शाळा आणि शास्त्र

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जून, १९८५

 

श्री. रामचंद्र सखाराम वर्तक, मुणोतवाडी, पनवेल (रायगड) यांनी आमच्या फेब्रुवारी ८५ च्या अंकातल्या लेखावर 'ऑडिट' काढलं आहे, नवीनही काही विचारलं आहे. आधी नवीन पाहू. त्यांनी उपस्थित केलेली वाक्यं आणि त्यांतले आमच्या मतानं कर्ते याप्रमाणे.

१.    चंपूताईला मुलगी झाली.                         (मुलगी)
२.    ठकीचे लग्न झाले.                                  (लग्न)
३.    मला दूध आवडते.                                 (दूध)
४.    सशाला गोकर्णीची पाने आवडतात.             (पाने)

उद्धृत वाक्यांतले कर्ते निश्चित करण्यात वर्तकांना नक्की अडचण काय आहे याविषयी त्यांच्या पत्रात काही लिहिलेलं नाही. तेव्हा आम्ही ठरवलेल्या कर्त्याविषयी त्यांनी (किंवा अन्य कुणी) आक्षेप उपस्थित करीपर्यंत एवढयावरच थांबतो.

आता जुनं. आम्ही 'संयुक्त क्रियापद' मानीत नाही हे उक्त लेखात लिहिलंच आहे. यावर वर्तकांचा प्रश्न असा की 'मग शालेय पाठ्यपुस्तकात ते का स्वीकारले आहे? ते का शिकवले जाते? हा प्रश्न वाचल्यावर आम्हांला आगरकरांची एक आख्यायिका आठवली. आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी, समाजसुधारक त्यांना एका विद्यार्थ्यानं वर्गात प्रश्न विचारला, 'आपण एवढी बुद्धिप्रामाण्याची बाजू घेता. पण आपल्या पत्नी तर रोज जोगेश्वरीला प्रदशिणा घालताना दिसतात.' आगरकरांनी दिलेलं उत्तर प्रसिद्ध आहे. इथं उत्पन्न होणारा मुद्दा हा की आगरकरांवर पत्नीच्या वर्तनाची/ दृष्टिकोनाची जबाबदारी आगरकरांवर टाकणं न्याय्य नाही. शालेय पाठ्य पुस्तकं पंतोजी लिहित किंवा नेमीत नाहीत. पंतोजींना कर्तव्य आहे ते शास्त्राशी. आमचं प्रतिपादन शास्त्राला, तर्काला, अनुभवाला सोडून आहे असं आढळलं तर आम्हांला अवश्य दोषी धरा, पण ते शालेय पाठ्य पुस्तकांना सोडून आहे हा काही अपराध म्हणता येत नाही. आम्ही असं म्हणू शकतो की शालेय पुस्तकात दिलेल्या माहिताचे निकष (जर ते निकष असलेच तर) वेगळे असतात, शास्त्रीय निकष वेगळे असतात. जसं, एखादी घटना इतिहासाच्या पाठ्य-पुस्तकात यावी की नाही याविषयीचे पाठ्यपुस्तकमंडळाचे निकष वेगळे, इतिहासपंडितांचे वेगळे. रूढ तेच सांगायचं असं ठरवलं तर शास्त्राला कामच उरणार नाही. बायबलमध्ये सांगितलेलं चूक आहे हे सांगायला गॅलिलिओ पुढं आला तेव्हा भूगोलशास्त्र पुढं गेलं.

वर्तकांची खरी अडचण आहे, 'आम्हा सामान्य शाळामास्तरांचे काय?' गॅलिलिओला जे समजलं ते शालेय पुस्तकांत यायला किती काळ जावा लागला? तसा काळ येईपर्यंत वर्तकांसारख्या शिक्षकांना शालेय पाठ्य पुस्तकांत लिहिलं असेल तेच शिकवण्यावाचून मार्ग नाही. त्याहून वेगळं काही ते शिकवतील आणि त्यांचे विद्यार्थी उत्तरांत लिहितील तर, कुणी सांगावं, ते नापासही होतील. पण वर्तकांसारख्या चौकस शिक्षकांना एक करता येईल. त्यांनी पोहऱ्यातल्या ज्ञानावर संतुष्ट राहू नये. पाठ्य पुस्तकातलं कायदेशीर ज्ञान देत असतानाही शास्त्र काय आहे, तत्त्व काय आहे हे त्यांनी स्वत:च्या समाधानासाठी समजून घ्यावं आणि कुणी पात्र विद्यार्थी भेटला तर त्यालाही ही दृष्टी द्यावी. कालो ह्ययं निरवधि: विपुला च पृथ्वी। '

