ऊ-ऊन, वू-वून*

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
ऑगस्ट, १९८३

 

‘बेताचे कपडे अंगावर लेवून ...’ (नागझिरा १९)
‘काहीजण काळ्या तोंडातले पांढरे दात दाखवून त्याला खिजऊ बघत.’ (उक्त ४९)

उद्धृत उदाहरणांतील ‘लेवून, खिजवून’ ही रूपे पाहा. त्या रूपात ‘ले’ धातूला ‘ऊन’ प्रत्यय लागला आहे. त्यात ‘व्’ येण्याचं कारण काय? ‘जा’- पासून ‘जाऊन’, ‘ये’ पासून  ‘येऊन’, तसं ‘ले’ पासून  ‘लेऊन’ रूप व्हावं. ‘ऊ’ प्रत्यय लागतानाही हाच न्याय : ‘जाऊ, येऊ, लेऊ ’. सर्व एकाक्षरी स्वरांत धातूंची रूपे अशीच होतात. उलट, ’खिजऊ’ या रूपात ‘व्‌‍’ अपेक्षित असूनही लिहिलेला नाही. धातू आहे ‘खिजव’, त्याला ‘ऊ’ प्रत्यय लागल्यावर ‘खिजवू’ व्हावं. यातला ‘व्‌‍’ जाण्याचं काय कारण? ‘ऊन’ प्रत्यय लागतो तेव्हाही हाच न्याय -- ‘खिजवून’. याचप्रमाणं, ‘लाव -- लावू, लावून; धाव -- धावू, धावून; सारव -- सारवू, सारवून; बोलाव -- बोलावू, बोलावून,’ इत्यादी.

हा मुद्दा लक्षात आला म्हणजे दुसर्‍याही एका रूपाचा निर्णय होतो. ‘दुरितांचे तिमिर जाओ’ -- यात ‘जावो’ असं रूप समजणं योग्य नाही. धातू ‘जा’, प्रत्यय ‘ओ’ यांच्या मध्ये 'व्' येण्याचं कारण काय? धातूतच 'व्' असेल तर तो रूपात येईल. जसं, ‘करव -- करवो, पाव -- पावो, धाव -- धावो.’

पण मग ‘जाऊन, येऊन, लेऊन’ अशा रूपात ‘व् असल्यासारखं कानांना वाटतं ते का? आणि जर ‘व् ऐकू येतो तर तो का लिहायचा नाही?

अशा रूपात कानांना ‘व्’ जाणवतो याचं कारण ‘ऊ, ओ, व्’ यांची उच्चारणस्थानं एकमेकांजवळ आहेत. (म्हणूनच जुन्या मराठीत ‘करू – करो, सांगू – सांगो’ अशी उभयविध रूपे येतात.) ‘ऊ’ म्हणताना ओठांचा चंबू होतो; ’ओ’ म्हणताना मोठा होतो. दोन्ही उच्चारांत  ओठांमध्ये ठरावीक फट राहून तोंडातली हवा अडथळा न येता बाहेर पडत राहते. म्हणूनच हे उच्चार लांबवता येतात. या घटनेला वैयाकरण ‘विवृत प्रयत्न’ म्हणतात. उलट ‘व्’ उच्चाराचा ‘ईषत् स्पृष्ट प्रयत्न’ आहे. हा उच्चार करताना खालचा ओठ वरच्या ओठाच्या दिशेनं झेप घेऊन लगेच दूर होतो, आणि यामुळे हवेला किंचित् अडथळा येऊन दूर होतो. ‘व्’ हा उच्चार ‘ऊ, ओ’ यांच्यासारखा लांबवता येत नाही याचं कारण हा अडथळा. उद्धृत उदाहरणांत हा ‘व्’ साठी होणारा प्रयत्न नसतो, ‘ऊ, ओ’ यांच्या जवळ ‘व्’चं स्थान असल्यामुळं ‘व्’ चा भास होतो इतकंच. म्हणूनच 'व' लिहायचा नाही. संशय असेल तिथं लेखनाचा निर्णय व्युत्पत्तीनं होतो.

मग व-श्रुती होऊन मराठीत आलेल्या शब्दांचं काय करणार? संस्कृत ‘घात’ शब्दाचं झालं प्राकृत ‘घाअ;’ त्याची प्रथमा ‘घाओ;’ त्यावरून मराठी ‘घाव.’ ‘राव; पाव’ (< राज, पाद) हेही शब्द असेच आले. आणखीही सापडतील. ते ‘घावो, राओ, पाओ’असे लिहायचे का?

नाही. ही ऐतिहासिक व्युत्पत्ती आहे. ती अद्यतन शब्दाचा प्राचीन शब्दापासून विकास कसा झाला हे सांगते. ‘जाऊ, जाऊन, जाओ’ इत्यादी रूपांचा चर्चेत व्युत्पत्तीचा निर्देश केला तो वर्तमान व्युत्पत्तीचा – म्हणजे शब्दघटनेचा. ‘घाव, राव, पाव’ या शब्दांचे आजचे उच्चार असंदिग्ध आहेत. आजच्या मराठीच्या लेखनात ऐतिहासिक व्युत्पत्ती पाहायची झाली तर ‘घाओ’ पाशीच का थांबायचं? त्याच्याहीमागं का नाही जायचं? आणि ‘घात’ लिहून ‘घाव’ उच्चारायचं झालं तर लेखनाला धरबंदच राहणार नाही.

ज्यांत व् येतो अशा शब्दांच्या रूपांचा हा विचार झाला. पण ज्यांत य् येतो अशा शब्दांचं काय? ‘गाय’ शब्दाची रूपं काय ‘गायी, गायीनं…’ अशी लिहायची? ‘गाई, गाईनं…’ अशी नाही?

नाही. जो न्याय ‘खिजवू’ याला तोच ‘गायी’ला . या आणि अशा रूपांत ‘यी’— ऐवजी ‘ई’ लिहिणं युक्त नव्हे. ‘सोय, कोय, चोय’ अशा यासारख्या अन्यही शब्दांना हाच न्याय. जे शब्द ईकारान्तच आहेत त्यांची  गोष्ट वेगळी. उदाहरणार्थ, ‘बाई, वाई, मुंबई, घाई, -- बाईला, वाईचा, मुंबईला, घाईनं.’