मराठीचे भाग्यविधाते

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जुलै, १९८५

 

कोणे एके काळी मराठीचे भाग्यविधाते म्हणून ज्ञानेश्वरादी संत कवी, चिपळोणकरादी निबंधकार यांची नावं घेतली जात. यांच्या लेखनाचे संस्कार घेऊन नवे लेखक आपली लेखणी चाल(ळ)वीत. हे संस्कार विचारांचे, शैलीचे तसे लेखनपद्धतीचेही असत. भाषा अनुकरणानं येते. लेखनही पुष्कळशा प्रमाणात अनुकरणानंच येतं. जे आडात ते पोहऱ्यात. जे अनुकार्यात ते अनुकरणात. त्यामुळे जुन्या काळात जे मराठी डोळ्यांपुढं येई त्यात काही किमान शिस्त असे. तिचं श्रेय या जुन्या भाग्यविधात्यांकडे जातं.

आज मराठीचे भाग्यविधाते कोण आहेत? हा आढावा घेण्याचा आज प्रसंग आला आहे. याचं कारण आज मुद्रित रूपानं जे मराठी डोळ्यांपुढं येतं त्यात किमान शिस्त प्राय: आढळत नाही. दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं, वार्षिकं, पुस्तकं या विविध रूपांनी उदंड मराठी वाक्य आज प्रकाशित होतं. त्यातल्या विषयाचा विचार आम्हांला अभिप्रेत नाही. त्यातली शब्दयोजना,

वाक्यरचना, वर्णयोग (स्पेलिंग) या अंगांतली शिस्त आम्हांला अभिप्रेत आहे. अशुद्ध लिहिणारे लोक आज आहेत, तसे जुन्याही काळात असणार. पण जे वाचनात येई ते शुद्ध असे; कारण ते मुद्रित होण्यापूर्वी त्यावर संपादक, मुद्रितशोधक या मध्यस्थ व्यक्तींचा हात फिरे. आज या व्यक्तींचा हात तरी मजकुरावरून फिरत नसावा, किंवा त्यांना त्यांची आपल्या कामाची जितकी माहिती-तयारी असायला हवी तितकी नसावी. 'कंपॉझिटरचा सूड' या नावाचा चिं. वि. जोशांचा विनोदी लेख आहे. मुद्रितशोधकानं आपलं काम केलं तर कंपॉझिटर अर्थाचा अनर्थ कसा करू शकतो ते त्यांनी काल्पनिक प्रसंग उभारून दाखवलं आहे. आज कंपोझिटर आणि मुद्रितशोधक मिळून वाचकाचा सूड उगवू पाहतात की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे.

नवीन फोटो-कंपोझिंग यंत्रांमुळंही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. जुन्या काळात हातजुळणी, मोनो, लायनो अशा कंपोझिंगच्या तीन पद्धती होत्या. यांपैकी पहिल्या दोन पद्धतींत चुकून पडलेला खिळा काढून त्याच्या जागी योग्य तो खिळा घालता येई. लायनो पद्धतीत, चूक एखाद्याच अक्षराची असली तरी संबंध ओळ बदलावी लागे; पण या पद्धतीचे काही फायदेही असत. तिन्ही पद्धतींत जुळवलेल्या मजुकराची प्रुफं साध्या कागदावर न्यूजप्रिंटवर - गरजेजुसार दोन तीन वेळा काढता येत असत. याला फारसा खर्च येत नसे. नवीन फोटो-कंपोझिंग यंत्रावर प्रूफ काढायचं तर फोटोच्या खास कागदावर फोटोच्या खास प्रक्रियेनं काढावं लागतं. हे पुष्कळ खर्चाचं काम आहे. या प्रक्रियेची जागा झिरॉक्स प्रक्रिया घेईल तेव्हा परिस्थिती बदलेल. पण तोपर्यंत प्रुफात काटकसर होत राहणार. नव्या यंत्रात स्क्रीनवर मजकूर पाहून दुरुस्त्या होऊ शकतात; पण प्रूफ वाचून हे काम ज्या बारकाईनं होतं त्या बारकाईनं स्क्रीनवर होत नाही.

