रमेश देशपांडे ह्यांना उत्तरे*

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
सप्टेंबर, १९८४

 

श्री. रमेश देशपांडे:  सप्रेम नमस्कार.

आपलं ऑगस्ट अंकातलं पत्र.

आपल्या पुस्तकातल्या काही प्रयोगांविषयी आम्ही जी चर्चा (ग म भ न : एप्रिल ८४) केली आहे तिच्याविषयी आपली नापसंती आपल्या पत्रातून व्यक्त झाली आहे. आम्ही माडगूळकरांच्या चुकांकडे कानाडोळा करतो असं आपलं म्हणणं. ते खरं नाही. देशपांडे आणि माडगूळकर -- शास्त्राला दोघेही सारखेच. (श्वा, युवा, मघवा - पाणिनीला सगळेच सारखेच.) यापूर्वीच्या एका अंकात माडगूळकरांच्याही पुस्तकातल्या प्रयोगांची चर्चा आलेली आहे.

आणखी एक सांगतो : देशपांडे काय किंवा आणखी कोणी काय या चर्चेत निमित्तमात्र आहेत. (आपलं पत्रही ह्या लेखनात केलेल्या चर्चेचे निमित्तच.) चर्चेला विषयभूत झालेले प्रयोग अन्यही लोक करत असणार. देशपांड्यांचे प्रयोग वाचनात आले म्हणून घेतले. इतर कशाचं नाही तर देशपांड्यांचे पुस्तक समग्र वाचल्यावर तरी श्रेय आम्हाला द्याल की नाही? (त्याशिवाय पुस्तकातल्या वेगवेगळ्या भागातील पुस्तकांचे प्रयोग बोलाविल्यासारखे एकत्र कसे आले असते?) आणखीही एक सांगतो : आपण केलेले भाषांतर छान आहे, - म्हणजे ते भाषांतर ‘भाषांतर’ वाटत नाही. पण हा विषय पंतोजींच्या नियुक्त क्षेत्रात येणारा नव्हे ; त्यामुळे त्यावर लिहिलं नाही. नाहीतर आम्ही कशाला मूळ उर्दू कादंबरी वाचायला गेलो असतो ? उर्दू यायाल हवं ना ?

आमचा लेख आणि आपलं पत्र यांतून प्रस्तुत मुद्द्यावर एकूण चार पर्याय उपलब्ध होतात:

१. असं म्हणू नकोस
२. असं नकोस म्हणू
३. असं नको म्हणूस
४. असं नकोस म्हणूस

यातला चौथा पर्याय माडगूळकरांचा; तिसरा, आपल्या पुस्तकातला; दुसरा आपल्या शब्दांचा क्रम न फिरविता करता येईला असा आम्ही सुचविलेला पण आपण नापसंत केलेला; पहिला, सर्वसाधारण अनिच्छेनं पसंत केलेला. आपल्या मतानं तिसरा आणि चौथा - दोन्ही प्रयोग सारखेच असमर्थ आहेत. कारण मूळ लेखात मांडलं आहे तेच. एवढं सांगण्यापलिकडे वैयाकरणाला काही अधिकार नसतात. ह्या पंतोजीच्या हातात छडी वगैरे काही नाही. ‘शिक्षा’ कसली करणार? हातात आहेत ते केवळ शब्द. (त्याचाच मार कोणाला बसला तर बसला. पण असे थोडेच.)

आपलं पत्र वाचता वाचता आम्ही आपल्या (म्हणजे स्वतःच्या) नाकाला हात लावून पाहिला; उठून आरशातही तोंड पाहिलं. नाक होतं तसंच आहे; मुरडलेलं नाही नाक मुरडण्याचा हा विषयच नव्हे. मुरडून उपयोगही नाही. भाषेचा संबंध कानाशी असतो; आणि कान तर माणसाला मुरडता येत नाहीत. ‘असं नको म्हणूस’ असा प्रयोग आमच्याही कानांवर आहे. मुद्दा असा आहे की आपल्या पुस्तकातलं एकूण मराठी ज्या स्तरावरचं आहे त्या  स्तरात असा प्रयोग बसत नाही. (जसं, आपल्या पत्रात ज्या स्तरातलं मराठी आहे त्यात ‘कर्कश्य’ – म्हणजे कर्कश बसत नाही.) उदाहरण देतो. मराठीत ‘जन्म’ आहे, ‘जनम’ आहे. ‘जल्म’ ही आहे. ज्याला भाषेचे तत्त्व समजलं आहे असा कोणीही अभ्यासक यांपैकी कोणत्याही रूपावर 'अशुद्ध' असा शिक्का मारणार नाही. मराठी भाषेचे जे विविध स्तर आहेत, त्यांतल्या  एकात एक, दुसर्‍यात  दुसरं तर तिसऱ्यात  तिसरं रूप प्रचारात आहे. स्वतःच्या स्तरात प्रत्येक रूप शुद्धच. स्तर बदलला तर अशुद्ध. उदाहरणार्थ,

१.    या तीन पत्रकारांनी जे वृत्तांत लिहिलेत ते विलक्षण आहेत
२.    के गोपालकृष्णन यांनी म्हटलेय.
३.    अजय बोस ह्यांनी लिहिलेय/म्हटलेय.
४.    इकडे शीख क्रांती होतीय आणि तू ज्यूस पितोयस.
५.    दिल्लीतल्या जेष्ठ पत्रकाराने म्हटलय की

(सर्व वाक्यं : सकाळ/ २१.७.८४:पान ४) या वाक्यांत अन्य रूपं ज्या स्तरातली आहेत त्यात ‘लिहिलेत (लिहिले आहेत), म्हटलेय (म्हटले आहेत),  लिहिलेय (लिहिले आहे), होतीय (होत आहे), पितोयस (पीत आहेस)’ ही रूपं/ हे रूपसंकोच बसत नाहीत. वर्‍हाड-नागपूरकडचे लोक ‘गाणं गाइल्या जातं, गीता म्हटल्या जाते, ग्रंथ वाचल्या जातात’असे प्रयोग करतात. हे प्रयोग ‘गाणं गाईलं जातं, गीता म्हटली जाते, ग्रंथ वाचले जातात’ असे प्रयोग करणार्‍यांनी अशुद्ध ठरवले तर प्रयोग करणारेही दुसर्‍या प्रकारचे प्रयोग अशुद्ध ठरवू शकतील. जे प्रयोग विशिष्ट प्रदेशातल्या सर्वच लोकांच्या बोलण्यात येतात ते त्या प्रेदशातल्या भाषास्तरात शुद्धच समजले पाहिजेत. दुसरी काय कसोटी आहे ? याच तत्त्वाला गुंजीकर ‘भूरिप्रयोग’ म्हणतात. म्हणजेच, आपण म्हणता ती वहिवाट. ‘असं नको म्हणूस’ असा प्रयोग सार्वत्रिक झाला तर त्याचीही उपपत्ती व्याकरणाला सांगावी लागेल. ‘प्रयोगशरणा : वैयाकरणा : ’ नाही तरी गुंजीकरांनी वैयाकरणांना बजावलंच आहे : ‘प्रयोग शुद्घ करू नका; व्याकरणच शुद्ध करा !’ यात सर्व काही आलं.

आपला

पंतोजी