ऱ्हस्व आणि दीर्घ : आठवल्यांचं प्रतिपादन

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जून, १९८४

 

संदर्भ : ‘ललित’, एप्रिल १९८४. प्रा. सदाशिव आठवले यांचं पत्र.

प्रा. आठवले हे इतिहासाचे पंडित. (‘मशारनिल्हे’ या पगडीचा वापर करून त्यांनी याची प्रचीती आणून दिलीच आहे.) त्यांनी र्‍हस्वदीर्घासारख्या विषयात रुची प्रकट केली (असं क्वचितच घडतं.) यासाठी त्यांचं अभिनंदन. संस्कृतातही आपणांला रस आहे (असे त्यांच्या पूर्वीचे इतिहासपंडित म. म. पोतदारच.) याचाही प्रत्यय त्यांनी आपल्या पत्राच्या समारोपात आणून दिला आहे. (खरं तर ‘मशारनिल्हे’ या उपक्रमाला ‘सलाम आलेकुम/ कुर्निसात/ आदाब अर्ज', असा एखादा उपसंहार साजून दिसला असता. आठवले लिहितात, ‘नमस्ते’, आणि दुरुस्ती करून म्हणतात, ‘नमस्तुभ्यम्’ किंवा ‘नमो भवान्.’ त्यात गडबड इतकीच की ‘तुभ्यम्’ हेही एकवचनच आहे; ते समजतात तसं बहुवचन नाही. शिवाय संस्कृतात आदरार्थी बहुवचन अपरिहार्य नाही. तेव्हा ‘नमस्ते’ चालेल, ‘नमस्तुम्यम्’ हेही चालेल; कारण ‘ते = तुभ्यम्’ पर्यायी रूपं. ‘नमो भवान्’ मात्र चालणार नाही; कारण ‘भवान्’ ही आहे प्रथमा, आणि ‘नमः’ या अव्ययाचा प्रयोग तर नमस्कार्य व्यक्तीच्या – पण जाऊ दे. या माहितीचा उपयोग व्हायला त्यांना शालान्त परीक्षेला – आणि तेही संस्कृत घेऊन – थोडंच बसायचं आहे ! झालंच तर, ते प्रोफेसर, आम्ही पंतोजी, - ‘समुद्रपल्वलयोः इव अन्तरम्’ ! काय म्यां पामरं बोलावीं उत्तरें !!) अस्तु. प्रकृतमनुसरामः.

तर आठवल्यांचा मुद्दा काय, तर एकच चिन्ह अनेक उच्चारांसाठी वापरायची मराठीची रीतच आहे (‘चहा - चमचा’ इत्यादी); त्यात र्‍हस्वदीर्घांची भर पडली तर काय बिघडलं? आम्ही म्हणतो, कवर्ग आणि पवर्ग यांच्यासाठी सारखीच चिन्हं वापरावी. काय बिघडलं? या सगळ्यांत बिघडतं ते हे की उच्चारभेद स्पष्ट कळण्याची तरतूद आवश्यक असताना उच्चार संदिग्ध राहतो.

पण ‘चहा-चमचा’ वर्गांतला असा संदिग्धपणा आपण चालवून घेतोच की.

खरं आहे. पण असलेला संदिग्धपणा चालवून कोणी घेणं वेगळं आणि नसलेला निर्माण करणं वेगळं. खरं तर, ‘चहा-चमचा’ वर्गातला संदिग्धपणा दूर करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. दादोबांच्या काळात ‘चमचा’ यातला च बिंदूने अंकित करून चमचा वेगळा दाखवायची पद्धत होती. ती आपण घालवून बसलो आहोत. त्याबद्दल आठवले काही तक्रार करीत नाहीत. ‘ऐ’( =अई) आणि ‘औ’(अऊ) या स्वरगटांना उच्चारभेद नसतानाही दोन दोन चिन्हं आहेत त्याबद्दलही काही बोलत नाहीत. आणि ज्यांमधला उच्चारभेद स्पष्ट आहे, आणि स्थाननियत नाही त्या र्‍हस्व दीर्घ इकार-उकारांविरुद्ध युद्ध पुकारतात! आठवल्यांचं प्रतिपादनाचं तत्त्व काय हेच स्पष्ट होत नाही.

नाही कसं ? पहिलं तत्त्व : ‘खूण एकच राहिली आणि उच्चार वेगवेगळे झाले तर बिघडले काय ?’

दुसरं : ‘भाषाशास्त्र नावाचे जे शास्त्र आपण कल्पिले आहे ते लोकशाहीच आहे. बहुतांना विचारांची आणि भावनांची देवाण-घेवाण करता यावी म्हणून भाषा असते, भाषाशास्त्रज्ञांना कुठल्या तरी लोकव्यवहारबाह्य अशा कसोट्या लावून वितंडवाद करता यावेत म्हणून नसते.’

तिसरं : ‘आतापर्यंत मराठी शुद्धलेखनाच्या नियमांत पुष्कळ ‘बदल’ करण्यात आलेच ना? ... शास्त्राशी किती हा खेळ!...मग मी माझ्या लेखात सुचविलेल्या सर्व सुधारणांचा विचार करून आणखी थोडा होऊ द्या की! भाषा बदलत असते, लेखनपद्धती बदलत असते आणि जरूरी प्रमाणे ती बदलावीही.’