याची फळं वाचकांना भोगावी लागतात. पुण्यातल्या एका विख्यात दैनिकाच्या एकाच अंकातली काही उदाहरणं पाहा: ‘ कार्यध्यक्ष अत्यंसंस्कार, संशधक सहाय्यक सशत्र..... हालेंटिअर्स, पावसाच्य सरी, दिडशे, शाब्दीक, संस्थेच्याबाबतीत, यावेळी हल्ल्याच्यावेळी, त्याद्दष्टीने, त्यावेळच्या, मुख्यमंत्री, अठवड्याच्या, श्रद्धाजंली, बैठकीच्यावेळीच, इतिहास संशोधकांची, सुवर्ण मंदिर, मूर्तीविज्ञानसारखे ग्रंथ, परपराविरहित, भूईमूग, सिंधूदुर्ग, क्रिकेटपटुंना, झाडे लाऊन, भित्तीचीत्रे, वाईल्ड लाइफ, पोलि सस्टेशनचे, निर्मितीक्षमता, चतु:श्रृंगी, भिवंडीची भयगात्रा, झोपड पट्ट्यात, तोंड पाटील की, वैशिष्टय पूर्ण, मुक्तकंठा न, सत्कार प्रसंगी, अस्खलीत, संमारंभ, ब्रीजकॅण्टी रुग्णालय, सुधारीत जाती '( सकाळ, ६ जून ८५,) या विविध प्रकारच्या लेखनातल्या चाळीस चुका सहज द्दष्टिक्षेपात आलेल्या आणि सहज कळणाऱ्या आहेत.

वारंवार आलेल्या चुका यात एकवारच नमूद केल्या आहेत. एका स्तंभाच्या लांबीच्या ४० ओळींत, ओळीच्या शेवटी हायफन ऐवजी ७ ठिकाणी 'ल' हे अक्षर पडलं आहे: पुस्तकाल / मध्ये,/ कथाल / संग्रह ' इत्यादी, 'दगड विटा व लाठ्यांनी' (....लाठ्या यांनी), जिल्हे आणि तालुक्यांना,' अध्यक्ष मुबारक आणि इजितच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने, '  'आंबा व काजूची तोडणी, 'माढा, कुर्डुवाडीत' अशा वाक्यरचनेच्या चुका आहेत. असे लेखन सतत वाचनात आलं की समान्य माणूस कळत न कळत तसंच लिहू लागतो. शेवटच्या उदाहरणांतली ' शैली' तर आता नियतकालिकं, पुस्तकं, आकाशवाणी, दूरदर्शन अशा सर्वच माध्यमांतून पसरली आहे. ह्या बेबंदशाहीला एका बाजूनं फोटो -कंपोझिंग यंत्र हातभार लावीत आहेत, तर दुसऱ्या बाजूनं देवनागरी टंकलेखनयंत्र. या दुसऱ्या यंत्रांत मुद्रितशोधनाचा संबंध येत नाही; पण अक्षरांचाच तुटवडा असतो. या क्षेत्रातलं आपल्या तंत्रज्ञांचं कौशल्य रोमन की-बोर्डाच्या जागी देवनागरी की-बोर्ड बसवण्यापलीकडं गलेलं नाही. त्यामुळं देवनागरी जोडाक्षंर टंकित करण्यसाठी लागणारे अवयव यात पूर्णाशानं उपलब्ध होत नाहीत; अन्यही अडचणी आहेत ' व्दंव्द (द्वंद्व), टयूब (ट्यूब), असहय (ह्य), विव्दान (द्वा), बुध्दिनिष्ठ (द्धि) युध्द, नाटयपूर्ण, वेगळया, रुढ 'असले वर्णयोग एक  चालवून तरी घ्यावे  लागतात, नाही तर 'द्‌दंद्‌व, ट्‌यूब, असह्‌य, विद्‌वान, बुद्‌धिनिष्ठ, युद्‌ध, नाट्‌यपूर्ण; वेगळ्या, र‌ूढ' अशी लांब पल्ल्याची, सर्वांनाच अडचणीची शैली स्वीकारावी'  लागते. 'तऱ्हा' शब्दात डॅश (त-हा), ' वाङ्मय'  शब्दात  'ड्' पुढं मध्यबिंदू (वाड्.मय)अशी तडजोड करावी लागते. असा टंकित मजकूर मुद्रणालयात गेला की याच चुका शैली कंपोजमध्येही  उतरतात. म्हणजे 'व्दंव्द' नाही तर 'द्‌वंद्‌वं' आणि  वाटू लागंतं, 'टंकलेखनयंत्र हे आपल्या सोयीसाठी आहे की गैरसोयीसाठी?'

