'अध्यात्मिक' वादविवाद

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
मार्च, १९८५

 

श्री. राम पटवर्धन, मुंबई यांनी ‘ज्ञानोदय’ मासिकातलं (ऑक्टोबर ८४) एक कातरण उपयोगासाठी पाठवलं आहे.

कातरणात ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ आणि संपादकांचं उत्तर आहे. वाचक श्री. एस्. के. भालेराव यांनी सप्टेंबर ८४ च्या अंकात छापून आलेल्या आपल्या लेखातील ‘अध्यात्मिक’ शब्दाकडं लक्ष वेधलं आहे; आणि तो ‘आध्यात्मिक’ असा वाचवा अशी सूचना करून या आणि यासारख्या अन्य शब्दांची व्याकरणदृष्टीनं चर्चा केली आहे. संपादकांनी उत्तरात ‘आध्यात्मिक’ आणि ‘अध्यात्मिक’ हे दोन्ही शब्द बरोबर असल्याचं आपलं मत नमूद करून काही शब्दकोशांचा हवाला दिला आहे. संपादकांच्या मतानं निर्दिष्ट रूपं ही ‘अपवादात्मक अपवाद’ (?) आहेत. ‘अगतिपासून’ ‘अगतिक’ (‘आगतिकं’ नव्हे), ‘परंपरा’पासून ‘पारंपारिक’ (पारंपरिक नव्हे) हीही रूपं अशीच, - म्हणजे नियमानुसार न घडलेली, अनियमित. ‘आत्मा’पासून ‘आत्मिक’, ‘भावना’-पासून ‘भावनिक’ याही शब्दांत ‘आ-चा आ-च राहतो.’

प्रथम काही गैर समज दूर केले पाहिजेत. ‘अगतिक’ हा समास आहे; नञ् बहुव्रही, ‘नाही गती ज्याला तो.’ म्हणजे, या समासाचे घटक ‘न+गति.’ शेवटी ‘क’ हा प्रत्यय, तद्धित प्रत्यय. तो बहुव्रीहीत ठराविक शब्दांपुढं आवश्यक, तर अन्यत्र वैकल्पिक असतो. (पाहा : अष्टाध्यायी ५.४.१५१, ५.४.१५४.) मराठीत येणारे पुढील शब्द पाहा : विमनस्क, अनर्थक. ‘अगतिक’ हा शब्द संस्कृतात ‘अगति’ असाही येऊ शकतो. तो मराठीत ‘अगतिक’ असा रूढ आहे. एका परीनं ते सोयीचंही आहे : अंती आलेल्या ‘क’ प्रत्ययानं समास बहुव्रीहीच असल्याची खूण पटते.

‘आध्यात्मिक’ शब्दाच्या अंती ‘क’ दिसत असला तरी त्याची आणि ‘अगतिक’ मधल्या क-ची सांगड घालता येणार नाही. खरं तर, ‘आध्यात्मिक’ शब्दात क नाही; इक आहे. ‘अध्यात्म+इक’ हा इक प्रत्यय ‘तत्संबंधी’ अशा अर्थाचा असून तो ज्या शब्दाला जोडला जातो त्या शब्दाच्या आद्याक्षराची ‘वृद्धी’ होते, - म्हणजे आद्याक्षर/आद्याक्षरात अ असेल तर त्याच्या जागी आ येतो. इ/ई यांच्या जागी ऐ, उ/ऊ यांच्या जागी औ. (व्यवसाय-) व्यावसायिक, (शिक्षण-) शैक्षणिक, (उपचार-) औपचारिक ही उदाहरणं. शोधले तर असे पुष्कळ शब्द सापडतील : तात्कालिक, सार्वजनिक, प्रापंचिक, सामुदायिक, आनुषंगिक; ऐतिहासिक, वैचारिक, वैषयिक, लैंगिक; बौद्धिक, मौखिक. या शब्दांची घटना पाहिली तर ‘आध्यात्मिक’ असाच शब्द योजणं युक्त होय. गैरसमजानं किंवा दुर्लक्षामुळं याहून वेगळा शब्द (अध्यात्मिक) वापरला तर तो प्रमादमूलक होय, अपवाद नव्हे. ‘परंपरा’ यावरून घडवला जाणारा ‘पारंपारिक’ असा शब्द प्रमादमूलकच होय; कारण ‘परंपरा’ शब्दाला ‘इक’ जोडताना त्यातल्या आद्याक्षर प-ची वृद्धी होईल, मधल्या प-ची होणार नाही. म्हणून ‘पारंपरिक’ असा शब्द युक्त. यासंबंधात ‘आत्मिक, भावनिक’ अशा शब्दांशी तुलना अप्रस्तुत आहे; कारण प्रकृत मुद्दा आद्याक्षरातल्या अकाराचा आ होणं हा आहे, आणि ‘आत्मा, भावना’ या शब्दांत आद्याक्षरात अ नाही (आत्मिक, भावनिक असे शब्द संस्कृतात सिद्ध होत नाहीत. हे वेगळं.) अशा चर्चेत शब्दकोशांची साक्ष काढू नये; कारण शब्दकोश हे केवळ संग्राहक असतात, निर्णायक नसतात. कोणातरी ज्ञात लेखकानं शब्द वापरला की तो कोशात दाखल  होऊ शकतो. तो बरोबर की चूक याच्याशी कोशकाराला कर्तव्य नसतं. ‘ज्ञानोदया’च्या संपादकांनी आपल्या सुमारे १२५ शब्दांच्या उत्तरात ‘शब्द’ (=श-ब्-द) हा शब्द १० वेळा (म्हणजे, सर्वत्र) ‘शद्ब’ (श-द्-ब) असा दाखल केला आहे. तोही पुढं मागं शब्दकोशांत येणं शक्य आहे.

