पुणे विद्यापीठ निवडणूक वाङ्मय : एक बातमीपत्र

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
ऑक्टोबर, १९८३

 

[साहित्यक्षेत्रात काही लेखक विनोदी म्हणून प्रसिद्ध आहेत. पेलम वुडहाऊस, चिं. वि. जोशी, कोल्हटकर, पु.ल., मंत्री वगैरे वगैरे. अशा वर्गीकरणावर माझा फारसा विश्वास नाही. शिक्षणक्षेत्रातील बऱ्याच असामी – शिक्षक आणि विद्यार्थी – किती विनोदी लिहितात याची सामान्य वाचकांना कल्पना असत नाही. म्हणून या लेखात प्राध्यापक मंडळींचं विनोदी लेखन मासला म्हणून दिलं आहे. अशा प्राध्यापकांचे विद्यार्थी या गुणात त्यांना सवाई निघाले तर त्यात आश्चर्य काय? मराठीचे एक प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या लेखनाचे विशेष सांगताना म्हणायचे, ‘अनुस्वार म्हणजे लेखनाचा अलंकार असं विद्यार्थ्यांना वाटतं. लिहिता लिहिता थांबल्यावर जिथं लेखणी टेकेल तिथं हा अलंकार उमटतो. मग ‘खडू’चा ‘खंडू’, ‘नदी’चा ‘नंदी’ असे नवे शब्द जन्माला येतात.’ आज अनुस्वाराचं क्षेत्र पुष्कळ मर्यादित झालं आहे. पण अशा विनोदाला अजून किती उदंड क्षेत्र उपलब्ध आहे. हे पुढे दिलेल्या नमुन्यावरून कळावं.]


‘२८ ऑगस्ट १९८३ रोजी’ होणाऱ्या/ झालेल्या, ‘पुणे विद्यापिठा’च्या 'विधी सभे'च्या 'निवडणूकी'विषयीचं बरंच 'वाड्मय' –उमेदवारांची पत्रं, नियतकालिकांचे खास संच इत्यादी ---- ‘निवडणूकी’ आधीच्या आठवड्यात मतदारांच्या घरी येऊन पडलं आहे. या वाड्मयात नमूद केलेली (आणि न केलेली) उमेदवारांची ‘शैक्षणीक’ पात्रता या ‘वाड्मया’वरून कळून येते.

बहुतेक उमेदवार अनेक विषयांतल्या (‘रसायनशास्त्र, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, संख्याशास्त्र’ इत्यादी) अनेक पदव्या धारण करणारे, ‘विद्यापिठीय परिक्षां’त बरीच ‘बक्षीसे’ मिळवलेले आणि ‘प्राध्यपक’ संघटनांत ‘विविधस्तरावर सक्रीय सहभाग’ घेतलेले आहेत. काही ‘अॅंड(व्होकेट)’ आहेत. काहींनी ‘माध्यमिक’ शिक्षक म्हणूनही काम केलं असून, आपापल्या विषयांवर तसंच ‘स्फुट स्वरुपा’चं 'विपूल' लेखनही केलं आहे. एक उमेदवार तर नगर परिषदेतही ‘एक वर्षे’ सभापती होते. दुसरे एक उमेदवार ‘विविध खेळात प्राविण्य’ मिळवलेले आहेत. आणखी एक, ‘प्राध्यापकांच्या द्वी मासिकाच्या’ संपादक मंडळात काम केलेले आहेत.

या ‘उमेदवारांचा’ पुरस्कार करणाऱ्या ‘संघटाना’नीं ‘एकत्रितरित्या’ आपल्या जाहीरनाम्यात आपली भूमिका ‘विषद’ केली आहे. सर्वसाधारण प्राध्यापकाला विद्यापीठीय यंत्रणेत 'महत्वाची कामगिरी बजावयाची असेल तर विधीसभेवर निवडून जाण्याखेरीज अन्य मार्ग नाही’ असं त्यांना वाटतं. गेल्या आठ ‘वर्षात’ 'महत्वाचे' अनेक निर्णय शिक्षकांना विश्वासात न घेता घेण्यात आले. त्यांची ‘पलश्रुती’ म्हणजे शिक्षकांच्या हितसंबंधांवर ‘बेछुट’ घाला आणि आणि परीक्षा ‘पद्धती’सकट अनेक गोष्टींत ‘लांच्छनास्पद’ बजबजपुरी, अंदाधुंदी आणि गोंधळ. ही परिस्थिती पालटण्यासाठी संघटनांच्या ‘उमेंदवारांनाच प्रचंड बहुमताने निवडुन द्यायला हवे’. हे ‘उमेंदवार’ प्राध्यापकांचं ‘प्रतिनिधीत्व’ ‘सुयोग्यरित्या’ करतील, आपल्या कामात ‘जागरुक रहातील’. आणि देशाचा ‘सर्वांगिण’ विकास, ‘शिक्षणपद्धतीचे पुर्नमुल्यन’, ‘वेतनश्रेंणी’, किमान ‘विद्यार्थीसंख्या’, विद्यापीठातील निरनिराळ्या समित्यांवरील ‘नेमणूकी’, ‘मेडीकल अलाऊन्स’, ‘परिक्षकांचे मानधन’ इत्यादी जिव्हाळ्यांच्या प्रश्नांत 'आव्हान स्विकारून' योग्य कामगिरी बजावतील. या उमेदवारांना निवडून 'देवून' शिक्षक मतदारांनी आपली ताकद वाढवावी. नाही तर त्यांना 'पश्चाताप' करण्याची पाळी येईल.

सर्व ‘मा०  प्राध्यापक बंधूभगिनींना’ हे 'विदीत' असो. ‘लोभ आहेच, वृध्दिंगत व्हावा’.