काही उत्तरं : (आंबेकर, गोखले, आपटे, गोगटे)

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
जुलै, १९८६

 

श्री. अजय आंबेकर (नांदेड) यांनी वाक्यातल्या शब्दक्रमाकडं लक्ष वेधण्यासाठी काही वाक्यं सुधारून दाखवली आहेत. ती अशी :

१. मूळ : केंद्र सरकार व आंदोलन नेते यांच्यांत गेल्या पाच वर्षांपासून भिजत पडलेल्या आसाम समस्येवर एक करार करण्यात येणार आहे.

सुधारित : गेल्या पाच वर्षांपासून भिजत पडलेल्या आसाम समस्येवर केंद्र सरकार व आंदोलन नेते यांच्यांत एक करार करण्यात येणार आहे.

२. मूळ : दर महिन्याला मान्यवर नेते, साहित्यिक यांच्या भरीव कार्याचा आढावा घेण्याचा विशाखाने सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच वाचकांना वेगळा आनंद देणारा आहे. (राजा राजवाडे/ ललित, ऑगस्ट ८५)

सुधारित : मान्यवर नेते, साहित्यिक यांच्या भरीव कार्याचा दर महिन्याला आढावा घेण्याचा विशाखाने सुरू केलेला हा उपक्रम वाचकांना खरोखरच वेगळा आनंद देणारा आहे.

३. मूळ : 'श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर' या एका अज्ञात लेखकाने लिहिलेल्या व १८९४ साली प्रसिद्ध झालेल्या चरित्रग्रंथाची ओळख करून देणारा श्री. रघुपती भट यांचा लेख विष्णुशास्त्री यांच्याबद्दलची बरीच नवी माहिती पुरविणारा आहे. (उक्त संदर्भ)

सुधारित : एका अज्ञात लेखकाने लिहिलेल्या व १८९४ साली प्रसिद्ध झालेल्या 'श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर' या चरित्रग्रंथाची.....

आंबेकरांचा मुद्दा हा की वाक्यातल्या शब्दांचा क्रम असा असला पाहिजे की ज्यामुळं 'वाचन करताना अर्थ समजावयास सोयीचे जावे.' दुसऱ्या शब्दांत, वाक्यातले शब्द दूरान्वित असू नयेत. त्यांचं म्हणणं योग्य आहे. वाक्यात भर कोणत्या शब्दांवर आहे यामुळं या सामान्य तत्त्वाला क्वचित् मर्यादा पडेल एवढंच. पण एकंदरीनं वाक्यार्थ विनासायास आणि असंदिग्ध रीतीनं कळावा अशी लेखकानं काळजी घेतली पाहिजे; कारण संदिग्धता हा काव्याचा गुण असला तरी इतर वाङ्मयाचा दोष आहे. हेतुपुरःसर संदिग्धता निर्माण केली असली, आणि तिनं अन्य काही फळं मिळत असलं तर गोष्ट वेगळी. पण आंबेकरांनी उद्धृत केलेली उदाहरणं अशी नाहीत. खरं तर चांगलं वाक्य म्हणजे लघुतम निबंध/ ग्रंथ होय आणि चांगला निबंध/ ग्रंथ म्हणजे महत्तम वाक्य होय. म्हणून चांगलं वाक्य लिहिता येणं हा निबंध/ ग्रंथ लिहिण्याचा पाया आहे. या गोष्टीची जाण फारच थोड्यांना असलेली आढळते. त्या थोड्यांपैकी आंबेकर एक आहेत.

आंबेकरांचा आणखी एक मुद्दा 'की' या (उभयान्वयी) अव्ययाच्या संबंधात आहेः स्वल्प विराम या शब्दाच्या मागं की पुढं लिहावा? बोलताना विराम आधी येतो. आमच्या मते शब्दाच्या मागं किंवा पुढं - - कुठंच स्वल्पविरामची आवश्यकता नाही. सामान्यतः विरामचिन्ह वाक्याच्या अंती आवश्यक समजावं; वाक्याच्या मधे अपरिहार्य असेल तर, म्हणजे विरामचिन्ह न योजल्यास अर्थबोधाला अडचण येत असेल तर, योजावं. बोलण्यातल्या थांबण्याशी लिहिण्यातल्या विरामचिन्हांचा संबंध जोडायचा झाला तर विरामचिन्हांची गर्दीच गर्दी होईल आणि वाचनात त्यांचाच अडथळा वाटू लागेल.

