'ठोकून दिलें होतें असणार'

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
मे, १९८५

 

एका वाचकानं पुढील वाक्यांतला क्रियापदांकडं आमचं लक्ष वेधलं, आणि विचारलं, ‘ही काय रचना आहे?’

१)    गांवांत नेहमीच्या मारामार्‍या होत्याच असणार. (मातृका ३)
२)    तिला याची कल्पानाही होती नसणार. (१४)
३)    तें मीं आणि इतरांनी उलटसुलट करून ठोकून दिलें होतं असणार. (१६)
४)    अब्बासी खुषींत होता. त्याच्याही परीक्षेंत मी उतरलों होतों असावा. (९८)
५)    तिनें तें (पत्र) वाचलेंहि होतें असणारा. (११६)
६)    रमाकाकीचा ती अंदाज घेत होती असणार. (१२५)
७)    तिला विचारायचं होतं असेल. (१२५)

हे सर्व प्रयोग मराठी उत्तम जाण असलेल्या एका लेखकाचे (पु. शि. रेगे) आहेत. ते प्रथमदर्शनी बुचकळ्यात पाडणारे आहेत हे खरं. पण जरा बारकाईनं वाचल्यावर त्यातला संभाव्य अभिप्राय लक्षात येऊ लागतो. हा अभिप्राय स्पष्ट करण्याचे दोन मार्ग आहेत.

पहिला मार्ग हा की या सर्व प्रयोगांत शेवटच्या पदापूर्वी रेग्यांना काही तरी विराम अभिप्रेत आहे असं मानणं. उदाहरणार्थ, पहिलंच वाक्य विरामचिन्हासह असं लिहिता येईल :

‘गांवांत नेहमीच्या मारामार्‍या होत्याच, - असणार.’

या मांडणीप्रमाणं अर्थ असा होईल की लेखकानं प्रथम ‘होत्याच’ असं निश्चयात्मक विधान केलं, आणि नंतर ते बदलून ‘असणार’ असं संभावनात्मक केलं. म्हणजेच,

पहिलं वाक्य : ‘गांवांत नेहमीच्या मारामार्‍या होत्याच.’
बदलेलं वाक्य : ‘गांवांत नेहमीच्या मारामार्‍या असणार’

या मार्गानं क्र. २ सोडता, अन्य सर्व वाक्यांचा उलगडा होतो.

आता प्रश्न असा की विधान बदलायचं होतं तर मूळ विधान कशाला ठेवलं? बेरीज चुकली असेल तर ती खोडून म्हणजे रद्द करून – आपण दुरुस्त बेरीज देतो; आणि मूळ कागदाची नक्कल करताना खोडलेला आकडा गाळतो. तसं इथं का नाही?

याचं उत्तर : हे ललित लेखन आहे. अशा लेखनात पुष्कळदा लेखक, विचार मनात येतात तसे मांडतो. त्यामुळे दोन्ही क्रियापदं आली. दोन्ही आली तरी त्यांतलं पहिलं खोडल्यासारखं आहे.

दुसरा मार्ग : रेग्यांनी पदांचा स्वाभाविक क्रम फिरवून विधान केलं आहे असं मानायचं. या पक्षी, पहिलं वाक्य पदक्रमात बदल करून असं मांडता येईल :

‘गावात नेमीच्या मारामार्‍या असणार होत्याच.’

असं पदक्रमात परिवर्तन आपण बोलताना पुष्कळदा करीत असतो. ‘जात नाही/ नाही जात, येणार नाही/ नाही येणार. पाहून झालं/ झालं पाहून’ हे प्रयोग पाहावे.

या दुसर्‍या उपपत्तीप्रमाणं क्र. १, २, ३, ५, ६, या वाक्यांचा उलगडा होतो; पण राहिलेल्या दोन वाक्यांत (क्र. ४, ७,) हा युक्तिवाद उपपन्न होत नाही. त्यांचा उलगडा पहिल्याच मार्गानं होणं शक्य आहे.

