मासा आणि माशी

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जुलै, १९८४

 

प्रा. मा. ना. आचार्य, चौल (रायगड) यांनी काही शब्द चर्चेसाठी उपस्थित केले आहेत.

ज्या शब्दांच्या अंत्याक्षरात स्/श् येतो असा आकारान्त/इकारान्त शब्दांची सामान्य रूपे कशी लिहावी? उदाहरणार्थ, ‘प्रवासी, मासा, माशी, बशी, उशी, अशी.’

प्रा. आचार्यांनी उपस्थित केलेल्या शब्दांच्या अंत्याक्षरात दंत्य/तालव्य ऊष्म व्यंजनांच्या विकृतीचा प्रश्न गुंतला आहे. हा प्रश्न सामान्य रूपांतच उपस्थित होतो असं नाही, आणि ऊष्म व्यंजनांपुरताच मर्यादित आहे असंही नाही. या विकृतीचा व्याप पुढं दिलेल्या काही उदाहरणांवरून ध्यानात येईल :

०१.    मूस-मुशी (अ.व.), मुशी/त (सा.रू.)
०२.    आरसा – आरशात/त (सा.रू.)
०३.    संन्यासी – संन्याशा/नं (सा.रू.)
०४.    चमचा (दंतमूलीय) – चमचा(च्या)तून (तालव्य) (सा.रू.)
०५.    मोजा ( ,, ) – मोजा(ज्या)/वर (तालव्य), (सा.रू.)
०६.    ओझं ( ,, ) – ओझ्या/नं (तालव्य), (सा.रू.)
०७.    लहानसा (वि.) लहानशा (सा.रू.)
०८.    घास (घा.) – घाशीन (आख्यात), घाशीत (कृदन्त)
०९.    वीस (संख्यावि.) विशी (स्त्री नाम)
१०.    घस-घशीत (वि.), रस-रशीत, विस-विशीत...
११.    लाज (दंतमूलीय) – लाजिरवाणा (तालव्य)

या उदाहरणांवरून असं ध्यानात येतं की ज्या मराठी शब्दांत अंत्याक्षरात दंत्य/दंतमूलीय व्यंजन आहे त्यांच्या पुढं व्याकरण-प्रक्रियेत तालव्य स्वर/व्यंजन (इ, ई, य्) आलं तर दंत्य/दंतमूलीय व्यंजनाचं अनुरूप तालव्य व्यंजनामध्ये रूपांतर होतं. म्हणजे, स्  --> श्, च् (चमचा) --> च् (चहा), ज् (जहाज) --  ज् (जगन्नाथ), झ् (झबलं) --> झ् (झिंगला) या रूपांतरप्रक्रियेत पुढं आलेला य् मागच्याचं रूपांतर करून स्वतः लुप्त होतो. (आरशात, संन्याशानं.) याच न्यायानं वस्तुतः ‘चमचातून, मोजावर, ओझानं’ अशा शब्दांतली रूपांतरं होतात; पण मराठीच्या प्रचलिप लिपीत दंतमूलीय च वर्ग आणि तालव्य च वर्ग यांची चिन्हं वेगळी नसल्यामुळं ‘चमच्यातून, मोज्यावर, ओझ्यानं’ अशी लेखनं रूढ झाली आहेत. वस्तुतः या रूपांत ‘च्या, ज्या, झ्या’ अशी दाखवली जाणारी अक्षरं जोडाक्षरं नाहीत. मराठीनं संस्कृती लिपी घेतली, पण संस्कृतात नसलेल्या मराठी ध्वनींसाठी वेगळी चिन्हं निर्माण केली नाहीत. त्यामुळं असा प्रसंग आला आहे.

पण ‘उशी, बशी’ अशा शब्दांच्या सामान्य रूपांचं काय करणार? या शब्दांच्या अंत्याक्षरांत मूळचंच तालव्य व्यंजन असल्यानं त्यांचं पुन्हा तालव्यात रूपांतर होण्याचा प्रसंग नाही, अशांची सामान्य रूपं (आणि प्रथमा अ.व.) ‘उश्या, बश्या’ (जसं: घोडी-घोड्या) अशी होणार की ‘उशा, बशा’ अशी ?

उच्चारतः रूपं ‘उशा, बशा’ अशी आहेत हे तर मान्य करायला हवं. ‘उश्या, बश्या’ अशा लेखनाचं समर्थन व्युत्पत्तीच्याच आधारानं केलं तर शक्य आहे, पण व्युत्पत्ती हे काही निर्णायक प्रमाण होऊ शकत नाही. ‘संन्यासी’ या वर आलेल्या उदाहरणात व्युत्पत्तीनं सामान्य रूप ‘संन्यासा/नं’ असं व्हायला हवं; पण हा व्याकरणप्रक्रियेतला केवळ मधला टप्पा आहे. अखेरचा टप्पा ‘संन्याशा/नं’ हाच. तसेच ‘उश्या, बश्या’ हे मधले टप्पे; अखेरचे टप्पे ‘उशा, बशा.’ नियम असा मांडता येईल: रूपप्रक्रियेत ‘तालव्य वर्ण+य्’ असा संयोग येत असेल तेव्हा त्यातला य् लुप्त होतो. याच नियमानं ‘आई – आया’ (अ.व.) या रूपांतरात ‘ई - य्’ (‘घोडी - घोड्या’ यातल्याप्रमाणं) हा आधीचा टप्पा.

या पद्धतीनं रूपं लिहिली तर ‘माशां/ना’ हे रूप ‘मासा’ ह्याचं की ‘माशी’ याचं हे कसं कळणार?

हे रूप संदर्भावाचून आलं तर पर्यायानं दोन्ही शब्दांचं ठरू शकेल. विशिष्ट संदर्भात आलं तर संदर्भच या प्रश्नाचा निर्णय करू शकेल. यात अडचण काय आहे?

पण मूळ शब्दाची ओळख रूपलेखनात पटण्याची सोय करणं शक्य असताना संदेह का ठेवायचा?

असं संदेहनिवारण किती शब्दांचं करणार? ‘चालू’ हे विशेषण आहे, आख्यातरूप आहे, ऊ-कृदन्तही आहे. या तीन रूपांची वेगवेगळी ओळख त्यांच्या लेखनातून कशी करून देणार? ‘वरात’ ही प्रथमाही आहे, सप्तमीही आहे. ‘पडेल’ हे विशेषणही आहे, आख्यातही आहे. किती शब्दांत सोय करणार? आणि कशी ? ज्याच्या व्याप्तीत फार थोडं येतं आणि पुष्कळ बाहेरच राहतं ते तत्त्व कसलं ?