नको म्हणूस

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
एप्रिल, १९८४*

 

१.    असं नको म्हणूस. (५४)
२.    इतक्यातच पहिला बच्चा होऊ नको देऊस. (६२)
३.    तू स्वतः नको रिसर्च करूस. (८४)
४.    आमच्यावर रागावलास तर नाही ना ? (२१०)
५.    त्याची नको काळजी करूस तू. (२१३)
६.    नाही, सुलताना, माझ्याकडून वचन नको मागूस. (२२४)

(‘किती उशीर केलास?’)

वर उद्धृत केलल्या बहुतेक अवतरणात ‘नको’ हे निषेधार्थक क्रियापद ऊ-कृदन्तासह योजलं आहे. फक्त एकच (क्र. ४) ‘नाही’ हे ला-कृदन्तासह योजलं आहे. ‘ऊ-कृदन्त+नको’ हा निषेधात्मक आज्ञार्थ विधि-आज्ञार्थाचा प्रतिद्वंद्वी म्हणून मराठीत येतो. जसं, ‘जा X जाऊ नको, ये X येऊ नको, बोल X बोलू नको.’ ‘नको’ या क्रियापदाला द्वितीय पुरुष एकवचनात ‘स’ हा प्रत्यय विकल्पानं लागतो. त्या पक्षी वर दिलेली उदाहरणं ‘जाऊ नकोस, येऊ नकोस, बोलू नकोस’ अशी होतील. ‘स’ हा आख्यातप्रत्यय आहे; तो क्रियापदाच्या अंती येणं रीतसर आहे.

चौथ्या उदाहरणात ‘नाही’ हे क्रियापद आहे. नित्याची प्रघात पाहिला तर ‘रागावलास X रागावला नाहीस’ अशी प्रतिद्वंद्वीची जोडी सिद्ध होईल. ‘रागावलास’ हे रूप सरळच लाख्यात द्वितीय पुरुषाचं आहे; त्यात अंती ‘सं’ येणं रीतसर आहे. ‘रागावला नाहीस’ यात ‘रागावला’ हे लाकृदन्त आहे, आणि ‘नाही’ हे क्रियापद आहे. त्यामुळं ‘नाही’ला जोडून द्वितीय पुरुषाचा ‘स’ प्रत्यय येणं रीतसर आहे.

उद्धृत उदाहरणांत ‘स’ हा प्रत्यय सर्वत्र कृदन्तांना जोडून योजला आहे. तो असा कसा जोडता येईल? ‘म्हणून, देऊस, करूस, मागूस’ अशी तर कृदन्तं मराठीत उपलब्ध नाहीत. ‘तो म्हणू लागला’ याप्रमाणं ‘तो म्हणूस लागला’ किंवा ‘तो लागला म्हणूस’, ‘तू लागला म्हणूस’ असे काही प्रयोग मराठीत होत नाहीत. ‘म्हणूस नको, देऊस नको, करूस नको, मागूस नको’ असेही प्रयोग होत नाहीत. मग ‘नको’ याचं स्थान बदलल्याबरोबर त्याच्या हक्काचा ‘स’ प्रत्यय कृदन्ताकडं कसा जाईल ? अन्य कृदन्तांच्या बाबतीत असं होत असलेलं आढळत नाही. ‘करतोस’ याचा प्रतिद्वंद्वी ‘करीत नाहीस/ नाहीस करीत’ असा होतो; ‘करीतस नाही/ नाही करीतस’ असा होत नाही. ‘जाणार नाहीस’ अशाही प्रयोगांना हाच न्याय. यावरून उद्धृत उदाहरणांत ‘स’ हा आख्यात प्रत्यय ऊ-कृदन्ताला, ला-कृदन्ताला जोडला आहे तो युक्त नाही. वस्तुतः उद्धृत प्रयोग असे व्हायला हवेत :

१.    असं नकोस म्हणू.
२.    ...पहिला बच्चा होऊ नकोस देऊ.
३.    ...नकोस रिसर्च करू.
४.    ...रागावला तर नाहीस ना?
५.    ...वचन नकोस मागू.

‘नको म्हणूस, नको देऊस’ यांसारखे प्रयोग कसे जातात याचा शोध घेण्यासारखा आहे. सोयीसाठी ‘म्हणू’=क, ‘नको’ =ख, ‘स’ =ग असे संकेत घेऊ. संकेतांचा उपयोग केला तर ‘म्हणू नकोस’ या पदसंघाताची मांडणी गणित-पद्धतीनं अशी करता येईल : (क+ख) ग. आता गणिताच्या दृष्टीनं ‘क+ख’ आणि ‘ख+क’ यांच्या मधे भेद नाही. भाषेतही असा क्रमविपर्यय अनेक ठिकाणी आढळतो. ‘आला नाही/ नाही आला, जाणार नाही/ नाही जाणार’ इत्यादी प्रयोग पाहा. यावरून ‘क + ख’ यांचा क्रमविपर्यय होऊन ‘ख+क’ असा संघात बनला. तो मूळ कंसांतर्गत संघाताच्या जागी येऊन '(ख+क) ग' असा संकेत बनला. संकेत काढून मूळ पदं घातली. की  ‘(नको म्हणू)स’ पदरात पडतं.

यात चूक कुठे आहे ? ‘म्हणू नकोस’ = (क+ख) हीच मांडणी चुकली; कारण ‘खग’ संयोग अविभाज्य आहे. ‘खग’ हे एकच पद आहे. अखंड पद मागं पुढं होऊ शकतं; पदाचा एखादाच अवयव मागं पुढं होऊ शकत नाही. ‘जाणार नाही/ नाही जाणार’ चालेल, ‘जाणा नाहीर’ चालणार नाही. एकपदत्व ही व्याकरणातली मूलभूत संकल्पना आहे.

 


 

 

 

‘ललित,’ एप्रिला १९८४-च्या अंकात ‘असामान्य मराठी’ या विषयावर लिहिलं आहे. त्यात मराठीतर स्त्रोतांमधून आलेल्या शब्दांचा परामर्श नाही. सामान्य रूपांचा मुद्दा इंग्रजीतून मराठीत आलेल्या शब्दांच्या बाबतील प्रा. सुधा जोशी उपस्थित करीत आहेत. फार चांगला मुद्दा आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच उद्धृत केलेल्या उदाहरणात सापडण्यासारखं आहे. ‘मोह(हा)र’ शब्द सामान्य रूप घेतो - (मोह(हा)रीत,)’ ‘बस’ हा शब्द घेत नाही – ‘बसमधे’ (‘बशीत’ नाही!, कारण या शब्दांच्या वयात अंतर आहे. पहिला मराठीत येऊन पुष्कळ काळ लोटला; दुसरा त्या मानानं अलीकडचा आहे. विकल्प आढळतो (‘स्टेशन’) तिथं शब्द जुन्यांत जमा होऊ लागला आहे, @ समजावं.

सामान्य रूप हे कपड्यांसारखं आहे. जीन घालणार्‍या व्यक्तीचं वय अंदाजानं सांगता येण्यासारखं आहे. विशिष्ट वयोमर्यादेनंतर ती व्यक्ती जीन घातलेली आढळणार नाही संक्रमणावस्थेत जीन आहे, दुसरा वेष आहे, असा विकल्प काही काळ आढळेल. ज्यांचं वय वाढतच नाही, अशाही व्यक्ती असतात. हे सर्व पर्याय शब्दांच्या सामान्य रूपांच्या विचारात संभवतात.