‘ज्ञानोदया’त उपस्थित झालेल्या शब्दांची माहिती इथं पूर्ण होते, पण मुद्दा संपत नाही. संस्कृताची पुरेशी माहिती असलेले असेही काही लेखक ‘विज्ञानिक, आर्थिक’ असे शब्द योजतात. (‘वैज्ञानिक, आर्थिक’ असे नाही.) असा उपरोधिक हा शब्द मराठीत रूढ आहे. ‘इतिहासिक, परंपरिक, शिक्षणिक, लिंगिक, परमार्थिक, व्यावहारिक’ इत्यादी शब्द या पद्धतीनं घडू शकतील, घडवायला हरकत नाही अशी भूमिका ‘मराठी भाषेचे मूळ’ या ग्रंथाचे लेखक श्री. विश्वनाथ खैरे यांची आहे. ‘ऐतिहासिक’ वापरू म्हणतील त्यांनी तसाही वापरायला हरकरत नाही. म्हणजे, ‘ऐतिहासिक, इतिहासिक’ असे दोन पर्यायी शब्द झाले. ज्याला जो आवडेल त्यानं तो वापरावा.

निर्दिष्ट शब्दांचा प्रयोग अज्ञानमूलक किंवा प्रमादमूलक म्हणता येत नसल्यामुळं त्याला भाषासुधारणेचा प्रयत्न असं नाव देणं आणि नवीन शब्दांची निर्मिती सोपी करणं असा त्याचा उद्देश सांगणं, शक्य आहे. अशा प्रयत्नाच्या यशापयशाविषयी आधी काही भाकित करणं अशक्य आहे. रूढ शब्द डावलून असे नव्या वळणाचे शब्द योजणार्‍याला व्यवहारात काही प्रमाणात धोकाही पतकरावा लागतो. तो पतकरण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी अवश्य नवे प्रयोग करून पाहावे. भाषेचं रूढ वळण मोडताना आपण इतरांना कळेनासे होतो काय याचाही विचार त्यांनी करावा. एका कनेडियन मित्राला आमचा ‘मायथॉलॉजी’ (Mythology) शब्द कळेना. थोड्या वेळानं आमच्या लक्षात आलं की या शब्दाचा कनेडियन उच्चार ‘मिथॉलजी’ (‘थ्’ फ्रिकेटिव्ह यात फ्- ही फ्रिकेटिव्ह) आहे. भाषा रूढिप्रिय असतात आणि अंगवळणी पडलेली रूढी प्रयत्नांनही दूर सारणं कठीण होतं. त्यामुळं ‘विज्ञानिक’ म्हणणारेही ‘वास्तविक, सांस्कृतिक, धार्मिक’ असेसुद्धा (‘वस्तविक, संस्कृतिक, धर्मिक’ नव्हे.), त्यांच्या तत्त्वात न बसणारे शब्द न कळत योजतात. ‘प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति’ दुसरं काय? अशा प्रयत्नांत खर्च होणारी शक्ती आणि त्यांचा संभाव्य लाभ यांनाही एकमेकांशी जोखून पाहणं उपयुक्त ठरेल.