याचा अर्थ असा होतो की हे दोन्ही मार्ग रेग्यांना अभिप्रेत ‘होते असणार.’ एकच मार्ग अभिप्रेत असता तर सर्व वाक्यांचा उलगडा प्रत्येक मार्गानं झाला असतो. वस्तुस्थिती अशी आहे की काही वाक्य केवळ पहिल्या मार्गानं (४ उतरलों होतों/ उतरलो असावा; ७ विचारायचं होतं/ विचारायचं असेल), काही केवळ दुसर्‍या मार्गानं (२ नसणार होती), तर अवशिष्ट वाक्य (१, ३, ५, ६) दोन्ही मार्गांनी उलगडतात.


विवक्षित आणि सहसा

रेग्यांचा विषय निघालाच आहे तर आणखी काही निर्देश करता येतील.

१)    इंग्रजी आणि गणित हे विषयहि ते शिकवीत. (मातृका १७)
२)    इतक्यांत एक मोठा आवाज होऊन तें दार बंद होतें व तो आंत अडकला जातो. (३९)
३)    तिच्या हातातल्या बांगड्यांची...जी एक विवक्षित किणकिण होई...(२)
४)    तिचें नांव घ्यायचे तो सहसा टाळायचा. (५९)

क्र. १ या वाक्यात ‘हेहि विषय’ असा प्रयोग हवा. (याविषयी चर्चा पाहा : गमभन, ऑक्टो. १९८४.)

क्र.२-मधे ‘अडकतो’ हा प्रयोग योग्य. कारण ‘अडक’ धातू अकर्मक आहे, आणि ‘-ला जातो’ अशी रचना सकर्मक धातूंची होते. (याविषयी चर्चा पाहा : ग म भ न, मार्च १९८४) क्र. ३-मधला ‘विवक्षित’ शब्द पाहा. हा शब्द ‘विशिष्ट’ अशा अभिप्रायानं योजला आहे. ‘विवक्षित’ (संस्कृत ‘वच्’ धातूपासून साधलेल्या इच्छादर्शक ‘विवक्ष’ या साधित धातूचं भूतकृदन्त) म्हणजे जे सांगाचयी/ बोलायची इच्छा आहे ते. जसं : /  विवाक्षित मजकूर/ मुद्दा/ वाक्य. विशिष्ट’ म्हणजे खास./ स्पेसिफिक (Specific, Typical) पुष्कळ लोकांच्या लिहिण्यात/ बोलण्यात या दोन शब्दांच्या अर्थामधल्या फरकाची जाणीव दिसत नाही. क्र. ४-मधे/ सहसा’ हा शब्द प्रायः’ (बहुधा, बहुतेक) अशा अर्थानं योजला आहे. ‘प्रायः’ हा शब्द विधायक किंवा निषेधक अशा कोणत्याही वाक्यात येतो. तर ‘सहसा’ हा शब्द निषेधक अशाच वाक्यात येतो. जसं : ‘तो सहसा वेळेवर येत नाही. तो प्रायः वेळेवर येतो/ येत नाही.’ या दृष्टीनं पुढील वाक्यं पाहा :

१)    विशिष्ट साहित्याभ्यासात अनुस्यूत असलेली तुलना ही सहसा अप्रकट असते. (तौलनिक साहित्याभ्यास १६)

२)    तौलनिक साहित्याभ्यासात या चारांपैकी कोणते तरी एकच अंग सहसा बलवत्तर असते. (२३)

३)    व्यापारउद्यमांमुळे भरभराटीला आलेली शहरे सहसा बहुढंगी झालेली आपण पाहतो. (४४)

४)    मूळ कृतीपेक्षा अनुवात सहसा फिकट असतो. (५०)

या सर्व वाक्यांत ‘सहसा’ या शब्दाच्या जागी ‘प्रायः’ हा शब्द युक्त ठरेल.