संयुक्त क्रियापदाविषयीच्या आमच्या लेखात चर्चा प्रश्नोत्तररूपानं केली आहे. हेतू हा की या विषयाची विविध अंगं पुढं यावीत. असं दिसतं की कदाचित् यामुळंच वर्तकांसारख्या वाचकांचा गोधळ उडाला असावा. त्याचं निराकरण केलं पाहिजे. वाक्यात जे मुख्य क्रियापद असतं त्याला अनुलक्षून वाक्याचा कर्ता, कर्म ठरवण्याची पद्धत आहे. तीत वावगं काही नाही. पण वाक्यात क्रियापद कोणतं हाच जेव्हा वादाचा प्रश्न होतो तेव्हा उत्तरं वेगळी येतात.  'द्रौपदी' द्यूतात हरली गेली होती,'  या वाक्यात संयुक्तक्रियापदवादी म्हणणार 'हरली गेली होती' हे क्रियापद; त्यात 'हर'  धातू मुख्य, सकर्मक, 'द्रौपदी' हे त्याचं (आणि एकूणच क्रियापदाचं) कर्म, कर्ता अध्याह्यत, युधिष्ठिर. तर संयुक्तक्रियापद विरोधक म्हणणार 'होती' हे क्रियापद, अकर्मक. 'द्रौपदी' हा त्याचा कर्ता. 'होती' एवढंच क्रियापद म्हटल्यावर प्रश्न येतो. मग 'हरली गेली' या पदांचं व्याकरण काय आहे?  याचं उत्तर: ही धातुसाधित विशेषणं आहेत. यांचं विशेष्य कोणतं?  'द्रौपदी'. धातूंपासून धातुसाधित विशेषणं होतात आणि विशेषणाला विशेष्य असतं या व्याकरणात सर्वमान्य गोष्टी आहेत.

वाक्यातलं मुख्य क्रियापद द्दष्टीसमोर ठेवून कर्ता, कर्म ही निश्चित कशी करावी हे आतापर्यंत पाहिलं. शाळेतल्या विद्यार्थांना एवढंच शिकवून थांबायला हरकत नाही. यापुढचा माग अधिक खोलात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आहे. कर्ता, कर्म ही असतात ती वस्तुत: क्रियेची, क्रियावाचकाची, म्हणजे धातूची असतात. या दृष्टीनं ज्या ज्या पदात धातू असतो त्या त्या पदाला अनुलक्षून कर्ता, कर्म यांचा विचार करणं शक्य आहे. म्हणूनच 'द्रौपदी' हा 'होती' याचा कर्ता ठरंल्यानंतरही 'द्रौपदी' आणि 'हरली गेली' यांचा संबंध काय हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो; कारण या दोन्ही पदांत धातू आहेत. या प्रश्नांचं उत्तर: 'द्रौपदी' हे 'हर' धातूचं कर्म, 'जा' धातूचा कर्ता. असं ठरल्यामुळं, द्रौपदी 'हा 'हो' धातूचा (होती) कर्ता, या संबंधाला धक्का लागत नाही; कारण जशी माणसाची वेगवेगळ्या माणसांशी वेगवेगळी नाती असू शकतात (देवदत्त हा क-चा पुत्र, ख-चा पिता) तसे एकाच नामाचे वेगवेगळ्या धातूंशी वेगवेगळे संबंध असू शकतात.  'कालिदासानं लिहिलेलं नाटक लोकप्रिय असल्यानं प्रयोगासाठी घ्यावं' या वाक्यात तीन धातू आहेत: 'लिहि' ' अस' आणि 'घे'. ' नाटक ' हे पहिल्याचं आणि तिसऱ्याचं कर्म, दुसऱ्याचा कर्ता. ते 'घ्यावं' या मुख्य क्रियापदाचं कर्म, एवढं शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगता आलं की पुष्कळ झालं. ही 'आणखीही एक भूमिका' असं म्हटलं ते आधीच्या दोन भूमिका लक्षात घेऊन.

सध्या एवढं पुरे.