नारद आणि मराठी लेखक

लेखक: 
पंतोजी
पूर्वप्रसिद्धी: 
ललित
ऑक्टोबर, १९८६

 

नारायणनामाचा गजर करीत, भगवल्लीलांचे पवाड गात गात नारद मुनी त्रिखंडात संचार करीत. साथीला गळ्यात अडकवलेली वीणा. स्वयंभू संगीत. संगीत हे त्यांच्या हिशेबी एक साधन होतं. भक्तीचं साधन. 'कांही आपण तरावया गावें' ही वृत्ती.  'वेडें वाकुडें गाईन  । परी तुझा म्हणवीन ।।' हा बाणा. संगीताचे धडे घेण्याचा प्रश्नच नव्हता. सवाई गंधर्व पुण्यतिथीला त्यांना थोडीच हजेरी लावायची होती? 'नारायण नारायण'

रस्त्याच्या कडेनं कण्हण्याचा आवाज आला. मुनींनी तिकडं दृष्टी वळवली. काही पुरुष, काही स्त्रिया अशी मंडळी एका झाडाखाली विव्हळत पडली होती. मुनींचे पाय तिकडं वळले. अपघात वगैरे काही असेल काय?  पण जवळपास एस. टी. किंवा अन्य काही वाहन दिसत नव्हतं. पडलेल्या लोकांची दशा दयनीय होती. कुणाचा हात तुटला आहे, कुणाचा पाय. कुणाच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तुटलेले नाक, कान, - आणखी पुष्कळ प्रकार. काही तर मृतप्राय. मुनींनी जवळ जाऊन त्यांची विचारपूस केली.

' बाबांनो ! कोण तुम्ही? कुणी तुमची अशी दशा केली? 'मुनींची करुणार्द्र दृष्टी पाहून त्या लोकांना धीर आला. त्यांतला एक माणूस उठून झाडाला पाठ देऊन बसला. सुस्कारे  टाकीत तो म्हणाला :

'साधूमहाराज, आम्ही आहोत राग आणि रागिण्या. तो कुणी नारद म्हणून आहे ना, तो वाटेल तसा बेसूर, बेताल गात असतो. त्यामुळं आमची ही अशी अवस्था झाली आहे. तुम्ही भले दिसता. कुठं तो भेटला तर सांगा : बाबा रे, नीट गा. नाहीतर गाऊ नको !  उपकार होतील. पाया पडतो आम्ही तुझ्या !'

नारदाच्या गाण्यामुळं रागरागिण्यांची झाली तशी अवस्था झालेली मराठी वाक्यं आज जागोजाग भेटतात. वाक्य ही काही काळजीकाट्यानं करायची निर्मिती आहे हे या वाक्यांच्या जनकांना माहीत नसावं. ' वेडें वाकुडें लिहीन । परी लेखकु म्हणवीन ।।'  हा त्यांचा वाणा असावा. त्यांना वाक्यांचा निरोप कोण पोचवणार? म्हणून आम्ही हे काम अंगावर घेतलं. त्यांच्या हातून दुर्दशा झालेली काही वाक्य पाहिली की त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येईल.

१. आम्ही चौघेजण मिळून एका स्वतंत्र फिल्म कंपनीची स्थापना करायचं ठरवलं आहे.' (शांतारामा ८६)

या वाक्यात काय गडबड आहे? पाहू या. 'आम्ही एका  स्वतंत्र फिल्म कंपनीची स्थापना करायचं ठरवलं आहे,' असं वाक्य असतं तर काही अडचण नव्हती. 'आम्ही' हा 'ठरवलं' याचा कर्ता, तृतीया विभक्ती,  - असा सुरळीत संबंध जुळला असता. पण 'चौघेजण' हा शब्द प्रथमेत आहे; तो 'आम्ही' या शब्दाशी समानाधिकरण असल्यामुळं इथं 'आम्ही' ही प्रथमा घेणं भाग आहे. ('मी, आम्ही' ही रूपं संदर्भानुसार प्रथमेची किंवा तृतीयेची ठरतात.) ती प्रथमा घेतली की 'ठरवलं ' हे कर्मणी रूप रुसतं. त्याला कर्त्याची तृतीया हवी असते. 'चौघांजणांनी' असं तृतीयेचं रूप योजलं तर ही अडचण दूर होते. ' मी, आम्ही ' ही रूपं प्रथमेची  की तृतीयेची असा संदेह वाटेल तेव्हा त्यांच्या जागी असा शब्द योजून पाहावा की ज्याची या विभक्तींची  रूपं वेगवेगळी होतात. जसं : 'ते' ही प्रथमा; ' त्यांनी तृतीया या वाक्यात 'ते चौघेजण' पाहिजे की 'त्यांनी त्या चौघांजणांनी? ' अशा तुलनेनं मुद्दा उलगडतो.

