कंप्यूटरवर मराठी : 'हा सूर्य, हा जयद्रथ !'

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
एप्रिल, १९८६

 

पुढं लिहिलेला मजकूर ओळखतो का?

Aamhi jaato aamuchaa gaavaa
aamucha raamraam ghyaava ......

या कोड्याचं उत्तर पुढच्या एखाद्या पानावर किंवा याच पानावर तळाशी उफराट्या अक्षरांत न देता इथंच दिलेलं बरं. हा  आहे तुकारामांचा अभंग : 'आम्ही जातो आमुच्या गावा...'  इत्यादी. रोमन लिपि परिषदेनं प्रसृत केलेल्या रोमन मराठीच्या नमुन्यातला हा आरंभीचा काही भाग आहे. ही परिषद आणि तिचे प्रवर्तक श्री. म. ना. गोगटे यांच्या या उपक्रमाविषयी आम्ही यापूर्वी लिहिलं आहे. (पाहा : ललित, जानेवारी १९८५, पृष्ठ : ४३) 'म. नां.' चा मुख्य युक्तिवाद हा की आपण आता कंप्यूटरच्या युगात शिरलो आहोत; आणि कंप्यूटरला फक्त रोमन लिपी समजते. कंप्यूटरला देवनागरी समजण्याची आपण वाट पाहत राहू तर मराठी मागं पडेल; आणि कंप्यूटरला देवनागरी शिकवायच्या भरीला पडू तर विनाकारण खर्चात पडू म्हणून मराठी रोमन लिपीत लिहावी. इति.

हा विषय पुन्हा उकरून काढायचं कारण असं की जी भिंत कंप्यूटरभोवती 'मनां'नी उभी केली ती कंप्यूटरच्या उत्पादकांनीच पाडून टाकली आहे. त्यांना काय कल्पना की ही भिंत उभी करायला 'मनां'ना किती श्रम पडले? त्यांनी, म्हणजे उत्पादकांनी, काय केलं, तर एक 'फ्लॉपी डिस्क' तयार केली. तीत देवनागरीतल्या अक्षरांचे संकेत भरले,- अशा रीतीनं की, समजा, ही डिस्क कंप्यूटरमधे (डिस्क ड्राइव्ह) बसवून रोमन की-बोर्डावरची 'P' ही कळ दाबली की या डिस्कमधला 'प' हा संकेत जागवला जाईल. हा संकेत कंप्यूटरच्या प्रिंटर भागाकडं पोचला की कागदावर 'प' हे अक्षर उमटले. ही 'फ्लॉपी डिस्क' न बसवता ही कळ दाबली तर 'P' हे अक्षर उमटेल. 'मनां' ना काळजी ही की मला रोमनसाठी एक यंत्र घ्यावं लागेल आणि देवनागरीसाठी दुसरं. ही त्यांची काळजी अस्थानी आहे. त्यांना कंप्यूटर आणि त्याचे उत्पादक यांच्या शक्तीचा आणि कल्पनेचा, वेगाचा अंदाज आला नसावा. वर जी पद्धत स्पष्ट केली आहे तिचा अवलंब करून दोनच काय दोनशेसुद्धा लिप्या एकाच कंप्यूटरवर बसवता येतील, आणि त्या विदेशी उत्पादक बसवतीलही कारण त्यांना आपली यंत्रं जगात सगळीकडं खपायला हवी आहेत. ते म्हणतात, 'तुमच्या मापाचे कपडे शिवून देऊ.' 'मना' म्हणतात, 'नको; तुमच्याच मापाचे कपडे आम्ही वापरू. जरा सैल किंवा घट्ट होतील इतकंच ना? चालतील आम्हांला. क्रियासिद्धि: सत्त्वे भवति महतां नोपकरणे.' यावर कंप्यूटरचे उत्पादक, त्यांना मराठी येत असेल तर, एवढंच म्हणतील : 'अरे वेड्या मना तळमळसी !'

आम्ही वर माहिती दिली आहे ती केवळ ऐकीव नाही! उक्त फ्लॉपी डिस्क- 'संकेतिका'- आणि ती बसवून मुद्रित केलेला देवनागरी मजकूर एका विदेशातल्या मित्रानं पाठवलेला आम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे. ही संकेतिका जो सामावून घेईल असा संगणक उपलब्ध झाला नाही म्हणून; नाही तर आरंभी दिलेला रोमन कपड्यांतला अभंग आम्ही संगणकाच्या साहाय्यानं देवनागरी कपड्यात बसवलेला' मनां'ना दाखवायला या लेखात छापला असता आणि म्हटलं असतं, 'मान, हा सूर्य आणि हा जयद्रथ ! ''मना' हे मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना हे माहीत असावं की 'संकेतिका' ही दोन तीन आकारांत प्रचारात आहे, - तीन-इंची, सव्वा-पाच-इंची वगैरे; आणि ज्या संगणकात ज्या आकाराची संकेतिका बसवायची सोय केलेली असते त्यात तीच बसते. (जसं, कसेट टेप-रेकॉर्डरवर कसेटच बसते; रील-टू-रील टेप-रेकॉर्डवर रील
टेपच बसते.) आम्ही पाहिलेली संकेतिका तीन-इंची आहे, आणि ती 'मॅकिंटॉश' संगणकासाठी जन्माला आली आहे. या संकेतिकेवर देवनागरी बसवायचा उद्योग शिकॅगोमधे झाला, आणि ती वापरून देवनागरीत संस्कृत मजकूर व्हँकूव्हरमध्ये मुद्रित झाला. या संकेतिकेवरचा रोमन की-बोर्डावरून देवनागरीचा आराखडा आणि तिच्या साहाय्यानं केलेलं संस्कृत मजकुराचं मुद्रणही नमुन्यासाठी या लेखासोबत छापली आहेत.

हे सर्व पाहूनही 'मना' रोमन मराठीचा आग्रह धरणार आहेत का?