'फक्त' आणि 'च' (आणि 'सुद्धा')

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
एप्रिल, १९८५

 

सौ. मंजिरी पांडे, नांदेड
साभिवादन : तुमचं फेब्रु. ७५ अंकातलं पत्र.

‘गमभन’ बारकाईनं वाचणारे वाचक आहेत हे तुमच्या एकावरून जाणवलं. आनंद वाटला. तुम्ही या विषयावर लिहीत राहा.

तुमचा पहिला मुद्दा : आम्ही दिलेल्या उदाहरणात आम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थाव्यतिरिक्त आणखी एक अर्थ निघण्याची शक्यता आहे. म्हणजेच,

        ‘मी-हून जे अन्य मोठे’
        = १ मी-हून अन्य (जे मोठे), किंवा,
           २ मी-हून मोठे (जे अन्य),

यांपैकी दुसरा, अनभिप्रेत अर्थ टाळावा म्हणून ‘मी-शिवाय’ हा पर्याय तुम्ही सुचवला आहे. सूचना योग्य आहे. ‘शिवाय’ याचा ‘व्यतिरिक्त’ हाही पर्याय चालेल, अधिक बरा. ‘अटीशिवाय देणगी’ (‘अटीसह देणगी’ याच्या उलट) अशा प्रयोगात ‘शिवाय’ आणखी एका अर्थाकडं संकेत करतो. तोही अर्थ चर्चाविषय प्रयोगात अभिप्रेत नाही. शास्त्रीय चर्चेत संदिग्धता नसावी. (संदिग्धतेची चर्चा असेल तर गोष्ट वेगळी.)

दुसरा मुद्दा, तुम्ही म्हणता तसा ‘च’ काही प्रसंगी निर्भरता (intensity) या अभिप्रायानं येतो. क्वचित् दोनदाही येतो. जसं, ‘लगेचच.’ (असंच कुणी ‘मुळीचच’ म्हणेल तर आश्चर्य वाटायला नको.) पण अशाही प्रयोगात व्यावृत्तीचा अभिप्राय दडलेला असतो. ‘खाऊ नको’ याचा तात्पर्यार्थ ‘फार खाऊ नको’ असा घेतला तर ‘थोडंसं खायला हरकत नाही’ असा पर्याय निघतो. त्याची व्यावृत्ती ‘मुळी’ हे (विभक्तिप्रतिरूपक) अव्यय करतं. मराठीचा प्रघात असा आहे की या अव्ययाला जोडून किंवा त्याच्या जवळपास ‘च’ हेही त्याच अर्थाचं अव्यय येतं. (‘तो मुळी बोलायलाच तयार नाही.’) ‘फक्त’ आणि ‘च’ जोडीनं यावे तसा प्रकार. ‘मुळी/ मुळीच’ येतं ते निषेध वाक्यात; ‘सहसा’ प्रमाणं. तुम्ही म्हणता तसं ते विधि वाक्यात येत असल्याचं (जसं, ‘मुळीच खा’) आमच्या ऐकण्यात नाही. विधिवाक्यातला ‘मुळी/ मुळीच’ याचा प्रतिद्वंद्वी ‘अवश्य/ जरूर’. (‘जरूर/ अवश्य खा.’) जसा, ‘सहसा’चा विधिवाक्यातला प्रतिद्वंद्वी ‘बहुतेक/ प्रायः’. (‘मोरोपंत प्रायः संस्कृतप्रचुर लिहितात.’ गंमत अशी की हा प्रतिद्वंद्वी निषेधवाक्यातही येऊ शकतो : ‘असं प्रायः/ सहसा घडत नाही.’)

