'ही-च' अव्ययं

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
ऑक्टोबर, १९८४

 

पुढील वाक्य पाहा :

१. वारा हा जसा सुगंधात रमून खेळत बसत नाही, तर आपल्या गतीबरोबर सहज येणाराच सुगंध घेऊन पुढे जातो... (टिळकचरित्र, खंड १ : ३६३)

२. श्रीमंतीच्या हाकेला ओ देऊन... मुलीने जन्माचा जोडीदार मुळीच निवडूं नये, तिने फक्त हृदयाच्या हाकेलाच ओ द्यावी. (आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड २ : ८६)

३. रससिद्धीच्या दृष्टीनेही हरिभाऊंची कथानके यशस्वी आहेत. (उक्त, खंड १ : १५७)

४. परंतु, योग्य तेवढे सहकार्य न मिळाल्यामुळे आपल्या उद्देशाला मर्यादित यश आले. (तौलनिक साहित्याभ्यास : ८६)

५. तौलनिक परिशीलनामुळे दुसऱ्या साहित्यांचे गुणधर्म आपण ओळखू लागतो, एवढेच नव्हे तर आपल्या साहित्याचे धर्मही आपण अधिक चांगले ओळखू लागतो. (उक्त २२)

६. सीमाप्रदेश राजकीय कारणांमुळे कुरुक्षेत्रे बनतात;  सांस्कृतिक  कार्यासाठी धर्मक्षेत्रे ठरावयासही हरकत नाही. (उक्त ४४)

७. अशा वेळी परिभाषेचा प्रश्नही सोडवावा लागतो. (उक्त ५१)

उद्धृत वाक्यांपैकी क्र. १, २, ४ यांत ‘च’ या आणि अवशिष्ट वाक्यांत ‘ही’ या अव्ययाचा प्रयोग लक्षणीय आहे. ही अव्ययं वाक्यातल्या कोणत्या शब्दामागून यावी? ‘च’ हे अव्यय व्यावर्तक आहे, ‘ही’ हे समुच्चायक आहे. ‘मीच मोठा’ यात ‘मी’हून जे अन्य त्यांची मोठेपणातून व्यावृत्ती होते; ‘मीही मोठा’ यात ‘मी’हून जे .. मोठे त्यांच्यात ‘मी’ची भर पडते. ‘भिंतीला पांढराच रंग द्या’ यात पांढऱ्याहून अन्य रंगांची व्यावृत्ती होते, ‘पांढराही रंग चालेल’ यांत पांढऱ्याहून जे अन्य रंग त्यांच्या पंक्तीत पांढऱ्याची भर पडते. म्हणजे या दोन्ही अव्ययांच्या प्रयोगात अव्यययुक्त शब्दानं बोधित होणाऱ्या वस्तूचा/ धर्माचा कोणी तरी उक्त/ अनुक्त/ संदर्भप्राप्त प्रतिद्वंद्वी असतो; त्याच्या अपेक्षेनं व्यावृत्ती/ समुच्चय आकार घेतात. अर्थाच ज्यांच्यात प्रतिद्वंद्विता असते अशांपैकी एकाला - म्हणजे त्याच्या वाचक शब्दाला - जोडून ही अव्ययं येतात.

उद्धृत उदाहरणांत असं आहे का? क्र. १ या वाक्यात प्रतिद्वंद्विता 'रमून खेळत बसत नाही' आणि 'पुढे जातो' या अंशांत आहे. त्यामुळं 'च' हे 'पुढे' याला जोडणे योग्य होईल.'... येणारा सुगंध घेऊन पुढेच जातो.' 'आपल्या गतीबरोबर सहज येणारा' हा अंश 'सुगंध' विशेषण आहे, त्याला प्रतिद्वंद्वी असा अंश (समजा, 'सहज न येणारा') पूर्वार्धात नाही. क्र. २ या वाक्यात प्रतिद्वंद्विता 'श्रीमंतीच्या' आणि 'हृदयाच्या' यांमध्ये आहे, त्यामुळे 'हृदयाच्याच हाकेला' असं म्हणणं योग्य.  ('फक्त' गाळला तरी चालेल, कारण 'फक्त' आणि 'च' समानार्थक.) क्र. ४ या वाक्यात 'मर्यादित व यश' अशी रचना योग्य. यात संदर्भप्राप्त प्रतिद्वंद्वी 'अमर्याद' हा आहे. क्र. ३ मध्ये 'रससिद्धीच्याही दृष्टीने' असं म्हणायचं आहे, हरिभाऊंच्या कथानकांच्या यशस्वितेच्या अन्य कारणांत रससिद्धी या कारणाची भर टाकायची आहे. क्र. ५-मधे 'दुसऱ्या' आणि 'आपल्या' यांच्या मध्ये प्रतिद्वंद्विता आहे, म्हणून 'आपल्याही साहित्याचे गुणधर्म' म्हणायला हवं. क्र.६-मधले प्रतिद्वंद्वी उघडच 'कुरुक्षेत्रे' आणि 'धर्मक्षेत्रे' हे आहेत; म्हणून 'धर्मक्षेत्रेही ठरावयास पाहिजेत', क्र. ७ 'परिभाषेचाही प्रश्न', प्रतिद्वंद्वी अन्य गोष्टी संदर्भप्राप्त.

'च' आणि 'ही' हे मराठीतले एकाक्षरी शब्द. (खरं तर उच्चारतः च = च्. यात स्वर नाही; म्हणून हे अक्षर नव्हे.) पण त्या अन्य शब्दांशी सोयरीक जमवण्यापूर्वी पत्रिका पाहणं आवश्यक आहे. इष्ट तितके गण जमले नाहीत तर अनर्थ ! 'सीतेनं रामाच्याच गळ्यात माळ घातली' म्हटलं तर अभिप्राय हा की इतर कोणाच्या गळ्यांत घातली नाही. 'रामाच्या गळ्यातच' म्हटलं तर अभिप्राय निघेल की माळ हातात, पायात घातली नाही. आपणांला काय म्हणायचं आहे ते आपण ठरवायचं. महिमभट्टानं कालिदासाच्याही एका श्लोकात अशा मुद्द्यावर ऑडिट काढलं आहे. फाउलरनं इंग्रजीत मोठ्या प्रमाणावर हाच उद्योग केला आहे. 'पण्डिताः समदर्शिनः'