कृ. सा. न. वि. वि., क. लो. अ. हे. वि., थो. न. ल. आ.

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
सप्टेंबर, १९८५

 

आमच्या समोर एक लग्नाची पत्रिका आहे : 'कृ. सा. न. वि. वि. श्रीकृपेकरून आमचे घरी... कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत... . . कळावे, लाभ असावा, ही विनंती.' इत्यादी मजकूर. नेहमीचा.

हा मजकूर, मराठीत केव्हा रूढ झाला? सांगणं कठीण आहे. पण तो पिढ्या न् पिढ्या पत्रव्यवहरात प्रचारात आहे. कधी काळी लिहिणाऱ्याला वाटलं, 'कृतानेक शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष' (पाठभेद : 'विनंती विज्ञापना.') इतकं लांब लचक लिहिणं फारसं उपयोगाचं नाही. त्यात खर्च होणारा वेळ, श्रम यांचं त्यांच्या उपयोगाशी प्रमाण व्यस्त आहे. त्यानं त्याचा संक्षेप करून टाकला.  'कृ. शि. सा. न. वि. वि.' आणखी कुणाला वाटलं, ' साष्टांग ' (सह+अष्ट+अंग) म्हटल्यावर त्यात 'शिर' आलंच. (नमस्कारातली आठ अंगं किती जणांना ठाऊक आहेत? ) त्याचा पुन्हा उल्लेख करायचा तर हातांपायांचा का नको? त्यानं 'शिर' उडवलं. अशी प्रश्नाची सवय लागणं वाईट असतं. कारण प्रश्नांना अंत असत नाही. ती लागल्यावर पुन्हा कुणाला तरी प्रश्न पडला, 'कृतानेक' हे काय आहे? 'कृत' म्हणजे केले, 'अनेक' म्हणजे पुष्कळ (नमस्कार) नमस्कार केले म्हणजे झालं, ते 'केले' असं म्हणाला कशाला हवं? आणि नमस्कार एक काय, अनेक काय, --फलित तेच. शिवाय, अनेक म्हणजे किती? दोन? तीन? शंभर? एक शे आठ? इतके नमस्कार करायला पत्रलेखन हा काय व्यायामाचा प्रकार आहे? या कारणानं 'कृतानेक' गळलं. नमस्कार उपचारासाठी करायचा तर तो साधाही पुरतो. नेहमीच्या गाठीभेटींत साधाच तर नमस्कार असतो. मग पत्रात तेवढा 'साष्टांग' कशाला? यामुळं आठ अंग छाटली गेली. या सगळ्याचा परिणाम संक्षेपावर होत राहिला. कृ. शि. सा. न. वि. वि. --कृ. सा. न. वि. वि. --सा. न. वि. वि. --न. वि. वि. शेवटी कुणाचं तरी लक्ष या 'वि. वि.'-कडं गेलं हा संक्षेप 'विनंती विशेष' याचा आहे हेही बहुधा या वेळेपर्यंत विसरून गेलं असण्याची शक्यता आहे. तसं नसलं तरी प्रश्न पडतच राहिले. काही विशेष असल्याशिवाय कुणी पत्र लिहीत नाही. (याला अपवाद : प्रेमपत्रं !) मग 'विशेष' म्हणण्याचं कारण काय? 'विनंती' ही प्रत्यक्ष विधानातून कळतेच की. (आणि पत्र विनंतीवजा नसेल तर?) शेवटी राहिला फक्त 'न (मस्कार).' पत्राचा आरंभ नकारानं होणं काही वरं नव्हे. त्याला अलीकडं 'सप्रेम' किंवा 'सादर' याची जोड मिळाली. त्यानुसार आजचे संक्षेप 'स. न. /सा. न.' आहेत. हे परिवर्तन होत आलं तरी अधून मधून (विशेषत: लग्नासारख्या समारंभाच्या संदर्भात) जुनं 'कृतानेक' वगैरे भेटतंच. ते लिहिल्याशिवाय पुरेशी नम्रता, अगत्य व्यक्त होत नाहीत अशी भावना असते.