आता तिसरा. ‘फक्त’ आणि ‘च’ ही दोन्ही जोडीनंही येऊ शकतात. (‘फक्त एकच’), किंवा एकही न येता आघातानं तेच काम होऊ शकतं (‘मी एक आंबा खाल्ला’ इत्यादी), ही तुमची निरीक्षणं यथार्थ आहेत. नुसतं ‘च’ सुद्धा क्वचित् लागोपाठ दुबार येतं (‘लगेचच’) हे वर सांगितलंच आहे. मुद्दा काटकरीचा आहे. एकानं भागतं तिथं दोन कशाला? ‘फक्त हृदयाच्याच’ यात सुधारणा सुचवली ती या अभिप्रायानं. (तुलनार्थ, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधले – ‘आचार्य पोफळे गुरुजी’ – ‘डबल बॅरलची बंदूक’!) हे बारकावे आहेत. काव्यदोषांची चर्चा करताना महिमभट्ट म्हणतो की प्रत्यक्ष विधान न करताही जे संदर्भावरून कळण्यासारखं असतं त्याचं विधान करणं हीही पुनरुक्तीच. हा बारकावा आहे; ‘पुनरुक्ती’ शब्दाचा वाच्यार्थ नव्हे. महिमभट्टाच्या दृष्टीनं पाहता आघातानं ‘फक्त’ आणि ‘च’ दोन्ही गतार्थ आहेत. पण लेखनात आघात अंकित करण्याची मराठीत प्रथा नाही हे एक; आणि ज्याला आपल्या विधानात संदेह नको असतो तो पुनरुक्तीची चिंता करीत नाही हे दुसरं. काही प्रसंग पुनरुक्तीही सप्रयोजन असते. (‘ततः किं ततः किं ततः किं ततः किम्?’ – शंकराचार्यांचं एक स्तोत्र.) अशी प्रयोगविचाराची अनेक अंगं संभवतात. ‘ग म भ न’ मधली चर्चा विषयभूत वाक्यांच्या मर्यादेत केलेली असते. याच कारणानं तुमच्या चौथ्या मुद्द्यातला विषय आमच्या लेखात आलेला नाही. या मुद्द्यासाठी दिलेल्या वाक्यांतला ‘च’ शुद्ध निर्भरताद्योतक म्हणता येईलं. त्यांतही तिसरं वाक्य बाजूला काढावं लागले. (‘एकाच’ या पदानं ‘अनेका’ची व्यावृत्ती होते; आणि या वाक्यात ‘फक्त’ हा पर्याय योजणं शक्य आहे.)

तुमचे मुद्दे संपले. आता ‘बोनस’. (म्हणजे, ‘सुद्धा’!) तुम्ही ज्या काळजीकाट्यानं आपलं टिपण लिहिलं आहे त्याला न साजणार्‍या दोन गोष्टी या टिपणाता आल्या आहेत : ‘(१) फक्त आणि च-च्या (२) साह्याने.’ तुम्हांला म्हणायचं आहे : ‘फक्त आणि च यांच्या साहाय्याने.’ यांपैकी ‘फक्त आणि च यांच्या’ अशा योजनेच्या समर्पकतेची चर्चा ‘ग म भ न’ – मधे मागं एकदा केली आहे. (मार्च ८३.) ‘साह्य’- पेक्षा ‘साहाय्य’ अधिक सयुक्तिक आहे. ‘सहाय(क)’ म्हणजे मदत करणारा. त्यावरून भाववाचक नाम ‘साहाय्य’ असं होतं. (तुलनार्थ : ‘प्राधान्य, सकल   साकल्य, ललित   लालित्य.’) अर्थ मदत. ‘साह्य’ शब्द ‘सह’ या अव्ययावरून साधावा लागेल. अर्थ सहभाव, म्हणजे जोडीनं असणं/ राहणं. मदत हा अर्थ त्यावरून दूरान्वयानंच काढावा लागतो. ‘साहाय्य’ अशा अर्थानं ‘साह्य’ असा शब्द योजलेला संस्कृत वाङूमयात पाहण्यात नाही. मराठीत तो गैर समजानं आला असावा.