संयुक्त क्रियापद : एक भानगड

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
फेब्रुवारी, १९८५

 

प्रा. मा. ना. आचार्य, चौल (रायगड) विचारतात (१३ मार्च ८४) :

‘ललित मार्च ८४ अंकामध्ये ग म भ न सदरात “(युधिष्ठिराकडून) द्रौपदी द्यूतात हरली गेली होती” या वाक्याची चर्चा आहे. येथे द्रौपदी हे कर्म असे तुम्ही सांगता. म्हणजे तुम्ही संयुक्त क्रियापद मानता काय ?’

प्रा. आचार्यांनी मराठी व्याकरणातला एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या प्रश्नांचं प्रथम ठोक उत्तर देतो : ‘संयुक्त क्रियापद’ असा प्रकार आम्ही मराठी व्याकरणात मानीत नाही. पण तरी उद्धृत केलेल्या वाक्यात ‘द्रौपदी’ हे कर्म मानण्यात अडचण नाही.

अडचण नाही कशी ? द्रौपदी हे कर्म मानलं तर ‘हरली गेली होती’ या संयुक्त क्रियापदाचंच ते कर्म होणार की नाही ? संयुक्त क्रियापद मानायचं नसलं तर क्रियापद ‘होती’ हे ठरणार, आणि द्रौपदी हा त्याचा कर्ता.

 आमचं म्हणणं, द्रौपदी हे या वाक्यात कर्मही आहे आणि कर्ताही आहे.

असं कसं होईल ? दामले तर लिहितात : ‘कोणत्याही धातूचा जो कर्ता तो कर्ता व कर्म ते कर्म; त्यांत अदलाबदल होऊ शकत नाही.’ (दाम १४०-१६)

असं पाहा : एकच देवदत्त पुत्रही असू शकतो, पिताही असू शकतो. तसंच हे.

पण तो ज्याचा पुत्र त्याचाच पिता कसा असेल?

पण आम्ही तरी द्रौपद्री हे ज्या धातूचं कर्म त्याच धातूचा कर्ता असं कुठं म्हणतो ? ‘होती’ याचा तो कर्ता; ‘हरली’ याचं ते कर्म.

म्हणजे, ‘हरली’ हे इथं तुम्ही क्रियापद मानता ?

‘द्रौपदी’ हे कर्म असण्याचा ‘हरली’ हे क्रियापद असण्याशी काय संबंध आहे? तुम्ही ज्यांचं वचन उद्धृत केलं ते दामलेही ‘धातूचा कर्ता,’ ‘धातूचें कर्म’ असंच म्हणतात. या परिभाषेप्रमाणं द्रौपदी हा ‘हो’ धातूचा कर्ता. ‘हर’ धातूचं कर्म असं म्हणता येईल.

प्रथम कृपा करून सांगा की ‘द्रौपदी द्यूतात हरली गेली होती’ ही तुमच्या मतानं किती वाक्यं आहेत ?

अर्थात्, एकच. जितकी आख्यातं, क्रियापदं तितकी वाक्यं. 'होती'हे यात एकच आख्यात आहे.

मग ‘हरली गेली’ यांचं तुमच्या मतानं व्याकरण काय आहे ?

 ती ‘द्रौपदी’ या कर्त्याचीं विशेषणं आहेत.

म्हणजे ‘हरली’ हे आपल्याच कर्माचं विशेषण, असंच ना ?

त्यात काय बिघडलं ? ‘हरली’ हे जसं विशेषण आहे तसं धातुसाधितही (कृदन्तही) आहे. आणि धातू म्हटला की कर्ता आला, कर्म आलं. ‘होती’ हेही तसं पाहिलं तर विशेषणचं.

तोबा, तोबा, तोबा ! अहो नुकतंच तुम्ही ‘होती’ हे क्रियापद म्हणून सांगितलं !

म्हणून काय झालं ? आख्यात-प्रत्ययान्त म्हणून ते क्रियापद ‘द्रौपदी’ याच्या लिंगवचनांना अनुसरतं म्हणून ते विशेषण. (जसं, षष्टी कारकाचं कार्य करते, समासात लुप्त होते म्हणून विभक्ती, विशेष्याला लिंगवचनात अनुसरते म्हणून विशेषण.) यात घोटाळा कुठं आहे ? दोन विरोधी धर्म एकाच धर्मीवर एकाच वेळी राहतात म्हटलं तर घोटाळा होईल. पण विशेषणत्व या धर्माचं वैर ना क्रियापदाशी, ना विभक्तित्वाशी.

हे सगळं चक्रावून सोडणारं आहे.

यात चक्रावून जाण्यासारखं कायं आहे ? ‘कालिदासानं नाटक लिहिलं’ या वाक्यात ‘नाटक’ हे कर्म आहे.

‘कालिदासानं लिहिलेलं नाटक लोकप्रिय आहे’ या दुसर्‍या वाक्यात पहिल्या वाक्यातले सर्व घटक मूल दृष्टीनं उपस्थित आहेत; एक क्रिया अधिक आहे. दुसर्‍या वाक्याचा, म्हणजे ‘आहे’ या क्रियापदाचा, कर्ता कोण ? ‘नाटक’. म्हणजे, या वाक्यात ‘नाटक’ हे काय आहे पाहा : ‘लिहिलेलं’ याचं कर्म आणि विशेष्य, आणि ‘आहे’ याचा कर्ता. एकच पद कृदन्तकर्म असणं आणि आख्यातकर्ता असणं यांत विरोध कुठं आला ? ‘ज्याचं कर्म त्याचाच कर्ता’ असं सांगतलं असतं तरच विरोध आला असता. ‘कालिदासानं लिहिलेलं नाटक लोकप्रिय असल्यानं प्रयोगासाठी घ्यावं’ असं वाक्य समोर आलं तर ‘नाटका’वर ‘घ्यावं’ याचं कर्म म्हणून आणखीही एक भूमिका वठवण्याची जबाबदारी पडेल. अशा अनेक भूमिका एकाच पदाला वाक्यात वठवता येतात हे लक्षात आलं नाही म्हणूनच मराठी वैयाकरणांनी आणि त्यांच्या गुरूंनी- इंग्रजी व्याकरणांच्या कर्त्यांनी – संयुक्त क्रियापद ही भानगड निर्माण केली. ‘अन्धेनैव नीयमाना यथान्धाः !’ ही भानगड व्याकरणात इष्टही नाही, आवश्यकही नाही.

[अधिक माहितीसाठी : ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’ नासिक, १९८२ या ग्रंथातला ‘मराठी व्याकरणातील काही वादस्थळं’ हा लेख; पान १५२... ]