व्याकरण आणि तर्कशास्त्र

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
ऑगस्ट, १९८५

 


 

डॉ. ना. रा. आपटे, पुणे यांना 'शाळा आणि शास्त्र' (जून ८५) या आमच्या लेखाच्या आरंभीच्या भागात उद्धृत वाक्यांचे जे कर्ते दाखवले आहेत ते पसंत नाहीत. (१. चंपूताईला मुलगी झाली । मुलगी, २. ठकीचे लग्न झाले । लग्न; ३. मला दूध आवडते । दूध; सशाला गोकर्णीची पाने आवडतात । पाने.) त्यांनी नापसंतीचं जे कारण दिलं आहे त्यावरून ही वाक्य श्री. वर्तकांसारख्यांना अडचणीची/ चर्चा करण्याजोगी का वाटतात त्याची कल्पना येते.

आपट्यांच्या मते 'झाली' या क्रियेला प्रत्यक्ष कर्ता असूच शकत नाही... 'पाऊस पडला' यात पाऊस हे पडला क्रियापदाचे कर्मच !.... आवडणे ही एक मानसिक भावना आहे. तेव्हा तिचे कर्तृत्व उघडच त्या मनाचे अधिष्टान असलेल्या व्यक्तीचे. 'दूध' हे कर्मच. तशीच गोकणींची पाने. या वस्तू कोणत्या कारणाने कर्ता होऊ शकतील? 'मी' व 'ससा' हेच कर्ते -- जाणीवपूर्वक (volitional) अथवा सहजगत्या (instinctively).'

आपट्यांच्या या युक्तिवादातलं गृहीत असं आहे की तर्कशास्त्र आणि व्याकरण या दोन्ही शास्त्रांत कर्ता ही संकल्पना समान (म्हणजे तर्कशास्त्रात आहे तीच) आहे. कर्ता म्हणजे करणारा. 'होणं' (झाली यातली क्रिया) हे केलं जात नाही. (तुलनार्थ, 'पाहणं' हे केलं जातं.) जे न करणं शक्य आहे ते करणं. 'होणं' हे तसं नाही. म्हणून त्याला कर्ताच नाही. 'पाऊस पडला' यात पाऊस हा पडला याचा कर्ता नव्हे; कारण पडायचं की नाही हे पाऊस ठरवीत नाही. जिच्या आधी चिकीर्षा (करण्याची इच्छा) नाही ती कृती कसली? आणि तिला कर्ता तरी कसला? 'आवडणं' ही कृती आहे असं म्हणता येईल. पण ती कुणाची? अचेतन दुधाची असणार नाही. जिला दूध आवडतं / आवडत नाही. अशा चेतन व्यक्तीची. आपट्यांच्या युक्तिवादाचा हा अन्वयार्थ.

पण तर्कशास्त्राच्या दृष्टीनं जो कर्ता असतो तोच व्याकरणाच्या दृष्टीनं कर्ता असतो हे खरं नाही. या दोन शास्त्रांच्या, भाषेकडं पाहण्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, आणि ही गोष्ट स्वतः आपट्यांच्याही विधानात त्यांच्या न कळत प्रतिबिंबित झाली आहे. 'झाली' ही क्रिया असं त्यांनी म्हटलं आहे. तर्कशास्त्राच्या दृष्टीनं ही क्रिया ठरणार नाही. व्याकरणाच्या बाहेर कर्म आणि क्रिया एकच. पण आपटे क्रियेच्या कर्माची चर्चा करतात. व्याकरणाच्या दृष्टीनं धातूचा अर्थ ती क्रिया, ज्याला आख्यातप्रत्यय लागतात तो धातू, हे प्रत्यय लागून जे धातूचं रूप सिद्ध होतं ते क्रियापद, आणि हे क्रियापद वर्तमानात (दामल्यांच्या परिभाषेप्रमाणं, 'प्रथम - ताख्याता'त) ज्याला अनुसरतं तो कर्ता - 'बाळू पाण्यात बुडाला' या वाक्यात कर्ता कोण? व्याकरण सांगतं, 'बाळू'. तर्कशास्त्र म्हणेल, हा कर्ता कसा? बुडण्याची क्रिया काही बाळूनं केलेली नाही. त्याची इच्छा तर बुडू नये अशीच होती. 'काट्याच्या अणीवर वसले तीन गाव. 'व्याकरणाच्या दृष्टीनं हे वाक्य शंभर टक्के योग्य आहे. तर्कशास्त्र म्हणेल, हे वाक्यच नव्हे. काट्याची अणी (टोक) ती केवढी? तिच्यावर तीन गाव वसतीलच कसे? 'वाळ झोपला?' तर्कशास्त्रच्या दृष्टीनं झोपणं ही क्रियाच नव्हे, क्रियाविराम आहे. व्याकरणाच्या दृष्टीनं ही क्रियाच. तात्पर्य हे की व्याकरण हे भाषेचा 'भाषा' म्हणून विचार करतं. भाषेचा विचार एक 'यथार्थ ज्ञानाचे साधन' -- प्रमाण -- म्हणून करणाऱ्या तर्कशास्त्राशी त्याचं पटणार नाही. त्यामुळं तर्कशास्त्रीय संकल्पना व्याकरणात आणणं योग्य नव्हे. आम्ही उद्धृत वाक्यांचे जे कर्ते सांगितले ते व्याकरणाच्या द्दष्टीनं सांगितले. आपटे ही वाक्यं तर्कशास्त्राच्या भिंगातून तपासतात.

