पुन्हा एकदा रोमन लिपी

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जानेवारी, १९८५

 

ऑगस्ट ८४च्या ‘ललित’च्या अंकात पंतोजींनी ‘ROMAN LIPI HAVI’ या चळवळीविषयी लिहिल्यावर, ऑक्टोबर ८४च्या अंकात श्री मधुकर ना. गोगटे या चळवळीचे प्रवर्तक, यांचं ‘रोमन लिपीबद्दल गौरसमज’ या शीर्षकानं एक पत्र प्रकाशित झालं. त्यानंतर ९ डिसेंबरला मुंबईत भारतीय विद्याभवनात पहिलं ‘रोमन लिपी संमेलन’ झालं. त्याविषयी वृत्तापत्रांत बातमी आलेली अनेकांच्या वाचनात आली असेल. या संमेलनाच्या संदर्भात ‘Pre-conference papers’ या नावानं काही चक्रमुद्रित साहित्य संमेलनाच्या प्रवर्तकांनी प्रसारित केलं होतं. (पुढच्या मजकुरात मधून मधून लेखकांची ‘इति’पूर्वक नावं दिली आहेत ती या साहित्यातून.) तेही काहींच्या वाचनात आलं असावं. या सगळ्याचा आता एकत्रित विचार करता येईल.

भाषा ही मुळात उच्चारात्मक, श्राव्य आहे. तिला दृश्य रूप येतं ते लिपीनं. देवनागरी ही संस्कृताची लिपी. तिचा मराठीनं स्वीकार केला. भारतातल्या अन्य भाषांच्या ज्या लिप्या आहेत त्या कमीअधिक प्रमाणात देवनागरीचीच रूपांतरं आहेत असं अभ्यासक सांगतात. पण ही रूपांतरं मूळ तोंडवळा ओळखू येऊ नये इतकी भिन्न आहेत. त्यामुळं मातृभाषेहून अन्य भारतीय भाषा समजून घेण्यात भारतीय माणसाला मोठी अडचण येते. तेव्हा सर्व भारतीय भाषांना एक लिपी असणं राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं इष्ट आहे.

ही एक लिपी कोणती असावी. ‘देवनागरी’ हे एक उत्तर येईल. सर्व भारतीय भाषांतली उच्चारवैशिष्ट्यं लिहिता यावी अशी काही भर या लिपीत घालून कुणी ‘देवनागरी’ हे एक उत्तर येईल. सर्व भारतीय भाषांतली उच्चारवैशिष्ट्यं लिहिता यावी अशी काही भर या लिपीत घालून कुणी ‘देशनागरी’ सुचवली. देवनागरी ही लिहिण्याला सुलभ आणि यंत्रांना सुकर व्हावी म्हणून सावरकरांपासून विनोबांपर्यंत अनेक विचारवंतांनी तीत सुधारणा सुचवल्या. त्या मर्यादित क्षेत्राबाहेर प्रचारात येऊ शकल्या नाहीत. देवनागरी रूढ रूपात चालू राहिली. अन्य भारतीय भाषा आपापल्याच लिप्यांच्या रुळांवरून धावत राहिल्या. कालांतरानं दक्षिण भारतात देवनागरीला राजकीय भूमिकेवरून विरोधही होऊ लागला. देवनागरी ही सर्व भारतीय भाषांची समांतर वैकल्पिक लिपी होईल ही आशा मावळत चालली.

