-ईल, -एल आणि -ला गेला*

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
मार्च, १९८४

 

‘तय्यबजी बाहेरी होता. परंतु चित्पावनाला लाजवेल असं निखळ मराठी त्याच्या…ओठांवर होतं (कॉग्ज ७५)

‘लाजवेल’हे रूप पाहा. ‘’लाजव’ धातू सकर्मक आहे; कारण तो ‘लाज’ धातूवरून साधलेला प्रयोजक धातू आहे. (सर्व प्रयोजक धातू सकर्मक असतात.) त्याला इथं अकर्मक धातूंचा ‘एल’ प्रत्यय जोडला आहे. वस्तुतः इथं ‘ईल’ प्रत्यय जोडून लाजवील असं रूप करायला हवं होतं. ‘एन।ईन’ प्रत्यय जोडतानाही हाच नियम.

पण ‘जा’ धातू अकर्मक आहे. तरी त्याचं रूप जाईल असंच होतं, ‘जाएल’ असं नाही.

खरं आहे. एकाक्षरी (खरं तर, स्वरान्त – आकारान्त, ईकारान्त, ऊकारान्त, एकारान्त. अकरान्त समजले जाणारे मराठी धातू – कर, उठ, निघ… -- वस्तुतः व्यंजनान्त आहेत.) धातू सकर्मक असो अकर्मक, असो, ‘ईल,ईन’ हेच प्रत्यय घेतो.

पण ‘सांग’ धातू तर सकर्मक आहे. त्याची रूपं ‘सांगेन, सांगेल’ अशी कशी?

कारण हा धातू ‘उमजगणा’ तला आहे. (पाहा: दामल्यांचं ‘शास्त्रीय मराठी व्याकरण,’ अनुच्छेद ३७५. यातल्या याद्या पूर्ण नाहीत.) या गणातले धातू सकर्मक असूनही ‘एन,एल’ प्रत्यय घेतात.

[काही महिन्यांपूर्वी श्री. अशोक लघाटे, मुंबई यांनी ‘ग म भ न’ सदरात परामर्श करण्यासाठी हा विषय पत्ररूपानं उपस्थित केला होता. त्यांच्या शंकांची उत्तरं या चर्चेत मिळावीत.]

‘वर्ग संपल्यावर आमच्या भेटीगाठी होत. यातून परिचय वाढला गेला.’ (मुलखावेगळी माणसं ५)

‘… हा रचनाबंध ठरला गेला.’ (विज्ञानकथा – एक टिपण ४)

‘वाढला गेला, ठरला गेला’ हे प्रयोग पाहा. यांत ‘गेला’ हे शेपूट अकारणच जोडलं आहे. ‘जा’ धातूची अशी रूपं दामले ज्याला ‘नवीन कर्मणी प्रयोग’ म्हणतात, त्यात येतात; अर्थात सकर्मक धातूंच्या ला-कृदन्तांसह येतात. जसं शिपायाकडून चोर धरिला जातो.’ (दामले, अनुच्छेद ५६०)  वर उद्धृत केलेल्या वाक्यांतले ‘वाढ, ठर’ हे धातू अकर्मक आहेत. ‘वाढला गेला = वाढला,’ ‘ठरला गेला = ठरला.’म्हणून ‘गेला’ हे शेपूट अकारण.

‘अकारण’ कसं? ‘वाढला गेला’ आणि ‘वाढला’ यांच्या अर्थांमधे भेद आहे, तसाच ‘ठरला गेला’ आणि ‘ठरला’ यांमधेही आहे.

तो कोणता?

‘वाढला गेला’ याचा अर्थ प्रयत्नावाचून इच्छा नसूनही वाढ झाली, असा आहे. नुसत्या ‘वाढला’ या प्रयोगात हा अर्थ येत नाही.

असा जर ‘गेला’ या अवयवाचा अर्थ होत असेल, तर ‘‍बर्‍याच प्रयत्नानंतर शिपायाकडून चोर धरिला गेला’ याचा अर्थ काय करणार? ‘काही प्रचार न करताच तो अध्यक्ष म्हणून निवडून आला’ याचं काय करणार? का ‘... निवडून आला गेला’ म्हणणार? यावरून, तुम्ही सांगता तो अर्थ अन्वय-व्यतिरिकाने ‘गेला’ या अवयवाचा ठरत नसून संदर्भप्राप्त ठरतो.

या न्यायानं ‘द्रौपदी द्युतात हरली गेली होती’ ( ललित लेणी ८७) हे वाक्य बरोबर, की चूक?

हे वाक्य बरोबर. कारण ‘हर’ हा धातू जसा अकर्मक आहे ( ‘द्यूतात नल हरला’), तसा सकर्मकही ( ‘द्यूतात नल राज्य हरला’ ) उपलब्ध आहे. ‘द्रौपदी’ हे या वाक्यातलं कर्म. कर्ता घातला, तर ‘युधिष्ठिराकडून’ असा घालावा लागेल. तो संदर्भप्राप्त आहे.