पत्राचा आरंभ कसा करावा याची जशी असते; तशी पत्राचा शेवट कसा करावा याचीही प्रथा असते, अशी जुनी प्रथा होती. 'कळावे, लोभ असावा, हे विनंती.' याचाही संक्षेप झाला: क. लो. अ. हे(.) वि. ('हे' -पुढं पूर्णविराम कशाला? तो काय संक्षेप आहे? हीही प्रथा आजही प्रचारात असलेली अधूनमधून दिसते. पुन्हा प्रश्न पडत गेले. 'लोभ असावा' (यातल्या 'लोभ' या शब्दाचा स्नेह या अर्थी प्रयोग खास मराठी.) यात सूचित होणारा 'सध्या लोभ नाही' हा अभिप्राय काही चिकित्सकांना मानवला नाही. त्यांनी यात सुधारणा केली : 'लोभवृद्धी व्हावी/ लोभ आहेच, त्याची वृद्धी व्हावी.' 'लोभ' शब्दाला जो दुसरा अर्थ आहे ('अतिलोभो न कर्तव्यः') तो काहींना बरा वाटेना. त्यांनी लोभाध्यायच गाळला. काही सुधारकांनी 'हे' जुनं रूप टाकून 'ही' (विनंती) हे अद्यतन रूप लिहायला सुरवात केली. असे काही बदल होत गेले तरी 'कळावे, ही विनंती' (किंवा, नुसतं 'कळावे') ही पत्राच्या समारोपाची प्रथा आजही पुष्कळशा प्रमाणात प्रचारात आहे. अजूनही काही लोक, लग्नसमारंभाचा संदर्भ नसला तरी, 'क. लो. अ. हे. वि.' असा समारोप करतात. इतकंच नाही तर 'थो. न. ल. आ.' म्हणजे 'थोरांना नमस्कार, लहानांना आशार्वाद' अशीही त्यात भर घालतात. पूजा करताना एखादा मंत्र (अर्थ न कळताच / म्हणायचा असतो म्हणून) जसा म्हणावा तसा हा प्रकार. ही सुधारणा चालू असतानाच इंग्रजांच्या प्रथा नवशिक्षितांच्या दृष्टीपुढं येत होत्या. इंग्रजी पत्राच्या आरंभी 'डियर/ माय डियर...' आणि शेवटी 'युवर्स सिन्सियरली/ अफेक्शनेटली/ फेथफुली' असा मजकूर असतो. (या मजकुरापुढं स्वल्पविराम लिहितात. आमच्या मते तसा स्वल्पविराम 'युवर्स' शब्दाच्याही पुढं हवा: 'yours sincerely,' याप्रमाणे,) 'प्रिय/ मत्प्रिय...', हा आरंभाचा मराठी अवतार. ('मत्प्रिय' -- किती बोजड! 'एतद्देशीय'-सारखंच.) उपसंहाराची नक्कल 'आपला विश्वासू' अशी मर्यादित क्षेत्रापुरतीच झाली. अन्यत्र 'तुझा/ तुमचा/ आपला '(+नम्र, ऐच्छिक) एवढं पुरेसं वाटलं. कार्यालयीन इंग्रजीत 'डियर सर' लिहिण्याची प्रथा आहे; त्याचं रूपांतर शासकीय क्षेत्रात हल्ली 'महोदय/ महाशय' एवढंच झालं आहे. (अनोळखी माणसाला 'प्रिय' कसं म्हणावं? आणि ओळखीचं सुद्धा माणूस प्रिय असेलच असं सांगता येत नाही. ) 'प्रिय' गळालं हे ठीक आहे; पण 'कळावे' आणि 'आपला/ ली' हे वहिवाटदार अजून पुष्कळ प्रमाणात आपलं वतन टिकवून आहेत. यांपैकी 'प्रिय' गाळण्याचं जे कारण ते 'आपला/ ली' याही शब्दाला उपपन्न आहे. 'कळावे' हे का टिकून राहावं हे आम्हांला कळत नाही. लिहिलं नाही तर पत्र वाचकाला कळणार नाही (आणि लिहिलं तर कळेलच) असं तर पत्रलेखकांना वाटत नसेल? का याचा अर्थ 'पत्र संपलं' एवढाच घ्यायचा? हा दुसरा अर्थ अभिप्रेत असेल तर तो या शब्दांन जाहीर करण्याचं कारण काय? पुढं काही लिहिलं नाही आणि स्वाक्षरी केली की पत्र संपलं हे वाचकाला कळेलच की ! अशीच दुसरी एक लोकांची सवय म्हणजे भाषणाच्या शेवटी 'एवढं बोलून मी आपलं भाषण पुरे करतो' असं जाहीर करणं. याची काय आवश्यकता? तुम्ही खाली बसला की तुमचं भाषण संपल्याचं श्रोत्यांना कळतंच की! 'असं मला वाटतं/ माझं मत आहे' हे पालुपदासारखं येणारं वाक्य ही अशीच आणखी एक सवय. 'मला/ माझं' यावर भर असेल तरच हे विधान समर्थनीय ठरेल. अन्यथा, तुम्ही जे बोलता ते तुमचं मत आहे हे श्रोते गृहीतच धरतात.

हे केवळ सर्वसाधारण सांगितलं. प्रत्येकाच्या व्यक्तिगत सवयी पाहायच्या झाल्या तर त्यांना अंतच राहणार नाही. त्या ज्याच्या त्यानंच पाहिल्या पाहिजेत. त्यासाठी 'पाहायला' शिकलं पाहिजे.

क. लो. अ. हे. वि. थो. न. ल. आ. इत्यादी. (म्हणजे लेख संपला. )