 

श्री. वि. वा. गोखले (धारवाड) यांना जिज्ञासा आहे की 'रहाणे/ राहणे/ राहाणे, पहाणे/ पाहणे/ पाहाणे' या पर्यायांत कोणता पर्याय योग्य आहे?

गोखल्यांनी दिलेल्या पर्यायांत पहिले दोन पर्याय (राहतो/ रहातो, पाहतो/ पहातो, वाहतो/ वहातो,) दामल्यांनी मान्य केले आहेत (शास्त्रीय मराठी व्याकरण, सं. अर्जुनवाडकर, पान ३६१.)

मराठी महामंडळाच्या नियमांत केवळ पहिला पर्याय स्वीकारलेला आहे ('राहतो,पाहतो,वाहतो) पण आज्ञार्थात 'राहा/ रहा, पाहा/ पहा, वाहा/ वहा' असा विकल्प दिला आहे. पाणिनीय व्याकरणातलं एक तत्त्व आहे. 'यथोत्तरं मुनीनां प्रामाण्यम्,  'अर्थात् पूर्वोत्तर प्रमाणभूत ग्रंथकारांच्या मतांत विरोध असेल तर पुढच्याचं मत ग्राह्य. तेव्हा महामंडळाची आज्ञा ऐकावी.

 

डॉ. ना. रा. आपटे (पुणे) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

'आली आहे, झाली आहे, केली आहे' यांच्या जागी 'आलीय, झालीय, केलीय' असं लिहिण्याचा प्रघात पडत चालला आहे, - इंग्रजीत सांगायचं झाल्यास, असा प्रघात 'हॅज्कम्टुस्टे' (has come to stay) 'पंतोजींनी, निदान मेजावर तरी, छडी आपटावी ही प्रार्थना !'

आपट्यांनी यात नमूद न केलेला पर्यायी प्रघात 'आलीये (य्ये), झालीये (य्ये) केलीये (य्ये)' असा आहे. या प्रघातांना आपण मराठीतले संधी म्हणू. बोलण्यात संधी प्रत्येकच भाषेत होत असतात. संस्कृतात ते लिहिण्यातही करण्याची प्रथा आहे. अशी प्रथा मराठीत नाही आणि ती नाही हे वाचनसौकर्याच्या द्दष्टीनं इष्टही आहे. तेव्हा सामान्यतः संधिविरहित लेखन करीत असताना विशिष्टच शब्दांचा संधी करणं हे सुसंगत नाही.

दादोबांनी लेखनाचे नियम सांगताना प्रथमच असा नियम घालून दिला आहे की प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दाहून अलग लिहावा. महामंडळाचे पंडित हा नियम सांगायला विसरले.

आमच्या हातात छडीबिडी काही नाही. काय आपटणार? हा तर 'आपट्यां'चा अधिकार!

 

श्री. म. ना. गोगटे (मुंबई) यांनी पत्र लिहून आमच्या 'कंप्यूटरवर मराठीः हा सूर्य, हा जयद्रथ! ' (ललित, एप्रिल ८६) या लेखावर टीकाटिप्पणी केली आहे; आणि 'मराठीसाठी रोमन लिपी' या आपल्या भूमिकेचं पुन्हा समर्थन केलं आहे. ऑक्टोबर ८४-च्या अंकात या विषयावर त्यांचं एक सविस्तर पत्र प्रकाशित झालं आहे, आणि त्यांचं याविषयीचं समग्र वाक्य घेऊन आम्ही एक सविस्तर लेख यापूर्वी लिहिला आहे. (ललित, जानेवारी ८५.) या लेखात ज्याचा परामर्श केलेला नाही असा मुद्दा त्यांच्या या ताज्या पत्रात आम्हांला आढळला नाही. त्यामुळं त्यांचं पत्र किंवा त्यातले मुद्दे आणि आमचं उत्तर असा प्रपंच करणं आता पुनरुक्ती होईल. गोगट्यांच्या कळकळीविषयी आणि मतस्वातंत्र्याविषयी आम्हांला आदर आणि कदर आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा!

- पंतोजी