मराठीचे प्राण वाचवा

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
ऑक्टोबर, १९८५

 

व्याकरणात वर्णांचं वर्गीकरण करताना वैयाकरण व्यंजनाचे 'अल्पप्राण' आणि 'महाप्राण' असे दोन गट करतात. प्रत्येक व्यंजनवर्गातलं दुसरं आणि चौथं व्यंजन (जसं: ख्, घ्, छ्, झ्,....)  श्, ष्, स्, आणि ह् ही महाप्राण व्यंजनं. बाकीची अल्पप्राण. ('शास्त्रीय मराठी व्याकरण' : 'दामले.) 'प्राण' म्हणजे वायू, फप्फुसांतून मुखानाकावाटे बाहेर पडणारा. तो ज्यांच्या उच्चारणांत कमी लागतो ती व्यंजनं अल्पप्राण; ज्यांच्या उच्चारणात अधिक लागतो ती व्यंजन महाप्राण, दामले विसर्गाला व्यंजनांत घालत नाहीत; प्रस्तुत दोन गटांत विसर्ग कुठं बसतो ते त्यांनी सांगितलेले नाही. तथापि, विसर्ग ('पुन:') आणि त्याची दोन रूपांतरं - जिह्वामूलीय ('दु:ख') आणि उपध्मानीय ('मन:पूत') - हे महाप्राणच.

आपल्या दैनंदिन व्यवहारात बहुतेक वस्तू उत्तरोत्तर महाग होत असल्याचा, आणि त्यामुळं पुष्कळ वेळा प्राण कंठाशी आल्याचा अनुभव आपण गेली अनेक वर्ष घेत आलो आहोत. या वस्तूंमधे साखर, तेल, धान्य, भाजीपाला अशा वस्तूंचा नित्य निर्देश होत असतो. त्यांच्या आधारानं निर्देशांक घोषित होत असतात, आणि त्याच्या आधारानं सरकारी/ निमसरकारी चाकारमान्यांच्या महागाईभत्यातले फरक मिळत असतात. काही विचारी लोकांची तक्रार आहे, की सौजन्य, कर्तव्यानिष्ठा, प्रामाणिकपणा अशाही गोष्टी महाग होत चालल्या आहेत; पण त्यांचे निर्देशांक काढले जात नाहीत. फारच थोडे लोक असे आहेत की ज्यांना भाषेत महाग होत चाललेल्या उच्चारदक्षतेची जाणीव आहे. या क्षेत्रातल्या महागाईचा एक बळी म्हणजे मराठीतले महाप्राण वर्ण.

मराठीवर आलेलं हे महाप्राणसंकट कळायला दूर जायला नको. फक्त कान आणि डोळे उघडे ठेवायचे. ज्ञानाचे उदंड स्रोत आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन, व्याख्यानं, संभाषण, वृतपत्रं, मासिक, पुस्तकं -- आजूबाजूला समुद्र पसरला आहे. 'माय फेअर लेडी' मधला प्रोफेसर हिगिन्स खिशात सतत वही-पेन्सिल ठेवायचा; तशी आपणही ठेवावी. वही भरायला फार दिवस लागणार नाहीत. या उदाहरणांचं वर्गीकरण केलं तर पुष्कळ तऱ्हा दिसतील. भाषेचा ऐतिहासिक, अभ्यास करताना 'वर्णागम, वर्णलोप, वर्णविपर्यय' इत्यादी अनेक परिवर्तनशैली भेटतात. तशा याही अभ्यासात भेटतील. उच्चारांत भेटतात त्या मानानं लेखनात कमी शैली भेटतात.

सर्वात व्यापक शैली महाप्राणाऐवजी लगतचा अल्पप्राण उच्चार करणं ही आहे. या उच्चारांना अनुसरून लेखन करावं आणि खुशाल 'मूळ शब्द शोधा'. म्हणून कोडं घालावं! उदाहरणार्थ 'संस्ता, साकर, दूद, बाजीपाला, निष्ट, बारत, बंदुता, मतितार्थ (थि), स्तान, स्तिती, स्तलवर्णन, स्तापत्य, अब्यास, आदार, आबार, मगाशी,' या शैलीतला 'मद्य रेलवे' उच्चार तळीरामालासुद्धा गार करील. एका कुटुंबनियोजनकेंद्रावर माहिती लिहिली होती: 'येथे वंद्यत्वावर उपचार केले जातील.' रामदासांच्या उपदेशावरून ('जनीं वंद्य ते सर्व भावे करावें') 'वंद्यत्व' म्हणून काही चांगली गोष्ट आहे असा आमचा समज होता. त्याचा ही पाटी वाचल्यावर निरास झाला. या शैलीच्या विरूद्ध शैली 'शिष्ठ (ष्ट), वैशिष्ठय (ष्टय) , स्थर (स्त)' या उदाहरणांत आढळेल.