व्याकरण रूपचिकित्सा करतं; तर्कशास्त्र अर्थचिकित्सा करतं. व्याकरणाला पदान्वय करायचा असतो; तर्कशास्त्राला, अर्थान्वय. मराठी व्याकरणात तर्कशास्त्रीय संकल्पना आल्या त्या इंग्रजी व्याकरणातून. मराठी व्याकरणाचं एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून (केरीच्या व्याकरणापासून) हे जे पाऊल वाकडं पडत आलं ते थेट आजच्या काळापर्यंत. उद्देश्य-विधेयात्मक वाक्यपृथकरण हा विषय वस्तुत: तर्कशास्त्राचा. तो मराठी व्याकरणात घुसला तो इंग्रजी व्याकरणाच्या अनुकरणामुळं. आठ शब्दवर्ग म्हणजे इंग्रजी व्याकरणातले 'पार्टस् ऑफ स्पीच'. संयुक्त क्रियापदं ही भानगड मराठी व्याकरणात आली ती इंग्रजी व्याकरणातून. हिच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट शोधूनच काढावी लागेल. मराठी व्याकरणातलं 'व्याकरण चालवणं/ पदपरिस्फोट' म्हणजे इंग्रजी व्याकरणातलं 'पार्सिंग' (parsing), - समग्र व्याकरणावर अभ्यासासाठी प्रश्न विचारावे अशा स्वरूपाचं. दामल्यांनी आपल्या 'शास्त्रीय' व्याकरणात त्याचा एक स्वतंत्र अध्याय केला आहे !  असं पुष्कळ सांगता येईल. तात्पर्य हे की अनुकरणाचा सोपा मार्ग सोडून शुद्ध शास्त्रीय पद्धतीनं विचार केला पाहिजे.

आपट्यांच्या पत्रात आणखीही काही मुद्दे आहेत. त्यांचा परामर्श पुन्हा केव्हा तरी.


ग म भ न पत्रव्यवहार


अयोग्य प्रयोग

श्री. रमेश देशपांडे, दिल्ली (दि. १७-४-८५) हे लिहितात: 'ललितचा अंक, एप्रिल ८५-चा. त्यातले पान सत्तावीस. अलाणेभाऊंनी फलाणेबापूंना लिहिलेल्या पत्रातील हे वाक्य: "वसंतराव कानेटकरांनी दाखल्यासाठी (म्हणे!) वाघ निवडता कामा नये होता". हा असला उरफाटा प्रयोग करण्याऐवजी मी सरळ " निवडायला नको होता " असं लिहून मोकळा झालो असतो. तुम्ही?"