ही ‘तत्त्वं?’ ही तर अंदाधुंदी ! तत्त्वांना तर्कशुद्धता असावी लागते. ‘तासांना दांडी मारली तर बिघडलं कुठं? परीक्षेला बसलं नाही तर बिघडलं कुठं? कॉपी केली तर बिघडलं कुठं ?’ असं विद्यार्थी म्हणायला लागले तर प्राचार्य त्यांना काय सांगणार आहेत? अशी भूमिक घेतली तर उद्भवणारी अनवस्था ‘ग म भ न’ सदरातल्या मूळ लेखात (फेब्रु. ८४) शेवटच्या परिच्छेदात दाखवली आहे. आठवले विचारतात, ‘शेवटच्या आठ ओळींत तो सवाल टाकला आहे तो कुणाला? मी तरी तसे काही म्हटलेले नाही.’ असं वेड पांघरून सुटता येणार नाही. तुम्ही म्हटलेलं नाही; पण तुमच्या शैलीनं कुणी तुम्हांला म्हटलं तर त्याला तुमचं उत्तर काय? ‘काटा’ शब्द कुणी ‘पाटा’ असा लिहिला तर बिघडलं कुठं ? हीच स्थिती तिसर्‍याही ‘तत्त्वा’ची. अशोकाच्या काळापासून देवनागरीत पुष्कळ बदल झाले. क वर्गातली व्यंजनं लिहिण्यासाठी प वर्गाचीच चिन्ह वापरावी या माझ्या सूचनेचा विचार करून आणखी थोडा होऊ द्या की ! नाही तरी ‘लेखनपद्धती बदलत असते’च.

बरं, पण ते लोकशाहीचं तत्त्व?

तेही अनुपपन्न आहे. मुळात, भाषा आणि भाषाशास्त्र एक नव्हत. भाषा हा भाषाशास्त्राचा विषय आहे. तो लोकव्यवहारसिद्ध आहे. तो गृहीत करून भाषाशास्त्र हे त्याची रचना, शास्त्राला बंधनकारक असलेले नियम पाळून, विशद करतं. भाषा ही लोकव्यवहारसिद्ध असली तरी तीत वाटेल त्याला लहर म्हणून बदल करता येत नाहीत. केले तर 'बहुतांना विचारांची आणि भावनांची देवाण-घेवाण (की अभिव्यक्ती?) करता यावी’ हे जे प्राचार्यांच्या(ही) मतानं प्रयोजन ते सिद्धीला जाणार नाही. समजा, ‘झाडाला पुस्तक’ म्हणावं असं माझं मत आहे. आणि मी म्हटलं,  ‘प्रत्येकानं आपल्या आवारात चार तरी पुस्तकं लावली पाहिजेत,’ तर माझं म्हणणं ऐकणार्‍यांना कळावं कसं? म्हणजे, लोकशाहीची वाट लागली.

हा वितंडवाद झाला. असल्या ‘लोकव्यवहारबाह्य कसोट्या’ लावून साधणार?

होय. वर मांडली आहे ती परिस्थिती काल्पनिक आहे, लोकव्यवहारबाह्यच आहे. पण ती आठवल्यांच्या प्रतिपादनातली दाखवण्यासाठी मांडली आहे. झाडाला ‘पुस्तक’ म्हणणं हे लोकव्यवहारबाह्य: आणि र्‍हस्व/दीर्घ इकार-उकारांसाठी एकच चिन्ह योजावं हे काय लोकव्यवहारसिद्ध आहे ? खरं तर र्‍हस्व/दीर्घ इकार-उकारांसाठी वेगळी चिन्ह लोकव्यवहारसिद्धच असून ती असणं आवश्यक कसं आहे हे प्रत्यक्ष प्रयोगातल्या भाषेतली वस्तुस्थिती मांडूनच मी निर्दिष्ट लेखात दाखवलं आहे. आणि त्यात केवळ आठवल्यांचाच लेख विषयभूत नाही, तर त्यांच्या सारखं मत मांडणार्‍या सर्वांचाच युक्तिवाद विषयभूत आहे. (हे त्या लेखाच्या आरंभी स्पष्ट केलं आहे.) आठवल्यांचा निर्दिष्ट लेख हे एक निमित्त आहे; आणि आपल्या लेखाची चर्चा व्हावी अशी इच्छा प्रत्यक्ष आठवल्यांनीच त्यात व्यक्त केल्यामुळं त्याचा निर्देश केला आहे. विनंती एवढीच की त्यांनी (मिलिंदपञ्ह या प्रसिद्ध बौद्ध ग्रंथात नागसेन म्हणतो त्याप्रमाणं) ‘पंडितवाद’ करावा, ‘राजवाद’ करू नये.

आणखी एक गैरसमज दूर करणं आवश्यक आहे. लेखनाचे नियम, लिपी, त्यांतली सुधारणा हे भाषाशास्त्राचे साक्षात् विषय नव्हेत. प्रत्यक्ष उच्चारगत भाषा हा भाषाशास्त्राचा विषय. लेखनांचे नियम ठराव करून, कायदा करून बदलता येतील. भाषेतली रूपं अशा मार्गाने बदलता येणार नाहीत. ‘करलं’ हे रूप ‘केलं’ या रूपापेक्षा योग्य आहे, ते वापरावं असा आदेश ब्रह्मदेवानं दिला तरी तो पाळला जाणार नाही.

इतकं सगळं लिहिल्यावर एक प्रश्न आठवल्यांना विचारल्यावाचून राहवत नाही. तुम्ही जो ‘रसिक’ मासिकात लेख लिहिला आहे, आणि ‘ललित’ मासिकात त्याचं समर्थन केलं आहे, त्यातली सूचना गंभीरपणानं केली आहे. की रूढ लेखननियमांची थट्टा करण्यासाठी ? या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे असा आग्रह नाही. आणि ते दिलं तरी वाचकांनी ग्राह्य मानलं पाहिजे असं वाचकांवर बंधन नाही. लेख प्रसिद्ध झाला की लेखकाचं त्यावरचं नियंत्रण संपलं. त्याचा अर्थ काय हे ठरवणं ही वाचकांच्या अधिकारकक्षेतली गोष्ट आहे.