मराठी 'भेळ'

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जानेवारी, १९८६

 

जेव्हा भिन्नभाषी समाज व्यापारव्यवहारासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांना अपरिहार्यपणे दुसऱ्याच्या भाषेतून उचल करावी लागते. ही उचल पद्धतशीर नसते. गरजेपुरते शब्द उचलावे, आपलं म्हणणं दुसऱ्याला समजलं इतकं पाहावं, काम झालं की निरोप घ्यावा, - संपलं. अशी गरजेपुरती उचल करून ती आपल्या भाषेच्या सांगाड्यात बसवून माणसं शेकडो वर्षे व्यवहार करीत आली आहेत. धंदेवाला गुजराती/ मारवाडी/ पारशी माणूस मराठी बोलताना पाहावा, -  मुंबईसारख्या ठिकाणी ही गोष्ट हरघडी पाहायला मिळते, - म्हणजे या घटनेची प्रचीती येईल. आजकाल या महानगरीत विविधभाषी लोक व्यवहारासाठी जी भाषा बोलतात आणि जिला ते हिंदी समजतात, तीही पाहावी. अनेक भाषांच्या भेसळीनं ही जी काही भाषा तयार होते तिला भाषाशास्त्रात 'पिजन लँग्वेज' (Pidgin Language) अशी संज्ञा आहे. सोयीसाठी तिला 'भेळभाषा' म्हणता येईल. मराठीतला 'धेडगुजरी' हा शब्द याच कल्पनेचा वाचक आहे.

मराठी भाषेच्या उगमाची चर्चा करताना या विषयाचे पंडित कोणकोणत्या प्राकृत भाषेतून मराठीतले कोणकोणते वर्ण, प्रत्यय इत्यादी आले आहेत हे समजावून सांगत असतात. वैदिक भाषेतून काय आलं, संस्कृतातून काय, महाराष्ट्री-शौरसेनी-मागधी यांतून काय, अपभ्रंशातून काय, द्राविड भाषांतून काय, -  हे सगळं या पांडित्यातून कळावं अशी अपेक्षा असते; मग वैदिक, संस्कृत, प्राकृत, द्राविड या भाषांचा गंध नसला तरी हरकत नाही. (बहुतेकांना नसतोच.) इतका सगळा खटाटोप केल्यावर यादवकालीन मराठी कशी होती हे कळायचं, पुढं मोगल आले, इंग्रज आले, पोर्तुगेज आले; त्यांच्याही भाषांतून मराठीनं वेळोवेळी उचल (Loan words) केली. ही उचल मुख्यतः तयार शब्दांची होती. जुनी उचल वर्णांची, वर्णविकृतींची, प्रत्ययांचीच होती. खरं तर वर्णप्रत्ययदिकांची 'उचल' नव्हे; ती विकासप्रक्रिया आहे. वर्णप्रत्ययादी सामग्री चुटकीसरशी बदलत नाही. 'उचल' अनायास होऊ शकते. हा फरक थोडा वेळ बाजूसा ठेवला तर एक गोष्ट निर्विवाद आहे की ठायी ठायी असलेली तीळ तीळ सामग्री एकत्र येऊन मराठीची ही 'तिलोत्तमा' घडली आहे. अशा गौरवदृष्टीनं मराठीकडं पाहायचं ज्यांच्यावर बंधन नसतं ते साउथवर्थसारखे लोक याच कारण्यासाठी मराठीला 'भेळभाषा' (पिजिन लँग्वेज) म्हणतात. 'प्राकृत काय चोरापासोनि आली? ' या प्रश्नाला या लोकांचं उत्तर 'होय' असं आहे.

मराठी? आणि भेळभाषा? 'अमृताते पैजा जिंके' अशी मराठी भेळभाषा? ही भाषा 'चोरापासोनि आली काय? मराठी बाण्याचे लोक अस्तन्या वर सारून पवित्र्यात उभे राहतील. हा मराठी बाणा उद्द्योतन सूरीच्या काळापासून (सातवं शतक) प्रसिद्ध आहेः 'अहिमाणकलहसीले य '(अभिमानकलहशीलाः च) आणि 'दिण्णले य गहिल्ले' (दत्ताःच गृहीताः) हेसुद्धा : दोन द्यायचे, दोन घ्यायचे, अशी तयारी. या पद्धतीनं भावनिक मुद्द्याचा निर्णय होणं शक्य आहे; शास्त्रीय मुदद्याचा होणार नाही.