देशपांड्यानी स्पष्ट लिहिलेलं नाही; पण 'निवडता कामा नये होता' हा प्रयोग त्यांच्या दृष्टीनं चुकीचा असावा. त्याची मीमांसा त्यांच्या पत्रात नाही. उक्त वाक्यात 'वाघ' हा 'होता ' याचा कर्ता हे स्पष्ट आहे. 'निवडता कामा नये' या पदावलीचा 'वाघा'शी संबंध काय हा खरा प्रश्न आहे. दामल्यांच्या परिभाषेत 'नये' आणि 'नको 'ही दोन्ही 'गौण क्रियापदे' आहेत. त्यांचा प्रयोग 'ऊकृदन्ता' सह. 'संयुक्त क्रियापदां'त मात्र त्यांनी नोंदवला आहे. (करू नको, बसू नये.) याखेरीज त्यांनी 'नको असावा, पाहिजे आहे' अशा प्रयोगात 'नको' हे क्रियाविशेषण म्हणून सांगितलं आहे. या प्रयोगात 'पाहिजे' आणि 'नको' ही विशेषणं मानणं अधिक समर्पक (तुलनार्थ :आंबा हवा आहे) होईल. पण हा मुद्दा बाजूला ठेवला तरी लक्षात घ्यायची गोष्ट ही, की 'पाहिजे' आणि 'नको' यांचा विशेषण/ क्रियाविशेषण म्हणून प्रयोग मराठीत आढळात आहे, तसा 'नये' याचा नाही. ('नको आहे' यासारखी 'नये आहे' अशी रचना प्रचारात नाही.) म्हणून '(निवडता कामा) नये होता' हा प्रयोग अयोग्य. '(निवडायला) नको होता' हा योग्य.

पण अलणे-फलणे 'ललित' -- त्यातल्या त्यात 'ग म भ न' वाचतात काय?
 


भाषा प्रयोगसिद्ध असते

श्री. के. शि प्रभुदेसाई, मुंबई यांनी ( २८-५-८५) मे ८५-च्या अंकातल्या 'ग म भ न' मालेतल्या चर्चेवर आक्षेप उपस्थित केला आहे. त्यांच्या मते ''गावात नेहमीच्या मारामाऱ्या होत्याच, असणार' यामध्ये 'होत्याच' या क्रियापदामुळे भूतकाळातील घटना दर्शविली आहे तर 'असणार' यामुळे संभाव्यता किंवा अनिश्चितता दर्शविलीआहे. उलटपक्षी पंतोजींनी सुचविलेल्या पहिल्या पर्यायामध्ये 'अनिश्चितता' आणि दुसऱ्या पर्यायामध्ये 'भूतकाळ' गायब झाले आहेत. म्हणजे एकसमयावच्छेदाने दोन्ही, भूतकाळ व संभाव्यता त्यांच्या पर्यायांनी व्यक्त होत नाहीत. ...... तिसरा पर्यायसुद्धा मूळ वाक्यांतील अर्थ समर्पकपणे व्यक्त करू शकत नाही. कारण, 'होत्याच' हे मुख्य क्रियापद झाल्यामुळे अनिश्चिततावाचक 'असणार' या क्रियापदाला स्वाभाविकच गौणत्व आले,' इत्यादी.

श्री. प्रभुदेसाई, आमच्या निर्दिष्ट लेखाचा उद्देश असा होता, की चर्चेला घेतलेली वाक्यं तुमच्या आमच्या मराठीत रूढ असलेल्या वाक्यरचनेत बसती करता आली तर करावी. (शुद्धीकरणाचा मुळीच हेतू नाही.) हाही खटाटोप केला तो या वाक्यांचे लेखक रेगे आहेत म्हणून. दुसऱ्या शब्दांत, त्यांना संशयाचा फायदा दिला, अशी वाक्यरचना मराठीत प्रचारात आहे की नाही याचा विचार करायचा नसेल तर वाटेल त्या वाक्यरचनेचं समर्थन करता येईल. 'मारामाऱ्या होत्याच असणार' हे जर बरोबर, तर 'रस्त्यात पाणी आहे असणरे/ असेल असणार' ही वाक्यं का बरोबर नसावी? वस्तुस्थिति ही, की असली वाक्यं आपल्या - म्हणजे मराठी बोलणाऱ्या लोकांच्या - बोलण्यात येत नाहीत. भाषा ही प्रयोगसिद्ध असते; आणि खरा वैयाकरण हा प्रयोगशरण असतो. (प्रयोग/ एक्सपेरिमेंट.) व्याकरणाचे नियम तो भाषेचं अवलोकन करून सांगतो, भाषेत असलेलेच सांगतो; आपल्या कल्पनेतून काढून देत नाही. तुम्ही पत्रात मांडलं आहे तसा 'आ प्रायोराय' (a prioris) विचार त्याच्या पद्धतीत बसत नाही.

- पंतोजी