या देशात इंग्रजी भाषेच्या बरोबर रोमन लिपी आली. दोहोंचा सर्व भारतात प्रसार झाला. आज या भूमीत इंग्रज शासक नाही. पण इंग्रजी आणि रोमन सर्वत्र आहेत. जी भूमिका देवनागरीला वठवता आली नाही ती रोमनला वठवता येईल का ? येईल असं वाटणारे काही लोक भारतात पूर्वी होऊन गेले (उदाहरणार्थ, सुनीतिकुमार चतर्जी, सुभाषचंद्र बोस, चिंतामणराव देशमुख, बलराज साहनी, पिलू मोदी; आजही आहेत (रोमन लिपि परिषद). या चळवळीचा उगम हिंदू मुस्लिम ऐक्याच्या काँग्रेसप्रणीत राजकारणात आहे (इति कुणाल घोष). भारतीय भाषांसाठी रोमन लिपीचा स्वीकार करण्यातला एक लाभ राष्ट्रीय एकात्मता. दुसरा, टाईपरायटरपासून कंप्यूटपर्यंत सर्व यंत्रसंभार काही एक बदल न करता भारतीय भाषांसाठी राबवता येईल. औद्योगिक प्रगती सुकर होईल. आज उद्योगधंद्यातल्या माणसाला दोन दोन टाईपरायटर (एक रोमन, एक देवनागरी) ठेवावे लागतात, ते लागणार नाहीत. एकानं काम भागेल. एकदम टाइपरायटरवरंच लेख ‘लिहिणं’ शक्य होईल. एका जपानी उद्योग-पतीनं जपानी भाषा रोमन लिपीत बसवली, त्यामुळं त्याला जगभर जपानी भाषेत संपर्क ठेवता येतो (इति चिन्मुळगुंद). लिपी बदलली म्हणजे भाषा बदलली असं नाही. युरोपातले अभ्यासक संस्कृत, मराठी यांसारख्या भारतीय भाषा रोमन लिपीत लिहून अभ्यास करतात. कोकणीचं/मराठीचं लेखन रोमन लिपीत करणारे ख्रिस्ती लोक आहेत. ही परंपरा पंधराव्या शतकापासून आहे (उदाहरणार्थ, स्टीफनचं ख्रिस्तपुराण). आपणही तसंच करायचं, असं करताना देवनागरी सोडायची असंही नाही. रोमन ही मराठीची/भारतीय भाषांची वैकल्पिक लिपी म्हणून घ्यायची आहे; गौण, अपरिहार्य पर्याय म्हणून. रोमन लिपीहून देवनागरी ही भाषिक आणि सौंदर्यविषयक अशा दोन्ही दृष्टींनी श्रेष्ट आहे, हे खरं आहे. (इति थॉमस हॉफ मन, व्हिजिटिंग प्रोफेसर, तोयामा युनिव्हर्सिटी, जपान) तरी रोमन लिपी घ्यायला हवी. रोमन अंक (मूळ देवनागरीतलेच) आपण घेतलेच आहेत. आता अक्षरंही घ्यायची. प्रगतीसाठी. काटकसरीसाठी.

‘मराठीसाठी रोमन’ या भूमिकेच्या समर्थकांचं बहुतेक म्हणणं यात आलं. यातला काटकसरीचा मुद्दा खरा आहे. पण काटकसर हे निर्णायक मूल्य आहे का ? इंग्लंड आणि भारत यांचं एकच पार्लमेंट असणं हे काटकसरीचं नाही का ? जेव्हा अधिक महत्त्वाची मूल्यं उपस्थित होतात तेव्हा काटकसर बाजूला ठेवावी लागते. इस्रायलमधे राहणार्‍याला स्थायिक होण्यापूर्वी हिब्रू भाषा शिकणं सक्तीचं आहेत. जपानमधे सर्व शिक्षण-विद्यापीठातलंसुद्धा-जपानी भाषेत होतं; रस्त्यावरच्या पाट्या जपानी लिहीत असतात, इंग्रजी कळणारा माणूस तोक्योसारख्या शहरातही शोधून काढावा लागतो. हे सर्व अर्थशून्यच का ? कोकणी/मराठी भाषा रोमन लिपीत लिहिणारे ख्रिस्ती लोक देवनागरीत लिहिणार्‍या मोठ्या समाजापासून अलग पडतात (इति ऑलिविन्हो गोम्स), हे रोमन लिपीचा राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिफारस करणार्‍यांनी विसरू नये. सुबुद्ध ख्रिस्ती लोक आज आपल्या समाजाची मुख्य समाजाहून झालेली फारकत बुजवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अशा वेळी तर हे विसरून चालणार नाही.

वैयक्तिक काटकसर ज्याची त्यानं ठरवावी. आपल्या धंद्याला ज्या गोष्टी आवश्यक वाटतील त्या धंदेवाल्यानं अवश्य स्वीकाराव्या, त्यांचं प्रशिक्षण (अन्य अनेक प्रशिक्षणविषयांचं देतात त्याप्रमाणं) हाताखालच्या लोकांना द्यावं. धंद्यासाठी रोमन लिपीच काय, इंग्रजी/कोणीतीही भाषासुद्धा राबवायला हरकत नाही. पण त्यांचा भार सर्वांवरती का ? गोगटे ज्यांच्याशी व्यवहार करतात त्यांना चालत असेल तर गोगट्यांनी त्यांना रोमन लिपीत मराठी पत्र लिहावं. पण असं पत्र वाचण्याचा भार ज्याला देवनागरी प्रिय आणि सवयीची आहे त्याच्यावर का ? त्याला जर गोगटे देवनागरीतच लिहिणार असतील तर काटकसरीचं काय ? युरोपातला अभ्यासक संस्कृत, मराठी भाषा रोमन लिपीत लिहितो तो अन्य युरोपीयांची सोय आणि सवय लक्षात घेऊन लिहितो. तसं आपण करायचं झालं तर खरं म्हणजे इंग्रजीच देवनागरीत लिहिली पाहिजे. पण गोगटे सोय पाहणार यंत्रांची, माणसांची नाही.