अशा पश्नांना अस्तन्या वर सारून उत्तर देऊ पाहणाऱ्यांना आजूबाजूला बोलण्यात येणारं मराठी, मराठी ही मातृभाषा असलेल्या लोकाचं मराठी, कान देऊन ऐकावं. (आजूबाजूला लोक नसले तर आकाशवाणी, दूरदर्शन आहेतच.) स्वतःचंही ऐकावं. स्वतःच्या कानांवर विश्वास बसणार नाही इतकी इंग्रजी शब्दांची भेसळ ऐकायला मिळेल. असं वाटेल की 'अंग्रेजी हटाओ' चळवळीला अंग्रेजीनं निर्णायक उत्तर दिलं आहेः 'माझ्याशिवाय तुमचं कसं चालतं पाहूच दे! ' आजूबाजूच्या कुत्र्यांच्या भुंकण्याची दखलसुद्धा न घेता, इंग्रजीची हत्तीण तोऱ्यात चालली आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात तिची जी काही मानहानी झाली तिचा जणू सूड उगवत आहे. आम्हांला इंग्रजी शब्द लगेच सुचतात; मराठी सुचत नाहीत. सुचले तरी ते वापरणं अप्रतिष्ठेचं किंवा अवघड वाटतं. ' थँक यू, सॉरी, प्लीज, एक्सक्यूज मी, हॅपी बर्थ डे, मेनी हॅपी रिटर्न्स. काँग्रेच्युलेशन्स, बेस्ट लक, रिझर्व्हेशन, रिटर्न टिकेट, सीझन टिकेट, फॉरेस्ट ऑफिसर, प्यून, क्लार्क, प्रोफेसर, डायरेक्टर,युनिव्हर्सिटी, डिपार्टमेंट, प्रेझेंट, अ‍ॅप्सेंट, पे, टाईम टेबल, ट्रेन, कार, फॅमिली, अ‍ॅडव्हान्स, व्हायव्हा व्होसी, इंटरव्ह्यू' - असले प्रयोग तर इंग्रजी न शिकलेल्याही लोकांच्या बोलण्यात येतात. थोडंबहुत इंग्रजी न शिकलेला माणूस असला तर विचारायलाच नको. त्याला एखादा प्रॉब्लेम इंटरनॅशनल लेव्हरवर डिस्कस कसा करावा याचं करावा याचं उत्तम अंडरस्टँडिंग असतं; पण चान्सच मिळत नाही.  याचा सीरियसली विचार झाला पाहिजे. खरं तर काँपिटंट आणि क्वालिफाईड माणसाला ऑपॉर्च्युनिटी अ‍ॅव्हेलेबल झालीच पाहिजे. झाली नाही तर तो सोशल इंजस्टिस म्हटला पाहिजे. असा इंजस्टिस सोशल अवेअरनेस असलेल्यानं कधीही टॉलरेट करता कामा नये. ...बरं, पिक्चरला येणार? आय मीन, डे आफ्टर टुमॉरो? मॉर्निग शोचं बुकिंग करू की नाईट शोचं? एका इंग्रजीच्या प्राध्यापकांच्या मराठी भाषणातला काही भाग : हे जे ब्यूटिफुल प्रिमायसेस आहेत ते फार कंड्यूसिव्ह टु एज्युकेशन आहेत. मुलं अ‍ॅडमिशन सीक करताना ज्यूनियर कॉलेज अ‍ॅटॅ्चडू टु हायस्कूलपेक्षा ज्यूनियर कॉलेज अटॅच्डू टु सीनियर कॉलेज अशी अ‍ॅडमिशन प्रिफर करतात. एट्सेटरा, एट्सेटरा. अशा भाषेला 'भेळभाषा' म्हणू नये तर काय म्हणावं?

गंमत अशी की, असलं मराठी जे बोलताना त्यांना निखळ इंग्रजीत चार वाक्य बोलता येत नाहीत. (तुरळक सन्मान्य अपवाद.) नामवंत इंग्रज लेखक ई.एम्. फार्स्टर ('पॅसेज टु इंडिया' याचा लेखक) हा म्हणे भारतात रेल्वे प्रवास करीत होता तेव्हाचा प्रसंग. जवळ दोन सुशिक्षित मराठी माणसं आपापसांत मराठी बोलत होती. त्यांचा संवाद त्याला सगळा समजला. (मराठी न शिकता.) थोड्या वेळानं ती दोघं त्याच्याशी इंग्रजीत बोलू लागली, - आणि त्याला एक अक्षरही कळेना. बिचारा! तात्पर्य : इंग्रजाला इंग्रजीहून मराठी अधिक चांगलं कळतं, -'जें इंग्रजीतें पैजा जिंके!'