२. सर्व हालचालींची सातारा, सोलापूर, कराड, तासगाव, वडूजवरून खबर सातारचा कलेक्टर, पुण्याचा कमिशनरमार्फत मुंबई प्रांताचे  गव्हर्नरकडे जाई.'
(सकाळ ६-७-८६ पान ९.)

हे वाक्य आहे 'मुलखावेगळा राजा' या प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या पुस्तकातलं.

या वाक्यात 'हालचालींची' आणि 'खबर' या विशेषण-विशेष्यांमध्ये विनाकारण फार अंतर पडलं आहे; आणि ते अशा शब्दांमुळं पडलं आहे की ज्यांचा संबंध क्रियाविशेषण या नात्यानं 'जाई' या क्रियापदाशी आहे. तेव्हा पहिली सुधारणा : 'खबर' हा शब्द 'हालचालीची' या विशेषणापाठोपाठ योजावा.

'वरून' या अव्ययाचा संबंध 'सातारा सोलापूर, कराड, तासगाव, वडूज' या सर्वांशी अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात हे अव्यय केवळ 'वडूज' याला जोडलं आहे. सुधारणा: 'सातारा ....... वडूज यांवरून/ या गावांवरून' ('गावांहून' अधिक चांगलं.)

'मार्फत' या अव्ययाची अशीच परिस्थिती आहे. सुधारणा : .... कमिशनर यांच्यामार्फत.'

'प्रांताचे' आर्ष मराठी. 'प्रांताच्या' असं सामान्य रूप आजच्या मराठीशी सुसंगत होईल. अशी आर्ष रूपं आजच्या काळात वकिलांच्या जाहीर नोटिसांत आणि सरकारी वाक्यात येतात. अशी आर्ष रूपं वापरली नाहीत तर ती लिहिणाऱ्यांना दंड होत असावा.

सर्व सुधारणा केल्यावर वाक्य असं होईल:  'सर्व हालचालींची खबर सातारा, वडूज या गावांहून सातारचा कमिशनर यांच्या मार्फत मुंबई प्रांताच्या गव्हर्नरकडे जाई.'

३.  'दरोडेखोरांनी राज यांना बाथरूममध्ये कोंडले व हिलरींच्या पत्नीला चाकू दाखवून...... रुपयांचा ऐवज लुबाडून निघून गेले.' (सकाळ ५.७.८६ पान १)

या उताऱ्यात पहिलं वाक्य भावेप्रयोगात आहे ( 'दरोडेखोरांनी...... कोंडले'); दुसरं ( 'हिलरींच्या..... गेले') कर्तरी आहे. दुसऱ्या वाक्यात कर्तृवाचक पद योजलं असतं तर  'ते' असं आलं असतं. पण ते योजलेलं नसल्यामुळं स्वाभाविकपणे मागच्या वाक्यातलं कर्तृपद ('दरोडेखोरांनी') या दुसऱ्या वाक्यात ओढलं जातं. पण हे कर्तृपद  'गेले' या क्रियापदाबरोबर नांदू शकत नाही. सुधारणा : 'ते' (प्रथमा अ. व. ) असं स्वतंत्र कर्तृपद दुसऱ्या वाक्यात योजावं:  'ते हिलरीच्या.....निघून गेले.'

४.  ' दरम्यान नौसैनिक व गृहरक्षक दलाच्या जवानांनी बुरखे धारण करून त्रिंकोमालीतील नागरिकांवर हल्ले चढवीत असल्याचे वृत आहे. ' (सकाळ ८.६.८६)

या वाक्यात  'नौसैनिक व गृहरक्षक दलाचे जवान' हा 'धारण करून ' आणि  'चढवीत असल्याचे' या दोन्ही क्रियांचा समान कर्ता आहे.  'करून' या कृदन्तात भूत काळ गर्भित आहे, आणि भूत काळात कर धातू कर्मणी असतो हे लक्षात घेऊन कर्त्याची तृतीया विभक्ती योजली आहे. पण  'चढवीत अस-' ही क्रिया कर्तरी आहे, तिला कर्त्याची प्रथमा अपेक्षित आहे. अशा ठिकाणी 'करून' या कृदन्ताचा कर्ता अध्याहृत ठेवून 'चढवीत अस-' याला अनुरूप अशा विभक्तीत कर्ता योजण्याची मराठीची प्रकृती आहे. म्हणून सुधारणा हवी:  '........ दलाचे जवान. '

मागच्याच अंकात (जुलई ८६) एका वाचकानं सुधारून दिलेली काही वाक्यं उद्धृत केली आहेत. ही आणखी काही 'प्रयत्नें वाळूचे कण रगडितां...' पण मराठी लेखकांपुढं नारद मुनींचा आदर्श नसेल तरच!