खरं तर यंत्राला सोय, गैरसोय काही नसते. ज्याला जे शिकवावं ते येतं. यंत्राच्या क्षेत्रातले लोक म्हणतातच की कंप्यूटरवर देवनागरी बसवता येईल, (जपानी लोकांनी विकसित केलेल्या कंप्यूटरवर २००० चिन्हं बसवता येतात ! इति हॉफमन.) पण त्यासाठी खर्च पडेल. (इति चिन्मुळगुंद). हा खर्च गोगाटे टाळू पाहतात. पण मराठी लोकांना देवनागरीव्यतिरिक्त रोमन लिपी शिकवण्याचा खर्च किती ? तो करून लाभ काय ? ‘सकाळ,’  ‘महाराष्ट्र टाइम्स,’ ‘केसरी,’ किर्लोस्कर, ‘स्त्री’ इत्यादी वृत्तपत्रं आणि कालिकं कधी रोमन लिपीत निघणार आहेत काय? निघाली तर कुणी वाचणार आहे काय ? कंप्यूटरला देवनागरी शिकवायच्या ऐवजी मराठी माणसाला रोमन शिकवणं हे रेल्वे गाडी स्थिर ठेवून स्टेशनं पळवायची योजना करण्यासारखं म्हणजे अव्यवहार्य आहे. ज्या देशांत टाइपरायटरवर लेख ‘लिहितात,’ त्या देशांत साधा टाइप-रायटर खेळण्याच्या किमतीत मिळतो. आपल्या देशात ही वस्तू घरातल्या कामासाठी बाळगणं ही चैन वाटावी इतकी ती महाग आहेत. तकलुपीही आहे. बाजारात स्पर्धा नाही म्हणूनच ती विकली जाते.

कौतुकाचा भाग हा की युरोपीय माणून देवनागरीऐवजी रोमनमधून संस्कृत, मराठी इत्यादींचा अभ्यास करतो यासाठी जे त्याचं कौतुक करतात तेच मराठी माणसाला रोमन लिपीत मराठी लिही म्हणून सांगतात ! (इति कृष्णन्.) जे आम्हांला भोळ्याभाबड्या समजुती आणि लोकाचार अवैज्ञानिक म्हणून सोडायला सांगतात तेच देवनागरी वैज्ञानिक असूनही अवैज्ञानिक रोमन लिपीची शिफारस करतात ! या दोहोंतली संगती त्यांनाच समजली तर समजेल. कोण एक जपानी उद्योगपती म्हणे रोमन लिपीतली जपानी भाषा जागतिक पातळीवर धंद्यासाठी वापरतो. मराठी उद्योगपती मराठी प्रदेशातसुद्धा इंग्रजीच वापरतो; तो काय केवळ रोमन लिपीमुळं मराठीकडे वळणार आहे ? आणि तेही जागतिक स्तरावर ! रोमन लिपीमुळं मराठी जागतिक स्तरावर येणार असेल तर फारच सोपी गोष्ट ! अवश्य करावी.

रोमन लिपीचा सार्वत्रिक स्वीकार आणि औद्योगिक प्रगती यांचा खरोखर काय संबंध आहे ? वर ज्या दोन देशांचा उल्लेख आला आहे (जपान, इस्त्रायल) त्यांच्या प्रगतीविषयी कुणी शंका घेणार नाही असं वाटतं. जपाननं तर अनेक उद्योगांत जगालाच आव्हान दिलं आहे. यांच्यापैकी कोणत्या देशात रोमन लिपीचा स्थानिक भाषेसाठी सार्वत्रिक प्रचार आहे ? आणि ज्या तुर्कस्ताननं स्वीकार केला त्यानं उद्योगाच्या क्षेत्रात असे काय मोठे दिवे लावले आहेत ? औद्योगिक प्रगती होते, तिच्यासाठी लागणारं कर्तृत्व उदयाला येतं ते वेगळ्याच कारणांनी. त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे राष्ट्रीय अस्मिता. (तेलाचा ठेवा, प्लॅटिनमचा डोंगर अशा गोष्टींनी विनायास येते ती सूज, समृद्धी नव्हे.) गुणांनी वरचढ असलेला आपला वारसा सोडून गुणांनी उणा असलेला दुसर्‍या परंपरेचा वारसा घ्यायचा यानं ही अस्मिता पोसत नाही. रोमन लिपीचा पुरस्कार करणारे चतर्जी म्हणायचे की उर्दू भाषेसाठी लिपी म्हणून अरबीऐवजी देवनागरीचा स्वीकार झाला असता तर कदाचित भारताची फाळणी झाली नसती. (आणि हेही सांगायचे की चीनमध्ये लिपी-जगातली सर्वांत गुंतागुंतीची- एक नसती तर चीनचे तुकडे पडले असते.) हे म्हणणं सयुक्तिक असो नसो, एवढं मात्र खरं की तात्पुरत्या लाभासाठी सोडावी बदलावनी इतकी काही स्वलिपी क्षुल्लक गोष्ट नव्हे.

