंविरुद्ध’ लिहितात ते ‘भोसल्यांबद्दल’ही लिहितात; ‘दामलेंचे’ लिहणारे ‘सबनिसांनी’ लिहितात; ‘प्रतिष्ठानतर्फे’ लिहितात त्यांना ‘प्रतिष्ठानांकडून’ ही चालतं. हे सर्व ज्यांना चालतं त्यांना कालिदासच्या शाकुंतलमध्ये’, ‘माघच्या शिशुपालवधमध्ये’ हेही चालावं. ‘संस्कृतचा अभ्यासक्रम (=अभ्यास्क्रम)’ हे तर पुष्कळांच्या तोंडी, लेखी आणि लेखी आहे. वर ‘टक्केपर्यंत’ हे एकच सामान्य नामाचं उदाहरण दिलं आहे. पण काही धातुसाधित नामांचा असा सामान्यरूपरहित प्रयोग काही क्षेत्रांत (शासकीय कार्यालयांचा लेखी व्यवहार, वकिलांच्या नोटिसा, न्यायालयीन दप्तर इत्यादी) सररास चालतो. ‘कळविणेत येते की,’ ‘निमंत्रितांचे नावांची यादी करणेबाबत,’ ‘नियमाचे उल्लंघन करणारावर (करणारा + वर) इलाज केला जाईल.’ इत्यादी प्रयोग पाहावे. मराठीतलं एक जुन्यांपैकी, प्रतिष्ठित वृत्तपत्र तर निष्ठेनं असले प्रयोग करतं.

हे कसलं मराठी आहे ?

हे आहे ‘असामान्य मराठी’! माणसाला असामान्यतेची ओढ किती असते याचा पुरावा. असामान्यतेचा राजमार्ग.

‘साठेंच्या’, ‘मोहितेंनी’ असे प्रयोग करणार्‍या काही लोकांना मनातून असं कुठं तरी वाटत असतं की ‘साठ्यांनी’, ‘मोहित्यांनी’असे प्रयोग केल तर साठ्यांचा, मोहित्यांचा अधिक्षेप होईल. बहुधा याच भावनेतून काही पीएच् -डी-चे मार्गदर्शकही ‘साठे यांच्या’, ‘मोहिते यांनी’ असे नामनिर्देश करण्याची पळवाट आपल्या शिष्यांना सुचवीत असावे. हे काय तर्कशास्त्र आहे ? ‘मुख्य मंत्र्यांनी’ म्हटलं तर मुख्य मंत्र्यांचा अधिक्षेप होतो काय ? (‘शिवाजी महाराज आग्र्याहून पळाले’ म्हणण्यात महाराजांचा अधिक्षेप होतो असं म्हणण्यातलाच प्रकार !) आणि बोलताना होत नाही तो फक्त लिहिताना होतो? हेच लोक अकारान्त आडनावांची सामान्य रूपं करीतच असतात. वर ‘दामलेंचे...मत’ लिहिणार्‍यांनी ‘सबनिसांनीही’ असंच लिहिलं आहे. मराठी ही बाजारबोली (पिजन लँग्वेज) आहे असं काही मराठीचे पाश्चात्त्य अभ्यासक मानतात. त्यांना असले प्रयोग पाहून आणखी बळ येईल.

या प्रवृत्तीचा लाभ मराठी शिकणार्‍या अमराठी-भाषकांनाही होईल. मराठी शिकताना त्यांचं डोकं खाणार्‍या ज्या काही गोष्टी आहेत त्यांतली एक, मराठी नामांची लिंगं; दुसरी, सामान्य रूपं. सामान्य रूपं मराठी-भाषकांनीच सरसकट ऐच्छिक केल्यावर शिकाऊ लोकांची एक अडचण मिटली. पुढचा टप्पा : लिंगंही ऐच्छिक करावी; भूतकाळात सकर्मक धातूंचा कर्तरी प्रयोग सार्वत्रिक करावा, - ‘बाबांनी गोष्ट सांगितली’ असे प्रयोग रद्द करून ‘बाबा गोष्ट सांगितले’ असे प्रयोग रुळवावे. मराठी सोपं होईल ! मग ‘तेला पचास रुपिया दिला तरी बी नाय म्हणते’ असल्या पारशी/गुजराती मराठीला धेडगुजरी समजायचं कारण उरणार नाही. ‘नाटकची तालीम’, ‘पैसाला पासरी’ यांत काही खोड निघणार नाही.

असं होईल त्या काळात ‘असामान्य’ या शब्दाचा ‘हेंगाडं’ असा अर्थ कोशात नमूद झालेला असेल.