नावात काय आहे?

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जून, १९८३

 

महाराष्ट्र टाइम्समध्ये (५-४-८३) ‘तुलाजेंद्र नव्हे, तुलजेंद्र’ या शीर्षकानं अलीकडं एक पत्र प्रसिद्ध झालं आहे. त्यात तंजावराच्या राजाचं ‘तुलाजेंद्र’ असं दिलं जाणारं नाव चुकीचं असल्याचं निदर्शनाला आणलं आहे. ‘तुलजेंद्र’ हे नाव बरोबर. ‘तुलजा + इंद्र.’ ‘तुलजा’ म्हणजे तुळजा. तिचं संस्कृतीकरण ‘मराठी भाषेचं मूळ’ तमिळाईत शोधणाऱ्या खैर्‍यांच्या परिभाषेत उद्भ्रंश – ‘तुलजा’ असे नावांचे उद्भ्रंश प्रयोजनवशात् जाणीवपूर्वकही केले जातात. उदाहरणार्थ, ‘मोक्षमूलर’ (माक्स म्यूलर), ‘देवसेन’ (ड्रॉयसन) ‘शार्मण्य’ (जर्मन). मास्क म्यूलरनं आपल्या ऋग्वेदसंहितेच्या मुद्रावृत्तीत मुखपृष्ठावर आपला उल्लेख गोतीर्थवासिना मोक्षमूलरभट्टेन शोधिता’ असा केला आहे. यातलं ‘गोतीर्थ’ म्हणजे ऑक्सफर्ड ! म्हणजे हे नावाचं भाषांतर झालं. दलाई लामांना बौद्ध कथावाङ्मयातली ‘सुजाता’ सांगितली तर ओळखू येत नाही, ‘वेलबॉर्न वन’ म्हटलं की लगेच ओळख पटते; कारण बौद्ध ग्रंथांच्या तिबेटी भाषांतरांत नावांचंसुद्धा भाषांतर होतं. या पूर्व सूरींच्या पावलांवर पाऊल टाकून (किंवा हातावर हात मारून) आधुनिक संस्कृत पंडित ‘गोळ्डमन’ला संस्कृतात ‘सुवर्णपुरुष’ म्हणतात. पण ही सर्व बुद्धिपूर्वक केलेली नावांची रूपांतरं आहेत. ‘तुलाजेंद्र’ हे ‘तुलजेंद्रा’चं रूपांतर अबुद्धिपूर्वक आहे, म्हणजेच चुकीचं आहे.

पण ही कसोटी मराठी लेखकांना, पत्रपंडितांना मान्य नसावी. नावांची पिळवणूक हरघडी चाललेली मराठी वाङ्मयात दिसते. मराठी पत्रकार ‘मनेका गांधी’च लिहिणार आणि आपण ‘मनेका’नसून ‘मेनका’ आहो असं खुद्द ‘मनेकां’चं म्हणणंसुद्धा बातमी म्हणून छापणार. आपलं नाव काय आहे ते ‘मेनका गांधी’ कोण ठरवणार? तो अधिकार पत्रकारांचा. आणि यात त्यांचा मार्गदर्शक म्हणजे नावांची इंग्रजी स्पेलिंगं, आणि इंग्रंजी वर्णांच्या उच्चारांविषयीच्या त्यंच्या ठाशीव समजुती. (‘मेनका’ गांधींनी आपलं नाव इंग्रजीत ‘Maneka’ असं काय म्हणून लिहावं? आता भोगा त्याची फळं !) इंग्रजी ‘sh’ म्हणजे मराठी ‘श्’ आणि ‘n’ म्हणजे मराठी न् असं त्यांच्या काँम्पूटरला शिकवलेलं असतं. मग ‘Vaishnavi’ असं नाव पुढं आलं की तो ‘वैश्नवी’ असं त्याचं देवनागरीकरण करून मोकळा होतो. ‘वैष्णवी’ याही शब्दाचं स्पेलिंग तेच होतं याचा तो विचार करणार नाही. हाच प्रकार ‘वार्शनेय’ (वार्ष्णेय) या नावाचा. काँप्यूटरला जे शिकवलं असेल तेच आणि तेवढंच येतं. विचार करणं त्याला शिकवलेलं नसतं, शिकवता येतही नाही.

