मराठीतील काही दिवंगत मंडळी

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जानेवारी, १९८४

 

मृत व्यक्तींचा आदरानं निर्देश करणं हा एक सुसंस्कृतपणाचा भाग आहे. अशी व्यक्ती ‘कै(लासवासी), वै(कुंठवासी), स्व(र्गवासी), पै(गंबरवासी), ख्रि(स्तवासी), प(रलोक)वा(सी), बुद्धवासी’ असं एखादं बिरूद घेऊन औपचारिक भाषणात/लेखनात प्रकट होते. मृत व्यक्ती संन्यासी असेल तर ती ‘ब्रह्मीभूत’. अनौपचारिक उल्लेखांतसुद्धा मृत्यूचा निर्देश ‘गेला, वारला, देवाघरी गेला, निज धामाला गेला, चैतन्यात विलीन झाला’ असा एखाद्या आडवळणानं येतो. त्यामुळं एखाद्या शोकसभेत ‘साने गुरुजी मेले’ असं एखादा मराठी वक्ता बोललेला ऐकला की मराठी श्रोत्याला चमत्कारिक वाटतं. मृताला पुष्कळदा ‘श्रद्धांजली’ वाहतात, ‘ईश्वर मृतात्म्याला शांती देवो’ अशी प्रार्थना करतात. या सगळ्यात एक विलक्षण सांस्कृतिक/धार्मिक श्रद्धा-धारणांचं मिश्रण झालेलं दिसतं.

‘वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी, परलोकवासी’ या बिरुदांत ‘वैकुंठ, कैलास, स्वर्ग, परलोक’ ही श्रद्धाविषयभूत का असेनात, पण स्थानं आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी मृत व्यक्तीनं, म्हणजे तिच्या आत्म्यानं, राहणं (‘वासी’) हे समजण्यासारखं आहे. पण एखादी व्यक्ती ‘पैगंबरवासी’ होते, ‘ख्रिस्तवासी’ होते, ‘बुद्धवासी’ होते, म्हणजे काय होते? ‘बुद्धवासी’ होते, म्हणजे काय होते? ‘पैगंबर, ख्रिस्त, बुद्ध’ या व्यक्ती म्हणून आपणांला माहीत आहेत. त्यांच्या ठिकाणी मृत व्यक्ती ‘राहतात’ कशा ? इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांतल्या श्रद्धांप्रमाणं मृतांचे आत्मे निवाड्याच्या दिवसापर्यंत पुरल्या जागी पडून असतात. हा निवाड्याचा दिवस येईपर्यंत त्यांना ‘कबरवासी’ यासारखं काही तरी बिरूद देणं उचित होईल. निवाड्याचा दिवस येऊन गेल्यावर बिरुदाची गरजच राहणार नाही; कारण त्यांचा उल्लेख, गौरव करायला पृथ्वीवर कुणीच उरणारच नाही. ‘कैलासवासी वैकुंठवासी’ ही बिरुदं मात्र लागतील, कारण ही ज्या समाजात प्रचारात आहेत त्या समाजाच्या श्रद्धेप्रमाणं अगदी प्रलयानंतरसुद्धा पुन्हा सृष्टी आहे, आणि मृतांचा निवाडा ही गोष्ट सृष्टिचक्रात व्यक्तिशः अखंड चालणारी आहे.

‘श्रद्धांजली’ या शब्दाची घडण ‘तिलांजली’सारखी असली तरी त्याचं मूळ इंग्रजी ‘होमेज्’मध्ये (homage) असावं. या शब्दातले दोन्ही अवयव संस्कृत असले तरी त्यांचा हा समास संस्कृत वाङ्मयात कुठं भेटत नाही. तथापि या शब्दात वावगं काही नाही, कारण त्याचा विशिष्ट धर्मांतल्या श्रद्धांशी संबंध नाही. ‘मृतात्म्याला शांती’ ही संकल्पना मात्र ‘मे हिज् / हर सोल रेस्ट इन पीस’ या ख्रिस्ती / इंग्रजी संकल्पनेवरून आलेली दिसते; तीत ईश्वराची भर ईश्वरनिष्ठ हिंदू मनानं घातली असावी. हिंदू श्रद्धांत अंतिम निवाड्याचा दिवस म्हणून काही नाही, त्यामुळं त्या दिवसापर्यंत मृताच्या आत्म्यानं शांतपणानं विश्रांती घेणं अशी इच्छा व्यक्त करण्याला हिंदु-धर्मी यांच्या बाबतीत काही अवसर नाही. मृतात्म्याला ‘सद्गती’ चिंतणं रास्त आहे.

दिवंगत व्यक्तीच्या संबंधात केल्या जाणार्‍या शब्दप्रयोगांतला आणखी एक आहे ‘वृद्धपकाळानं मृत्यू. हा प्रयोग करणार्‍यांना ‘वृद्धपणा’ आणि ‘वृद्धपकाळ’ यांमधला भेद बहुतेक माहीत नसतो. ‘अपकाळ’ म्हणजे हलाखी. वृद्धपणानं मृत्यू पावलेले सगळे काही हलाखीत जगलेल/मेलेले नसतात. अर्थ न कळताच केल्या जाणार्‍या या शब्दप्रयोगासारखा दुसरा शब्दप्रयोग म्हणजे नामापुढं येणारा ‘प्रीत्यर्थ’ (संतोषासाठी, आनंदासाठी) हा अवयव -- शब्दयोगी अवयव. हा प्रयोग मुळात ‘श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे’ यासारख्या संस्कृत रचनेवरून मराठीत आला असणार. तो ‘लग्नाप्रीत्यर्थ, सत्काराप्रीत्यर्थ’ अशा प्रयोगांत चालवून घेणं शक्य आहे. पण कुणाच्या तरी ‘निधनाप्रीत्यर्थ’ ‘(सुटी)’ हा काय प्रकार आहे ? निधन हा काय संतोष आनंद प्रकट करण्यासारखा विषय आहे ?