अल्पप्राणाचा महाप्राण आणि महाप्राणाचा अल्पप्राण या वर आलेल्या घटना एकाच शब्दात शेजारी शेजारी आल्या की वेगळीच गंमत दिसते. 'विध्यार्ती, रूधय, संधर्ब, निभंद' ही या प्रकारची काही उदाहरणं. ही दुहेरी वाहतूक झाली. 'उधारण, म्हाराज, न्हाई' या उदाहरणांत एकेरी वाहतूक दिसते, - म्हणजे शेजारचा महाप्राण अलीकडच्या अल्पप्राणात घुसतो. काही वेळा महाप्राण सबंध गडप होतो : 'लोकशाई, हुकूमशाई, नाई, तोई, मीई, साएब, आमी, तुमी' ही काही उदाहरणं. तर काही वेळा एका महाप्राणाऐवजी लगतचा दुसरा महाप्राण येतो: 'यशश्वी, शाशन, भाशा, प्रष्ण, भावनाविश्कार.'

या सर्व घटना भाषाशास्त्राच्या पद्धतीनं अशा मांडत येतील :

(१) अ -> म,

(२) म -> अ,'

(३) अ ~ म,

(४) अ + म = म  +  ०,

(५) म  -> ०,

(६) म -> म.

यांतलं पाचवं सूत्र 'ह' - विषयी, आणि सहावं 'श - ष '-विषयी आहे. अ = अल्पप्राण; म =महाप्राण.

यांतली पहिली तीन सूंत्र लेखनक्षेत्रालाही उपपन्न होणारी आहेत ;(सख्खा (क्खा), मठ्ठा (ट्ठा), विठ्ठल (ट्ठ), कथ्थक (त्थ), लफ्फा (प्फा), (२) वंद्यत्व.(३) बुद्धी, सुध्दा, शुध्दलेखन, सभ्दावना, उपोघ्दात. ' शुद्धलेखन '(खंर तर 'शुद्ध लेखन' ) हे 'शुध्दलेखन' होणं हा तर उच्चा दर्जाचा विनोद आहे. द-च्या जोडाक्षरांत होणारा हा नेहमीचा घोटाळा टाळण्याचा एक मार्ग

म्हणजे 'बालभारती' च्या पुस्तकात दाखवतात तसा पाय मोडलेला द (द्) वेगळा दाखवणं :' बुद्‌‌धी, सुद्‌‌धा, शुद्‌‌ध लेखन, सद्‌‌भावना, उपोद्‌‌घात.'

'सक्खा, विठ्टल लप्फा'हे लेखन वस्तुतः 'बुद्धी, शुद्ध' अशा लेखानाप्रमणांच पूर्ण उच्चारानुसारी आहे. 'ख्ख, ठ्ठ, फ्फ' हे उच्चार अशक्य आहेत; कारण महाप्राण हा महाप्राण ठरतो तो वायू तोडातून पूर्ण बाहेर पडल्यावर ठरतो, आरंभी ठरत नाही.

मराठीभाषकांनो, मराठीचे प्राण वाचवा !


शंकासमाधान

सौ. वृंदा पेंडसे, विलेपार्ले (पूर्व), मुंबई (१४.८.८५) यांनी विचारलेल्या शंका आणि त्यांची उत्तरं:

१.  ' मला पाच रुपये हवेत ' - 'हवेत' यातला धातू कोणता? उत्तर : 'हो' पाहा : दामल्यांचं शास्त्रीय मराठी व्याकरण ३७१. ४. (पृष्ठ ओळ ) संपादक : अर्जुनवाडकर).

२.  'वगैरे, इत्यादी' ही अव्यये अव्ययांच्या कोणत्या गटात येतात? उत्तर : ही अव्ययं नाहीत. त्यांना दामले 'अनिश्चित संख्यावाचक' विशेषणांत घालतात. (शा. म. व्या.:  १३४.२३) विशेष्यवाचक शब्द अध्याहृत असेल तेव्हा यांना विभक्तिप्रत्ययही लागतात : वगैरेंना, इत्यादींनी...'

३. किती छान आहे हे फुलपाखरू !' - ' किती'  या  शब्दाची जात कोणती? उत्तर : प्रश्नार्थक सर्वनाम. (शामव्या:  १०८.२६.) तुलनार्थ - 'काय हें धैर्य!'(१०६.६.)

४. 'का' या प्रश्नार्थक शब्दची जात कोणती? उत्तर : 'तू का आलास?' यात क्रियाविशेषण अव्यय. ' तो आला का (य)?'  यात सर्वनाम. (शामव्या १०६. २४.)

५. शोभिवंत, नाशिवंत. ' की 'शोभावंत, नाशवंत'? उत्तर : 'शोभिवंत, नाशिवंत' हे शब्द प्रयोगसिद्ध आहेत. प्रयोगाविरुद्ध आदेश देणं हे व्याकरणाच्या अधिकारांत येत नाही. 'परस्वाधीन' हा असाच प्रयोगसिद्ध शब्द आहे.

६. 'प्रश्न' की 'प्रष्ण'? उत्तर : 'प्रश्न. 'जोवर सर्व मराठीभाषी लोक 'प्रष्ण' असा उच्चार करीत नाहीत, तोवर तुलनेला अवसर आहे. तुलनेत अविकृत शब्द विकृत शब्दाहून प्रबल ठरतो.

७. 'त्याने फळांचा मनसोक्त आस्वाद घेतला' - 'आस्वाद' हे सामान्य नाम की भाववाचक नाम? उत्तर : भाववाचक नाम. दामले या वर्गाला ' धर्मवाचक' असं नाव देतात. (शामव्या ८१. ५.)