या कटकटीला त्रासून काही लोक मराठीसाठी रोमन लिपीची शिफारस करतात . ही समस्या सोडवायची भारतीय शैली ! जपानी तंत्रज्ञांनी टंकलेखनयंत्राचा आराखडाचं बदलला आणि दोन हजार अक्षराकृती त्यावर बसवल्या. त्यांचं तंत्र आपल्या  तंत्रज्ञांना कळू लागेपर्यंत बहुधा विसावं शतक उलटेल !

 


मृतात्मा

 

श्री. अ. अ. पोतदार, कोल्हापुर यांनी ‘ मृतात्मा ‘ या समासाच्या विग्रहाविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.पष्ठीतत्पुरूष (मृताचा आत्मा) मध्यमपदलोपी (मृत व्यक्तीचा....), कर्मधारय (मृत असा...) या तीन पर्यायांत ग्राह्य कोणता असा त्यांचा प्रश्न.

आमच्या मते पहला पर्याय योग्य. त्यात, दुसऱ्या पर्यायात स्पष्ट केलेला अर्थ गर्मित आहेच. विशेषण हे जेव्हा विशेष्याचा प्रतिनिधी म्हणून येतं तेव्हा त्याला नामाचे धर्म प्राप्त होतात, - म्हणजे विभक्तिप्रत्यय लागतात. समजा, दुकानात दोन साड्या आहेत, एक हिरवी, एक पिवळी. आपण विचारतोः ‘या हिरवीची किंमत काय? आणि ‘पिवळीची? यात ‘ हिरवीची‘ म्हणजे हिरव्या साडीची. तसं ‘मृताचा? म्हणजे मृत माणसाचा (आणखी उदाहरण : सत्संग, वृद्धाश्रम‘) ‘ मृतात्मा ‘  असा समास योजायचा नसेल तर आपण 'मृताचा आत्मा' म्हणू. त्यातलेच घटक शब्द योजून. हेच स्वीकृत विग्रहाचं समर्थन.

पण मग इतर पर्याय असमर्थनीय आहेत काय? होय. 'मध्यमपदलोपी'  (पाणिनींय संज्ञा 'उत्तरपदलोपी' या समासात पहिल्या समासाच्या उत्तर पदाचा लोप होतो) समास केव्हा करावा? अन्य मार्ग उपलब्ध नसेल तेव्हा. जसं, ' हरेकृष्ण पंथ म्हणजे हरे कृष्ण इत्यादी भजन करणार्यांचा पंथ. इथं पष्ठी तत्पुरुष चालणार नाही, कारण या पंथातल्या लोकांचा किंवा या पंथाच्या प्रवर्तकाचं हरेकृष्णा असं नाव रूढ नाही. 'महानुभावपंथ, सूफीपंथ'. या समासाची गोष्ट याहून वेगळी आहे. ते पष्ठीतत्पुरुषच आहेत. 'मृतात्मा' असा शब्द कर्मधारयाच्या अभिप्रायान कुणी वापरील अशी शक्यता नाही. (व्याकरणाची हरकत नाही.) आत्मा मरत नाही. मरत असेल तर त्याच्या सद्गतीची चिंता कोण करील? तेव्हा जे विवक्षितच नाही त्याच्या ग्राह्याग्राह्यतेची चर्चा व्यर्थ आहे.