मराठीत इ-ई, उ-ऊ भेद आवश्यक आहे काय?

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
फेब्रुवारी, १९८४

 

[मराठी वर्णमालेत इ-ई (र्‍हस्व-दीर्घ), उ-ऊ (र्‍हस्व -दीर्घ) हा भेद मानला पाहिजे का, असा प्रश्न काही लोक उपस्थित करीत असतात. यांमध्ये काही भाषाभ्यासकही आहेत. उदाहरणार्थ, प्रा. सदाशिव आठवल्यांचा लेख -- ‘रसिक’ दिवाळी अंक, १९८३; ‘ध्वनिविचार’ -- डॉ. ना. गो. कालेलकर. या मताचा युक्तिवाद आणि त्याचा प्रतिवाद हा या लेखाचा विषय.]

मराठी वर्णमालेत इ आणि उ स्वरांचे र्‍हस्व-दीर्घ हे भेद स्वतंत्रपणे गणण्याचं कारण नाही. याचं एक कारण हे की या स्वरांचे र्‍हस्वत्व/दीर्घत्व हे, त्या त्या स्वरांचं त्या त्या शब्दातलं जे स्थान, त्यावरून आपोआप ठरतं.

ते कसं?

समजा, हे स्वर शब्दाच्या/रूपाच्या अंती आहेत; या जागी ते दीर्घच असणार. उदाहरणार्थ : गोळी, पेरू, गडी, दांडू, वैदू, केळी. समजा, उपांती आहेत; या जागी दोन परिस्थितींना अनुसरून ते दोन प्रकारांनी वागतात : अंती निभृत (अनुच्चारित) अ असेल तर ई, ऊ-- दीर्घ; अंती दीर्घ स्वर असेल तर इ,उ -- र्‍हस्व. उदाहरणार्थ : वीट, चूल, उंदीर, मलूल; विटा, चुली, विळा, चुला. शेवटून तिसर्‍या/अलीकडच्या जागी हे स्वर र्‍हस्वच असतात. उदाहरणार्थ : विहिरीत, पाहुण्याला, विटाळ, बिघडलेला, उपटला. तात्पर्य --

शब्दातला क्रम --४         ३          २          १
इ।उ        (१)  र्‍हस्व    र्‍हस्व      र्‍हस्व      दीर्घ
             (२)  र्‍हस्व    र्‍हस्व      दीर्घ       निभृत अ

 

दुसरं कारण कोणतं?

हे की या स्वरांच्या र्‍हस्व/ दीर्घ भेदानं शब्दांच्या अर्थांत फरक पडला नाही. ‘वीटा, चूली’ म्हंटलं तरी अर्थ तेच. जे स्वर सर्वार्थानं एकमेकांहून भिन्न आहेत, त्यात एकाच्या जागी दुसरा आला, तर वेगळ्या अर्थाचा शब्द तयार होतो. उदाहरणार्थ : पाट -- पोट. म्हणून आ आणि ओ भिन्न. अशा शब्दांना भाषाशास्त्री ‘किमान जोडी’ ( मिनिमल पेअर ) म्हणतात. अशी परिस्थिती इ-ई, उ-ऊ, या जोड्यांच्या बाबतीत नाही. म्हणूनच या स्वरांना लेखनात वेगवेगळ्या खुणांची गरज नाही. वरचेच शब्द घ्या : ते ‘गोळ^, पेर_, गड^, दांड_, व^टा, च_ली असे लिहावे. खूण एकच राहील. उच्चार स्थानपरत्वे र्‍हस्व किंवा दीर्घ होईल. हे परिभाषेत मांडायचं तर : इ आणि उ या स्वरांचे र्‍हस्व-दीर्घ भेद उच्चाराच्या पातळीवर आहेत, स्वनिम ( फोनीम ) पातळीवर नाहीत. खूण एकच ठरवली तर वेळ, श्रम, शाई, खिळे आणि चुकांचं प्रमाण या सगळ्यांत बचत होईल. साक्षरताप्रसारालाही मदत होईल

पण तुमच्या दोन्ही कारणांना छेद देणारे असेही शब्द मराठीत आहेत त्याचं काय?

सांगा.

‘गुण, कुल, शुभ, हित, विहित, मलिन, फलित, प्रीती, शीतल, प्रतीती, गीतेत, दूताला, सीतेने, रूपमती, शून्य, सूत्र, सूची, सूचना, मूत्र, द्वीप (समूह), दूरान्वित, भूगोल, शूराला, रूपानं, पूर्व, नीरव’ असे शब्द पहिल्या कारणाला छेद देतात, कारण या शब्दांत र्‍हस्व/दीर्घ स्थानसापेक्ष नाहीत, ‘प्रिडिक्टेबल’ नाहीत. ‘सिता -- सीता, सुत-- सूत, पुर -- पूर, सुकर -- सूकर’ अशा जोड्या तुमच्या दुसर्‍या कारणाला छेद देतात.

हे सगळे शब्द संस्कृत आहेत. आमचं विधान मराठी शब्दांविषयी आहे.