हे काँप्यूटर-पद्धतीनं काम करणार्‍यांचं झालं. काँप्यूटर तयार करणार्‍यांचं काय ? मराठीचं व्याकरण लिहिणारा पहिला इंग्रज कोण ? – carey, ‘कॅरे’. हा निर्देश मराठीत शंभर वर्षे चालला आहे. या इंग्रजीचं खरं नाव ‘केरी’ आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न कुणी करायचा ? पण असा प्रयत्न कुणी केला तर ? मग मराठीची ढाल पुढं येते : ‘कॅरे हा आमचा मराठी उच्चार आहे.’ हे दादोबांच्या निर्वाणशताब्दीच्या निमित्तानं पुणे विद्यापीठात व्याकरणावर झालेल्या चर्चासत्रात उपस्थित झालेलं मत. मराठी बाणा ! या न्यायानं ‘अल्पिष्टन’ नावाचंही समर्थन करता येईल. आणि मराठी बाणा असतो तसा इंग्रजी बाणा का असू नये ? आणि त्याला अनुसरून ‘खल्कर्नी (कुलकर्णी), गॅजिल (गाडगीळ), वाझ/वेझ (वझे), गोअर (गोरे)’ असे मराठी नावांचे इंग्रजी अवतार का असू नयेत? असे इंग्रजी अवतार भारतातल्या काही ग्रामनामांचे झाले होते. (Muttra- मथुरा, Poona- पुणे, Kirkee-खडकी) ते आपण इंग्रज गेल्याबरोबर टाकून दिले. यावरून, आपल्या नावांतला भ्रष्टाचार आपणाला आवडत नाही हे उघड होतं. असा भ्रष्टाचार कुणालाच आवडत नाही, आणि असा भ्रष्टाचार करणं सुसंस्कृत व्यक्तीला शोभत नाही हे आपण कधी समजून घेणार ? माझ्या मुलीची एक युगोस्लाव्ह मैत्रीण आहे. तिला सगळे ‘ज्यूली’ म्हणतात. एक दिवस तिच्याशी गप्पा मारताना समजून आलं की ‘Julija pirc’ या तिच्या नावाच्या तिच्या स्वभाषेतला उच्चार ‘यूलिया पिर्च्’ असा आहे. तिला तशी हाक मारल्यावर काय आनंद झाला ! आम्ही समजत होतो, ‘ज्यूलिजा पर्क’ (मधुपर्कातला!) म्हणजे आपलं यूरोपीय नावांच ज्ञानसुद्धा इंग्रजीच्या – पुष्कळदा अर्धवट – ज्ञानानं ठरणार. ‘क्रुश्चेव्ह, ख्रश्चेव्ह, ख्रुश्शोव’ यातलं कोणतं बरोबरं अशी चर्चा बर्‍याच वर्षांपूर्वी झाली होती. तशीच ‘खोमेनी, खुमेनी, खोमैनी’ याही पर्यायांविषयी. तिचंही मूळ यातच सापडेल.

ज्यांत असा अमराठी ज्ञानाचा संबंध येत नाही अशा नावांचं काय ? ‘शरश्चंद्रिका पाटील, शरदश्चंद्र पवार’ अशी लिहिली जाणारी नावं तर पूर्ण मराठीच आहेत ना ? ‘रजूभैय्या’ (=oभय्या/भैया) या नावाचं काय ? आणि पुष्पशैय्या’ ? ‘चतुःश्रृंगी, उत्तर धृव, सहस्त्रबुद्धे, असं लेखन सरसास चालतं. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतला’तलं एक पात्र : ‘शारङ्गर्व.’ हे ‘किर्लोस्कर प्रणीत संगीत नाट्य शताब्दी महोत्सव समिती’च्या निमंत्रणातलं लेखन आहे !

एकूण हा प्रश्न मराठीच्या किंवा अन्य भाषांच्या ज्ञानाचा नाही, आपण भाषा किती काळजीकाट्यानं वापरतो याचा आहे. शुद्ध लिहिणं हे भाषिक प्रौढतेचं गमक असलं तर मराठी वाङ्मय कोणत्या वयोवस्थेत आहे म्हणणार ? या बाबतीतल्या अंदाधुंदीला वृत्तपत्रं अधिक जबाबदार आहेत; कारण वृत्तपत्रं हे सर्वांत अधिक वाचलं जाणारं वाङ्मय आहे. सामान्य माणूस लेखनात वृत्तपत्रांनी केलेल्या संस्कारांना अनुसरतो. वृत्तपत्रांनी आपलं संपादकमंडळ, मुद्रितशोधक यांना या अंगात अधिक सुजाण करण्यासाठी प्रयत्न केले तरच सर्वसामान्य मराठी माणसाला भाषिक प्रौढता येण्याची शक्यता आहे.