आज सुशिक्षित माणसाचं मराठी बोलणं इतकं इंग्रजीमिश्रित झालं आहे (म्हणजे ही नवीन ‘उर्दू’च !) की ‘इंग्रज गेला, पण अँग्लो-इंडियन संस्कृती मात्र भारतात भरभराटली आहे’ (‘बुलडोझर’ सिद्धांत !) असं चित्रं दिसतं. साधा साक्षर म्हणून – दारावरचा प्यूनसुद्धा – इंग्रजी/रोमन लिपीत सही करण्यात धन्यता मानतो, मग सुशिक्षिताचं काय सांगावं ! (देवनागरीत सही करणारा एकही इंग्रजी आम्हांला माहीत नाही.) अशा परिस्थितीत प्रचार करायचाच झाला तर तो शुद्ध मराठीचा आणि देवनागरीचाच करायला हवा, रोमनचा नव्हे. देवनागरीची मुळं हजारो वर्षं या भूमीत रुजली आहेत. भावनात्मक एकात्मता साधली तर तिनंच साधेल. हीही एक पुष्कळ मोठ्या प्रमाणात शक्यताच. इतिहास वेगळंही नोंदवून ठेवतो. दुसर्‍या महायुद्धात रोमन लिपी वापरणारी इंग्लंड आणि अमेरिका ही  राष्ट्रं सिरिलिक लिपी वापरणार्‍या जर्मनीविरुद्ध लढली (इति वेलिश). आजचंही चित्र पाहावं : रशिया वेगळा झाला आहे. बाकीची एकत्र आली आहेत.

‘ऑफसेट यंत्रं, रिव्हॉल्व्हिंग थिएटर, दूरदर्शन, फ्लडलाइट, लेसर किरण’ ही सर्व गोगट्यांच्या मतानं इंग्रजी भाषेची आपणाला देणगी आहे. ‘साहित्यविषक काही कल्पना आपण इंग्रजीवरून घेतल्या’ इकडेही ते आपलं लक्ष वेधतात. ते म्हणतात तशी ही इंग्रजीची देणगी आहे असं आपण समजू या. तरी या सगळ्याचा रोमन लिपीत मराठी लिहिण्याशी अर्थाअर्थी काय संबंध आहे ? ‘मराठीला रोमन लिपी नको’ याचा अर्थ इंग्रजी भाषावाङ्मयांचा संपर्क नको असा होतो काय ? आणि यंत्रांचा, सुखसोयींचा इंग्रजीशी तसा काय संबंध आहे? यांचं उत्पादन किंवा वापर – कशाचाच इंग्रजीच्या ज्ञानाशी संबंध नाही. उत्पादनाला तंत्रज्ञान लागतं, - ते असेल तिथून घ्यावं लागतं, प्रत्यक्ष वस्तूवरूनही मिळवता येतं. तेही भाषाज्ञानावाचून अडत नाही. इंग्रजी न जाणणारा माणूस उत्तम फोटो काढू शकतो, ट्रक छान चालवतो, सुरेख मुद्रण करतो, पॅटन रणगाड्याचा नमुना दिला तर तसा रणगाडा बनवून देण्याचंही आव्हान स्वीकारतो. गोगट्यांना काय म्हणायचं आहे तेच कळत नाही.

रोमन लिपीत मराठीतले सर्व ध्वनी कसे बसवावे हा विचार रोमन लिपी मराठीसाठी स्वीकारावी अशी भूमिका असेल तर संभवतो. त्यामुळे, अशी ज्यांची भूमिका नाही त्यांनी कोणत्या मराठी ध्वनीसाठी कोणतं रोमन चिन्ह वापरावं इत्यादी गोगट्यांनी चर्चिलेल्या तपशिलात शिरण्याचं कारण नाही.