 


निरोप


 

ग म भ न' हे नाव धारण करणारा पहिला लेख ललित मासिकाच्या सप्टेंबर १९८२ च्या अंकात प्रकाशित झाला. या गोष्टीला आता चार वर्ष झाली. चार वर्षांचे ४८ महिने होतात. पण काही जोड-अंक असतात, काहींत  'ग म भ न' आलेलं नाही. ही सर्व वजाबाकी करता प्रस्तुत लेख सोडून या सदरात ३४  [टीप] लेख आले. काही लेखांत तर काही लेखांना जोडून वाचकांची पत्रं. पत्रांतले मुद्दे, त्यांना उत्तरं असा मजकूर आला. पत्रलेखकांत प्राथमिक शाळेतल्या शिक्षकापासून विद्यापीठातल्या/ महाविद्यालयातल्या प्राध्यापकापर्यंत आणि सामान्य जिज्ञासूपासून तज्ज्ञापर्यंत वेगवेगळ्या तयारीचे वाचक होते. या लेखांत आणि पत्रव्यवहारात मराठी भाषेच्या तांत्रिक अंगांचा - व्याकरण, शुद्ध लेखन, शब्दनिर्मिती, लिपिविचार, लिपिसुधारणा, परिभाषा, भाषाशुद्धी, यंत्रयुगातला भाषिक दृष्टिकोन इत्यादींचा - परामर्श झाला. दैनिकापासून ग्रंथापर्यंत, सामान्य लेखकापासून प्रथितयश लेखकांपर्यंत अनेकांची हजेरी यात लागली.

या तीन चार वर्षोच्या खटाटोपाची फलश्रुती काय? असं दिसलं की  'ग म भ न' लेखांतलं विवेचन ज्यांना कळतं, जे त्यात रस घेतात, सहभागीही होतात असे मराठी वाचक पुष्कळ आहेत. साक्षरताप्रसाराच्या या युगात मराठी लेखनामध्ये किमान अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचा जो ऱ्हास होत आहे तो थांबायला हवा, तीविषयीची जाण वाढायला हवी असं वातावरण निर्माण करण्यात, साध्यासुध्या मुद्द्यांवर विचार करायला लावण्यात  'ग म भ न' लेख काही प्रमाणात सफल झाले आहेत. भाषेच्या तांत्रिक अंगाविषयी काही शंका/ अडचण असली तर कुणाला विचारावी या प्रश्नाची सोडवणूक या चार वर्षोत  'ग म भ न' मुळं दूर झाली आहे. 'हेही नसे थोडके!'

'ग म भ न' या शीर्षकाचे लेख चार वर्षांपूर्वी, स्मृतिशेष श्री. केशवराव कोठावळ्यांच्या सूचनेवरून लिहायला आम्ही सुरूवात केली. केशवरावांच्या निधनानंतरही ही लेखमाला चालू राहिली. याचं श्रेय सध्याचे संपादक श्री. अशोक कोठावळे यांना आहे.  'ललित' हे ग्रंथप्रेमी लोकांचं मासिक आहे; आणि भाषा हे ग्रंथाचं शरीर आहे. हे शरीर निरामय, सुद्दढ ठेवण्याचं महत्त्व लेखक आणि वाचक या दोघांनाही समजलं पाहिजे. या उद्देशानं पहारा ठेवण्याचं काम आम्ही या लेखमालेच्या द्वारा आतापर्यंत केलं. हे केवळ कोठावळे पितापुत्रांच्या सौजन्यामुळे शक्य झालं. त्यासाठी आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहो.

'ग म भ न' लेख वाचून ज्या वाचकांनी पत्रं लिहून चर्चा केली. प्रश्न उपस्थित केले. पूरक माहिती जोडली त्यांचंही या उपक्रमाला मोलाचं साहाय्य झालं आहे. त्यांचे आम्ही आभारी आहो. त्यांच्या पत्रांचा परामर्श करताना आम्ही जे लिहिलं त्यानं क्वचित कोणी दुखावले गेले असण्याचा संभव आहे, त्यांची आम्ही क्षमा मागतो. मुद्दा समजून घ्यावा; शैलीकडं दुर्लक्ष करावं.

मराठी नियतकालिकांचा इतिहास असं सांगतो की एखादं चांगलं नियतकालिक अंतर्धान पावतं तेव्हा त्याची जागा भरून काढणारं दुसरं नियतकालिक पुढं येतं. ही गोष्ट विषयाच्याही बाबतीत उपपन्न आहे. 'ग म भ न' या लेखमालेतला विषय चिरंतन आहे. त्याची यापुढंही वेगळं माध्यम, वेगळा पेहराव घेऊन चालू राहील. यात आम्हांला शंका नाही.

 


 

टीप : ललित मासिकाचे  १९८२ ते १९८६ ह्या कालवधीतील  अंक २ - ३ वेळा आम्ही बारकाईने पाहिले. पण केवळ ३१ लेखच आढळले. (सुशान्त देवळेकर) [परत]