ROMAN LIPI HAVI

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
ऑगस्ट, १९८४

 

‘ROMAN LIPI HAVI’ (= रोमन लिपी हवी) या शीर्षकाचं एक पत्रक काही वर्षांपूर्वी वाचनात आलं. त्यात भारतीय भाषा लिहिण्यासाठी रोमन लिपीचा पुरस्कार केला होता. सहा महिन्यापूर्वी मुंबईत ROMAN LIPI PARISHAD (रोमन लिपी परिषद) स्थापन झाली. परिषदेचं पहिलं ROMAN LIPI SAMMELAN (रोमन लिपी संमेलन) ९ डिसेंबर १९८४ या दिवशी मुंबईत भरणार आहे. या चळवळीचे प्रवर्तक आहेत मुंबईचे एक इंजिनियर श्री. म.ना. गोगटे, ‘मराठी विज्ञान परिषदे’ची स्थापना करून तिला नावारूपाला आणणारे. एखाद्या योजनेचा चिकाटीने पिच्छा पुरवून ती आकाराला कशी आणावी हे श्री. गोगट्यांकडून शिकावं. त्यांना ‘ताडदेव एअर-कंडिशंड मार्केट, चौथा मजला, खोली ३०, मुंबई ४००० ३४,’ या पत्त्यावर एक पत्र टाकण्याचाच अवकाश, त्यांच्या योजनांचं माहितीपत्रक आठ दिवसांत तुमच्या घरी उपस्थित.

गोगट्यांचं म्हणणं असं की सर्व भारतीय भाषांनी एक वैकल्पिक लिपी म्हणून रोमन लिपीचा स्वीकार करावा. उदाहरणार्थ, मराठी लेखन देवनागरीतही करावं, रोमन लिपीतही करावं. असं कशासाठी करावं ? आजच्या यंत्रयुगात आपण मागं पडू नये यासाठी. भारतात भाषा अनेक, त्यांच्या लिप्याही अनेक, टाइपराइटर्स, कंपोझिंग यंत्रं, टेलेक्स, कंप्यूटर, आपल्याभोवती आज यंत्रंचं यंत्रं आहेत. ही यंत्रं मुळातच रोमन लिपीसाठी घडवली गेली आहेत. त्यांच्यावर भारतीय भाषांच्या परंपरागत लिप्या बसवायच्या म्हणजे कोण खटाटोप ! हा खटाटोप करून या यंत्रांवर दुसर्‍या लिप्या बसवीपर्यंत ही यंत्रं जुनी होऊन सुधारित यंत्रं निर्माण झालेली असतात. हा तिढा आपणच रोमन लिपी स्वीकारली तर सुटेल. रोमन लिपी स्वीकारणं म्हणजे मूळ लिपी टाकणं नव्हे; भाषा टाकणं तर नव्हेच नव्हे. लिप्यंतर म्हणजे भाषांतर नव्हे. ‘पुस्तक’ आणि ‘PUSTAK’ ही लेखनं मात्र वेगळी; शब्द तोच. हे थोडक्यात गोगट्यांचं म्हणणं.

यावरून एक गोष्ट आठवते. एक गोगलगाय बाहेर हिंडून घरी परत येऊन आपल्या मुलीला म्हणाली, ‘बाहेर काय छान वसंत ऋतू बहरला आहे!’ मुलगी वसंत ऋतू पाहायला निघाली. ती बाहेर जाऊन परत आली ती निराश होऊनच. आईला म्हणली, ‘काय सांगतेच आई! बाहेर तर धो पाऊस पडतो आहे!’ आईचा विश्वास बसला नाही. आपल्या डोळ्यांनी वस्तुस्थिती पाहावी म्हणून ती बाहेर निघाली. परत येऊन मुलीला म्हणाली, ‘बाळ, बाहेर वर्षाव होतो आहे खरा; पण तो पावसाचा नाही, हिमाचा.’ अशीच स्थिती यंत्रांच्या क्षेत्रात आपली होते. गोगट्यांचं म्हणणं रास्त आहे. त्यांनी केलेली सूचना विचारणीय आहे. पश्चिमेत यंत्रं घडतात. आपण त्यांच्यावर आपली अक्षरं बसवतो. आपली गरज भागवणारं यंत्रच मुळात निर्माण करणारा प्रज्ञावंत आपल्या देशात जन्माला येत नाही. अशा परिस्थितीत, गोगटे म्हणतात त्याहून दुसरं काय करणं शक्य आहे?

गोगाटे सुचवतात ती एका परीनं तर्कापत्तीही आहे. भारतात इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांना संघटित करायला स्वत्वावर भर द्यायची आवश्यकता होती. इंग्रज इथून गेल्यावर ती राहिलेली नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणं, ‘डॅडी-ममी’ संस्कृती अंगवळणी पाडून घेण्यात भूषण मानणं, पाश्चात्त्य वेषभूषा, पाश्चात्त्य नृत्यसंगीत, बोलण्यात यथाशक्ती इंग्रजी शब्दांचा वापर (‘तिला फेंट आली’ - दूरदर्शन), ‘इंग्रजी’ सही, ‘बर्थ डे केक’, - या सगळ्या गोष्टी ऑक्टोपसप्रमाणं आपलं जीवन व्यापू लागल्या आहेत. असं असताना स्वभाषा, स्वलिपी यांचा आग्रह धरणं कालबाह्यच नव्हे का ? या प्रवाहात खरं तरं सगळ्या भारतीय भाषा गुंडाळून ठेवून इंग्रजीचाच वापर सर्व स्तरांवर करणं हा सर्वांत व्यापक आणि दूरगामी उपाय होईल. मग इंग्रजी पुस्तकं जशीच्या तशी अभ्यासाला नेमता येतील; आणि मग ती वाचून आपल्या कुवतीप्रमाणं भारतीय भाषांत भारतीय लेखकांनी मांडलेलं मोडकंतोडकं ज्ञान वाचण्याची आजची आपत्ती टळेल. मग भारतीय भाषांतली नावं रोमन लिपीत लिहिल्यामुळं विकृत झाल्याची खंतही वाटेनाशी होईल. गुंडेव्हिया (गणदेविया), वैश्नवी (वैष्णवी), मालेगावंकर (माळेगावकर), निराद, (नीरद), रे (राय), सायन (शीव), बाँबे (मुंबई), भिंद्रनवाले (भिंडारांवाले) चंदीगड (चंडीगढ), असे नवे शब्द रूढ होतील. नाही तरी भाषा बदलतच असतात. आणखी थोड्या बदलल्या तर काय बिघडलं?

हे सर्व होईल तेव्हा ‘आपण कोण?’ हाही प्रश्न कालबाह्य होईल.