मराठी उदाहरणं हवीत? ही घ्या: ‘ऊर्फ; सूज्ञ;’ ‘भुतं -- भूतं, सुरी -- सूरी, रिती - रीती, रुपं - रूपं, शिव -- शीव, विट -- वीट, शिताला -शीताला, मूलात - मुलात.’ या प्रत्येक जोडीत एक एक शब्द (तद्भव) मराठी आहे. पण खरं तर हे सगळेच शब्द मराठी.

ते कसे काय?

जे शब्द मराठीत प्रचारात आहेत, ते मराठीच नव्हेत काय? उद्धृत शब्द संस्कृतातून मराठीत आले आहेत, ही ऐतिहासिक माहिती झाली. विषय आजच्या मराठीचा चालू आहे. वर्णनात्मक विचारात इतिहासाचा मुद्दा आणणे अप्रस्तुत आहे. याच कारणासाठी ‘बॅट, बॉल, क्रिकेट, टर्म, स्कूटर, मोटर’ हे आणि असे शेकडो शब्द मराठीच म्हटले पाहिजेत. इंग्रजी शिकू लागलेला मुलगा जेव्हा आईला विचारतो, ‘ आई, बॉलला इंग्रजीत काय म्हणतात? तेव्हा दुसरं काय म्हणणार? शिवाय, इंग्रजीतले असे छेद देणारे शब्द मराठीत रुळले आहेत, त्यांचं काय? स्कूटर लीडर, मीटिंग, शूटिंग, टू-सीटर, कूलर, फीलिंग, रूलिंग, वगैरे? मराठीतली किंवा अन्य भारतीय/विदेशी भाषांतली नावं (भूपेंद्र, भूपत, रूपा, श्रीधर, वीरेंद्र, श्रीपती, नीरद, न्यूटन, माक्स म्यूलर, कूपर, रूदरफोर्ड) ? शास्त्रीय प्रौढ निबंधांतल्या शेकडो पारिभाषिक (यातला ‘षि’ पाहा) किंवा अन्य शब्दांचं काय करणार? गुरूपदेश’ सारख्या संधीचं काय करणार?

बरं, हे सगळं शब्द मराठी म्हणू या. पण तरी तुम्ही म्हणता ते शब्द बहुसंख्य शब्दांहून कमीच ते अपवाद म्हणून सांगता येतील.

म्हणजे, तुम्ही म्हणता ती दोन कारणं तुम्ही मागं घेतली. आताचं हे वेगळं कारण, असंच ना?

समजा, तसंच. पण पुढं काय म्हणणं?

म्हणणं असं की अपवाद म्हणून याद्या देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा मुळातच काही तरी चुकलेलं असतं. अशा याद्या देण्यापेक्षा इ आणि उ  या स्वरांचे ऱ्हस्व आणि दीर्घ भेद स्वनिम पातळिवर सांगणं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र खुणांची तरतूद करणं (जी मुळात आहेच) हे लाघवाचं -- काटकसरीचं -- नाही का? उपपत्तीत लाघव असणं हे शास्त्रीयतेचं एक महत्त्वाचं गमक आहे. आणि बहुसंख्य शब्दांच्या बाजूने कौल द्यायला, शास्त्र म्हणजे लोकशाही थोडीच आहे? शास्त्रात सामान्य नियम बलवत्तर असतो. म्हणून तर भाषाशास्त्र्याला किमान जोडी एकसुद्धा पुरते. तो म्हणतो: एक जोडी सापडली ना? आणखी पुष्कळ असणार. त्या शोधल्या की दिसतील.

बरं, र्‍हस्वदीर्घाच्या तरतुदीनं साक्षरता-प्रसाराच्या कामात अडथळा येतो, त्याचं काय?

खरं तर, शास्त्रीय चर्चेत अशा गोष्टी आणू नयेत साक्षरताप्रसाराला सोयीचं आहे, म्हणून गणित, फिरवणार? पदार्थविज्ञान, रसायन, भूगोल, इतिहास, -- काय काय फिरवणार? ‘भरला, धरला’ यांच्यासारखं 'करला' रूप सांगणार? वस्तुस्थिती अशी आहे, की शास्त्राचा मार्ग हा सगळा विचार करता, सगळ्यांत सोपा आणि काटकसरीचा मार्ग असतो. असंदिग्धतेचा बळी देऊन सोपे सोपेपणा साधू पाहाणं हे शेवटी अधिक कष्टाचं ठरतं. समजा, क वर्ग आणि प वर्ग यांच्यासाठी सारख्याच -- समजा, ‘प, फ, ब -- खुणा वापारायच्या, असं मानलं, तर ‘पाटा, चाप, फुटला, फळ, बाईला, भाट, भळाभळा’ हे शब्द कोणते म्हणून वाचणार? पाटा की वाटा? चाप की चाक? म्हणजे, ही काटकसर फसवी आहे. शास्त्राचा मार्ग हाच विश्वासार्ह मार्ग आहे.